बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचं खरं कारण आलं समोर; ‘त्या’ एका चुकीमुळे 14 जणांनी गमावलेला जीव
हिंदुस्थानचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपीन रावत यांच्या Mi-17 V5 या हेलिकॉप्टरचा तामीळनाडूमध्ये अपघात झाला होता. 8 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या या अपघातात बिपीन रावत यांच्यासह 14 जणांचा मृत्यू झाला होता. संरक्षण क्षेत्रातील प्रमुख अधिकाऱ्याच्या हेलिकॉप्टर अपघातामागील नक्की कारण काय? हा अपघात होता की घातपात? असे अनेक प्रश्न यानंतर समोर आले होते. आता या अपघातामागील खरे कारण समोर आले असून संरक्षण मंत्रालयाच्या स्थायी समितीने बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताबाबतचा अहवाल संसदेत सादर केला आहे.
लोकसभेच्या स्थायी समितीच्या अहवालानुसार, 2017 ते 2022 या काळात हवाई दलाचे एकूण 34 अपघात झाले. 2021 ते 2022 या आर्थिक वर्षामध्ये 9 अपघात झाले. यात तामिळनाडूतील कुन्नूर येथे झालेल्या हेलिकॉप्टर अपघाताचाही समावेश आहे. 8 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या या अपघातामध्ये जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीसह एकूण 14 जणांचा मृत्यू झाला होता. हा अपघात मानवी त्रुटीमुळे झाला होता. दरम्यान, हवाईदलाने पुरवलेल्या माहितीच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
8 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या Mi-17 V5 हेलिकॉप्टर अपघाताच्या तपासात फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरचे विश्लेषण करण्यात आले. हेलिकॉप्टर दुर्घटनेमागे यांत्रिक बिघाड, तोडफोड किंवा निष्काळजीपणा हे कारण नसल्याचे समोर आले होते. सुरुवातीला पायलटच्या चुकीमुळे हेलिकॉप्टर क्रॅश झाले असावे अशी शक्यता होती, मात्र आता मानवी चुकीमुळेच हा अपघात झाल्याचे संसदीय अहवालातून स्पष्ट झाले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List