सत्याचा शोध – भय इथले संपवू या!

सत्याचा शोध – भय इथले संपवू या!

>> चंद्रसेन टिळेकर

समाज निर्भय असणे हे त्याच्या चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. जो समाज कुठल्या ना कुठल्या कल्पनेने भेदरलेला असतो, तो समाज प्रगत होणे कठीण असते. म्हणून समाजाच्या निर्भयतेच्या आड ज्या-ज्या म्हणून श्रद्धा, समजुती, परंपरा इत्यादी गोष्टी येतील, त्या सर्व आपण शेतातून तण निपटून टाकतो त्याप्रमाणे फेकून दिल्या पाहिजेत.

आपल्या समाजात अपशकुन नावाची एक मोठी अंधश्रद्धा रुतून बसली आहे. कशा कशामुळे आपल्याला अपशकुन होऊन आपल्या कार्याची हानी होऊ शकते याची यादी करायला आपण बसलो तर मारुतीची शेपटीही त्यापुढे तोकडी वाटेल. गंमत म्हणजे माणसे माणसाला अपशकुन तर करतातच, पण प्राणीही माणसाला अपशकुन करतात असे मानले जाते. आता हेच पहा ना, त्या बिचाऱया मांजरीने माणसाचे काय घोडे मारले आहे, पण तिलाही आपण अंधश्रद्धेच्या पिंजऱयात उभे केले आहे. या मांजरीने अपशकुन न करता अपघात कसा झाला हे इथे सांगावेसे वाटते. आमच्याच कॉलनीतील एक अगदी उच्च विद्याविभूषित मॅडम सकाळी ऑफिसला जायला म्हणून लगबगीने बाहेर पडल्या. मुख्य रस्त्यावर येण्यापूर्वी छोटी गल्ली पार करीत असताना त्या गल्लीत त्यांना दिसले की, एक मांजर आडवे जात आहे. त्यांच्या मनातली अपशकुनाची पाल चुकचुकली असावी. आपल्याला अपशकुन होऊ नये म्हणून त्यांनी बहुधा धावायचा प्रयत्न केला असावा, पण अनवधानाने त्यांचा पाय बाजूच्या खड्डय़ात पडला आणि त्या जायबंदी झाल्या. कॉलनीतील काही स्त्रियांनी त्यांना त्यांच्या फ्लॅटवर परत नेऊन सोडले. म्हणजे प्रत्यक्षात त्यांना मांजर आडवे जाऊन त्याने अपशकुन न करताही त्यांना कॉटवर आडवे व्हावे लागले.

शहरात राहणाऱया सुशिक्षितांची ही कथा तर इतरांची विशेषतः आमच्या ग्रामीणवासियांबद्दल तर बोलायलाच नको. तिथे तर पशुपक्ष्यांची वर्दळच वर्दळ असते. ते बिचारे एकमेकांशी आपल्या भाषेत बोलत असतात, केव्हा केव्हा ओरडून एकमेकांना साद घालत असतात. पण त्यांचे ते ओरडणे ऐकूनही बऱयाच जणांची पाचावर धारण बसते. रात्री टिटवी ओरडली की, काही तरी विचित्र घडणार अशी धडकी अनेकांच्या मनात भरते किंवा भरवली जाते. त्यातून रात्रीचे घुबडाचे ओरडणे ऐकू आले तर जगबुडी होते की काय अशीच त्यांची भावना होते. भिंतीवरची साधी पाल जरी चुकचुकली तरी आपल्या अनेकांना ते अशुभ लक्षण वाटते. हे झाले पशुपक्ष्यांना अपशकुनाच्या पिंजऱयात उभे करण्याबद्दल!

पण आपण भारतीय ग्रहताऱयांनाही सोडत नाही. गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणे चंद्राचे दर्शन घेतले की, आपल्यावर चोरीचा आळ येतो. इतकेच नाही तर यच्चयावत ग्रह वर फिरता फिरता खाली माणसांच्या कार्यात आडकाठी कशी आणता येईल याचा म्हणे विचार करीत असतात. मंगळ, शनी यांनी तर जणु माणसाच्या यशाचे कंबरडे मोडण्याचे पेटंटच घेतले आहे. हे झाले प्रत्यक्षात अस्तित्वात असलेल्या ग्रहांबद्दल, पण ते कमी पडले म्हणून की काय प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेले ग्रह म्हणजे राहू अन् केतूही म्हणे माणसाच्या यशात कोलदांडा घालतात.

अर्थात ही सगळी किमया आमच्या वास्तुशास्त्राr आणि ज्योतिष मंडळींची. गुराखी जसा जनावरांना हाकत त्यांना इष्टस्थळी म्हणजे पाणवठय़ावर नाही तर गायरानात नेतो, तसे आमचे हे ज्योतिषी सगळ्या ग्रहांना आणि उपग्रहांना त्यांचे भटकणे सोडायला लावून तुमच्या आमच्या पत्रिकेत ठाण मांडून बसायला सांगतात. कुठे तुम्ही आम्ही इथे पृथ्वीवर वावरणारे जीव अन् कुठे ते महाकाय आपल्याच तंद्रीत हिंडणारे महाकाय दगडधोंडय़ांनी भरलेले निर्जीव ग्रह! ते कशाला आपल्या वाटेत येऊन आपल्याला शकुन-अपशकुन करतील किंवा आपल्याला अपयशाच्या डोहात बुडवतील? अगदी परखडपणे सांगायचे तर आपण त्या ग्रहांच्या खिजगणतीतही नसतो, पण सतत कसल्या ना कसल्या भीतीच्या सावटाखाली वावरणे, अंगवळणी पडलेल्या आम्हा भारतीयांना हे सांगावे तरी कुणी? आम्हाला भुताची भीती वाटते. ग्रहांची भीती वाटते. इतकेच काय पण कुठल्या ना कुठल्या कारणास्तव विशेषतः नवस फेडायला उशीर झाला तर देवाचा कोप होईल ही भीतीही आमच्या मनात घर करून बसलेली असते.

एखाद्या कृतीविषयी, घटनेविषयी विचार करणे, त्या पाठीमागील कार्यकारणभाव शोधणे हे मुळी आपल्या भारतीयांच्या स्वभावातच नाही. याचे कारण सांगताना पु.ल. एके ठिकाणी म्हणतात, “आमच्यात शारीरिक आळस आहे तो मी समजू शकतो, पण बौद्धिक आळसही का असावा?’’

लेखाच्या सुरुवातीला माणसाला पशुपक्षी अपशकुन करतात तसे माणूस ही माणसाला अपशकुन करतो असे म्हटले आहे ते आपल्याला दक्षिणेत प्रामुख्याने पाहायला मिळते. तिथे सकाळी सकाळी रस्त्यात जर समोरून विधवा आली तर अपशकुन झाला असे समजले जाते. आपल्याकडेही अजून विधवा मातेला आपल्या अपत्यांच्या लग्नादी शुभ समजल्या जाणाऱया कार्यात इतरांप्रमाणे भाग घेता येत नाही. याऐवजी विधुर पित्याला मात्र कसलीच अडचण किंवा अपशकुन होत नाही. अंधश्रद्धेचा उगम हा प्रामुख्याने भीतीतून होत असल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मध्यंतरी एक अनोखा उपक्रम हाती घेतला होता. तो म्हणजे अमावस्येच्या दिवशी चक्क कार्यकर्त्यांनी स्मशानात झोपणे. आणखी एका भीतीतून निर्माण होणाऱया अंधश्रद्धेचा उल्लेख केला पाहिजे तो म्हणजे मुलींच्या डोक्यात निर्माण झालेली बट किंवा जट जर कापली तर देवीचा कोप होतो. यामुळे असंख्य महिलांना असह्य त्रास सहन करावा लागायचा. अं.नि.स. या संस्थेने ‘जटा निर्मूलन’ हा कार्यक्रम हाती घेतला आणि असंख्य महिलांना त्या त्रासातून मुक्त केले.

थोडक्यात सांगायचे तर आपण भारतीयांनी आपल्या मनात जी नाना तऱहेची भीती बसली आहे किंवा हेतुपुरस्सर बसवली आहे तिचा नायनाट शक्यतो लवकर केला पाहिजे. उगाच आपलं, ‘भय इथले संपत नाही’ हे रडगाणे गाण्यात काय अर्थ आहे?

[email protected]
(लेखक वैज्ञानिक व वैचारिक विषयाचे अभ्यासक असून विवेकवादी चळवळीशी निगडित आहेत.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पावणे नऊ लाखांचे हेरॉईन जप्त  पावणे नऊ लाखांचे हेरॉईन जप्त 
पावणे नऊ लाख रुपयांचे हेरॉईन तस्करीप्रकरणी एकाला बोरिवली पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. परवेझ अन्सारी असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार...
भाजप नेते रमेश बिधुरींचे वादग्रस्त वक्तव्य, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशींना अश्रू अनावर
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो राजीनामा देणार
कणकवलीत रेल्वे अभियंत्याची फसवणूक, केवायसीच्या नावाने खात्यातून काढले दीड लाख
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठा दिलासा, योजनेबाबत नवी अपेडट काय?
HMVP व्हायरसचे तीन रुग्ण आढळले, आजाराचे प्रतिबंधक उपाय काय?, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर
विद्या बालन रोहित शर्माबद्दल लिहायला गेली अन् अडचणीत सापडली; स्क्रीनशॉट व्हायरल; अनेकांनी झापलं