मेलबर्नच्या विमानतळावर विराट कोहली चिडला, व्हि़डीओ होतोय व्हायरल
हिंदुस्थानचा स्टार क्रिकेटर विराट कोहली कायम कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतो. पण यावेळी तो वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. त्याचा एक सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये तो मेलबर्न एअरपोर्टवर ऑस्ट्रेलियाच्या एका पत्रकारावर संतापला आणि त्यानंतर ती पत्रकार त्याच्याशी हुज्जत घालताना दिसत आहे.
ब्रिस्बेन टेस्ट मॅच ड्रॉ झाल्यानंतर टीम इंडिया आता चौथ्या सामन्यासाठी मेलबर्नला पोहोचली आहे. 26 डिसेंबर पासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर बॉक्सिंग डे टेस्ट मॅच खेळली जाणार. दोन्ही संघ हा सामना जिंकून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेण्याच्या इराद्याने खेळतील. यापूर्वी विराट कोहली मेलबर्न विमानतळावर ऑस्ट्रेलियन मीडियाशी वाद घालताना दिसला होता. विमानतळावरून बाहेर पडताना असे काही घडले, जे पाहून कोहली शांत राहू शकला नाही आणि मीडियावर संतापला. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विराट का चिडला याचे कारण सांगतो.
विराट कोहली मेलबर्न विमानतळावर एका महिला पत्रकारासोबत वाद घालताना दिसत आहे. वृत्तानुसार, मेलबर्नच्या चॅनल 7 च्या पत्रकाराने कोहली आणि त्याचे कुटुंब विमानतळावरुन बाहेर येताना पाहिल्यावर कॅमेरा त्यांच्यासमोर नेला आणि त्यामुळे विराट नाराज झाला. तो पुढे आणि लगेच मागे येऊन तो त्या पत्रकाराशी काहीतरी बोलताना दिसला. एवढेच नाही. संतापलेल्या विराटने पत्रकाराला सांगितले की, माझ्या परवानगीशिवाय माझ्या मुलांचे फोटो, व्हिडीओ काढू शकत नाही. त्याचे हावभाव पाहता तो प्रचंड संतापलेला दिसत आहे.
विराट कोहली त्याच्या खासगी आयुष्याबाबत फार गंभीर आहे. तो परदेशातच नाही तर हिंदुस्थानातही त्याच्या मुलांचे फोटो काढू नये असे सांगतो. विराट आणि अनुष्का आपल्या मुलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतानाही त्यांच्या मुलांचे चेहरे दिसणार नाहीत याबाबत दक्ष असतात.अनेकदा विमानतळावर तो आपल्या मुलांचे फोटो घेऊ नये असे सांगताना दिसतो.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List