“ही लढाई मी जिंकू शकलो नाही..”; पोटच्या मुलाच्या आत्महत्येविषयी बोलताना कबीर बेदी भावूक
पोटच्या मुलाच्या गंभीर मानसिक आरोग्य स्थितीचा सामना करणं हे पालकांसमोरील सर्वांत मोठं आव्हान असतं. अभिनेते कबीर बेदी यांनी त्यांच्या आयुष्यात अशाच एका मोठ्या आव्हानाचा सामना केला. मात्र या आव्हानाचा सामना करताना त्यांना मुलाला गमावण्याचं दु:ख पचवावं लागलं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते त्यांच्या मुलाविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. कबीर बेदी यांचा मुलगा सिद्धार्थला स्किझोफ्रेनियाचं निदान झालं होतं. सिद्धार्थने आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं होतं. सिद्धार्थ हा कबीर बेदी आणि त्यांची पहिली पत्नी प्रोतिमा यांचा मुलगा होता. 1990 मध्ये त्याने कार्नेगी मेलॉन विद्यापीठात शिक्षण घेतलं आणि नंतर त्याला स्किझोफ्रेनिया असल्याचं निदान झालं होतं. वयाच्या 26 व्या वर्षी त्याने आत्महत्या केली होती.
‘डिजिटल कॉमेंट्री’ला दिलेल्या मुलाखतीत कबीर बेदी म्हणाले, “माझा मुलगा सिद्धार्थची शोकांतिका अशी होती की तो खूप हुशार होता. अमेरिकेच्या सर्वांत प्रतिष्ठित इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये तो दाखल झाला होता. त्यानंतर त्याला स्किझोफ्रेनियाचं निदान झालं होतं. मी माझ्या आत्मचरित्रात आयुष्यातील या टप्प्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झालोय. सिद्धार्थच्या अखेरच्या महिन्यांमध्ये एक पिता त्याच्या मुलाला कशा पद्धतीने आत्महत्येपासून वाचवण्याचा प्रयत्न करतो, हे त्याच लिहिलंय. माझ्यावर काय परिस्थिती ओढावली होती, याची कल्पना तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. अखेर मी ही लढाई जिंकू शकलो नाही आणि माझ्या आयुष्यातील ही कदाचित सर्वांत मोठी शोकांतिक आहे.”
‘स्टोरीज आय मस्ट टेल’ या आत्मचरित्रात कबीर बेदी यांनी मुलाविषयी लिहिलंय. 1997 मध्ये सिद्धार्थने आत्महत्या केली होती. “मी आत्मचरित्रात जे काही लिहिलंय, ते मनापासून लिहिलंय. आयुष्यात मी ज्या समस्यांचा सामना केला, त्याविषयी त्यात मी लिहिलंय. चुकीच्या गुंतवणुकीमुळे माझं खूप मोठं नुकसान झालं होतं. माझा मुलगा ज्यावेळी स्किझोफ्रेनियाचा सामना करत होता, तेव्हाच हे सगळं घडलं होतं. मी माझ्या मुलाला आत्महत्या करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला पण मला त्यात यश मिळालं नाही. माझ्या मनात आजही अपराधीपणाची भावना आहे. त्याचवेळी माझ्यासमोर मोठं आर्थिक संकट होतं. ऑडिशन्सला गेल्यावर तिथे काय करायचं हेच मला कळत नव्हतं. त्यामुळे मी बरेच ऑफर्स गमावले होते. मी भावनिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालो होतो”, असं त्यांनी त्यात लिहिलंय.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List