टीएमटीचे 550 कंत्राटी चालक बेमुदत संपावर, पगारवाढीसाठी केले ठिय्या आंदोलन
ठाणेकरांची जीवनवाहिनी असलेल्या टीएमटीने आज हजारो प्रवाशांची पुरती कोंडी केली. कंत्राटदाराने वाढीव वेतन द्यावे यासाठी पालिकेच्या परिवहन सेवेतील साडेपाचशे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी 225 बसेसना अचानक ‘ब्रेक’ लावत संपाचे हत्यार उपसले. आधी पगार द्या मगच गाड्या रस्त्यावर उतरवू, असा इशाराच या चालकांनी दिला आहे. त्यामुळे नोकरी, व्यवसायासाठी घराबाहेर पडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना ठिकठिकाणच्या बस स्थानकांवरच लटकावे लागले. याचा विद्यार्थ्यांनादेखील जबरदस्त फटका बसला. या बंदचा गैरफायदा घेत काही रिक्षाचालकांनी अवाचेसवा भाडे आकारत प्रवाशांना वेठीला धरले. या आंदोलनाने टीएमटीला एक दिवसात जवळपास 12 लाखांचे नुकसान झाले आहे. दरम्यान रात्री उशिरा संप मागे घेण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.
ठाणे महापालिका क्षेत्रात टीएमटीच्या माध्यमातून महापालिका सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देते. टीएमटीच्या ताफ्यात 474 बसगाड्या असल्या तरी यातील सुमारे 50 बसगाड्या विविध कारणांमुळे प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध होत नाहीत. यातील 225 बसगाड्या खासगी ठेकेदारामार्फत चालवल्या जातात. या बसगाड्या घोडबंदर येथील आनंदनगर आगारातून सुटतात. ठाण्यातील लोकसंख्येच्या तुलनेत टीएमटी बसगाड्यांची सुविधा पुरेशी नाही. त्यामुळे दररोज सकाळी आणि रात्रीच्या वेळेत या बसगाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी असते. त्यातच आज सकाळी टीएमटीच्या कंत्राटी चालकांनी अचानक अघोषित संप पुकारल्याने परिवहन प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. या संपामुळे ठाणे स्थानक आणि घोडबंदरच्या बस थांब्यांवर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळाली, वाहतूककोंडी त्यातच टीएमटी चालकांचा संप या दोन्ही प्रकारामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे हाल झाले.
■ ठेकेदाराने नियमानुसार वेतन वाढवले नसल्याने हा संप पुकारण्यात आल्याचे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. या संपाचा परिणाम नागरिकांना सहन करावा लागला
■ मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूककोंडी झाल्याने टीएमटीच्या इतर बसगाड्या प्रवाशांना वेळेत उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांना मनस्ताप सहन करावा लागला.
■ प्रशासनाकडून हा संप मिटवण्याबाबत मार्ग काढला जात असल्याची माहिती टीएमटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
■ प्रशासनाने वाढीव वेतनाबाबत लिखित द्यावे. त्यानंतर लगेचच संप मागे घेतला जाईल, अशी मागणी संतप्त कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केली.
तोडगा काढण्यासाठी कर्मचारी आणि ठेकेदाराबरोबर चर्चा सुरू आहे. परंतु त्यांच्या मागण्या अधिक आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी ठेकेदाराला सांगितले आहे. त्यामुळे लवकरात लवकर संप मागे घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल. भालचंद्र बेहरे, परिवहन व्यवस्थापक, टीएमटी, ठाणे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List