मेरठमध्ये हाथरस घटनेची पुनरावृत्ती, शिवमहापुराण कथेदरम्यान चेंगराचेंगरी; चार महिला जखमी
मेरठमध्ये हाथरस दुर्घटनेची पुनरावृत्ती घडली आहे. शिवमहापुराण कथेदरम्यान शुक्रवारी चेंगराचेंगरीची घटना घडली असून, यात चार महिला जखमी झाल्याची माहिती मिळते. जखमींचा नेमका आकडा अद्याप समजू शकला नाही. मेरठच्या शताब्दीनगरमध्ये ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच मेरठचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. एसएसपींनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.
शताब्दीनगरमधील श्री केदारेश्वर सेवा समितीकडून शिवमहापुराण कथा वाच सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते. दुपारी 1 ते 4 वेळेत होणाऱ्या कथा वाचन सोहळ्यासाठी सव्वा लाखांच्या आसपास भाविक कार्यक्रमस्थळी पोहचले होते. यामध्ये महिला आणि वृद्धांची संख्या अधिक होती. तसेच व्हीव्हीआयपीदेखील सोहळ्यासाठी दाखल झाले होते.
कार्यक्रमस्थळी मुख्य प्रवेशद्वाराजवळ बाऊंसर्सनी गर्दीला रोखले. यावेळी गर्दीत धक्काबुक्की झाली आणि भाविक एकमेकांवर पडले. यात अनेक जण दबले गेले. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आयोजनात झालेल्या चुकांमुळे ही दुर्घटना घडल्याचे बोलले जाते. याप्रकरणी सखोल तपास सुरू आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List