अजितदादांना ‘जोडे मारो’ आंदोलन करू नका, कारण शहाण्याला शब्दांचे जोडे लागतात! भुजबळ भडकले… मी तुमच्या हातातलं खेळणं नाही

अजितदादांना ‘जोडे मारो’ आंदोलन करू नका, कारण शहाण्याला शब्दांचे जोडे लागतात! भुजबळ भडकले… मी तुमच्या हातातलं खेळणं नाही

इतरांना दिलेला शब्द पाळण्यासाठी राज्यसभेवर पाठवून माझा बळी घ्यायचा, हे न समजण्याइतका मी मूर्ख नाही. माझ्याशी पोरखेळ करता, मी लल्लूपंजू आहे का, असा सवाल करीत मी तुमच्या हातातलं खेळणं नाही, असे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज सुनावले. अजितदादाला ‘जोडे मारो’ आंदोलन करू नका, कारण शहाण्याला शब्दांचे जोडे लागतात, असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला.

भुजबळ येथे पत्रकारांशी बोलत होते. ‘जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना’, असा पुनरुच्चार त्यांनी केला. आपण लढा देवून शुन्यातून विश्व निर्माण करणारे आहोत, असे सांगत अजित पवारांची साथ सोडण्याचा गर्भित इशाराही दिला. अजित पवार यांच्या सांगण्यावरून नाशिक लोकसभा लढविण्याची सर्व तयारी केली; परंतु नावच जाहीर न केल्याने ही निवडणूक लढवणार नाही असे मी जाहीर केले. त्यानंतर राज्यसभेवर माझ्याऐवजी सुनेत्रा पवार यांना संधी देण्यात आली. साता?याची जागा भाजपाला सोडल्याने राज्यसभेची एक जागा अजित पवार गटाला मिळाली होती, तेथे मला पाठवा असे सांगूनही नितीन पाटील यांना राज्यसभा देण्यात आली. आता मला मंत्रिपदावरून डावलण्यासाठी नितीन पाटलांचा राजीनामा घेवून मला राज्यसभेवर पाठवायचे, पाटील यांचे भाऊ मकरंद पाटील यांना माझ्याऐवजी मंत्री करायचे असे माजी खासदार समीर भुजबळ यांना प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी आठ दिवसांपूर्वीच सांगितले होते, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. इतरांना दिलेला शब्द पाळण्यासाठी माझा बळी घ्यायचा हे न समजण्याइतका मी लल्लूपंजू नाही. लहान बाळ समजून माझ्याशी पोरखेळ सुरू आहे. आताही कोणाला मंत्री करायचे याबाबतसुद्धा माझ्याशी चर्चा केली गेली नाही. जिथे मला किंमतच नाही, तिथे मी काय करायचं, माझा उपयोग काय, अशी उद्वीग्नता त्यांनी व्यक्त केली.

बारामतीत अजित पवारांच्या निवासस्थानासमोर आंदोलन

छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने सकल ओबीसी समाजाच्या वतीने बारामती शहरातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करीत निषेध व्यक्त करण्यात आला.याबाबत पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.

माझ्यासाठी फडणवीसांचा आग्रह

मी मंत्रिमंडळात राहावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आग्रह होता. याबाबत त्यांनी अजित पवार यांच्याशीही चर्चा केली होती; परंतु त्यांनी त्यांचे ऐकले नाही, असे मला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले, असेही भुजबळ म्हणाले.

आता त्रिकूटच निर्णय घेते

उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे हेच निर्णय प्रक्रियेत असतात. काय निर्णय होतात याचा पत्ता इतरांना लागतच नाही. आम्ही ज्येष्ठ असूनही त्यांचेच आदेश पाळावे लागतात, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. शिवसेना, काँग्रेस आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत असताना मला विश्वासात घेतले जायचे. शरद पवार हे सुद्धा निर्णयापूर्वी विचारात घ्यायचे, सन्मान द्यायचे, असे स्पष्ट केले.

  • काँग्रेसमध्ये असताना मी महसूलमंत्री झालो होतो. त्यानंतर मला विरोधी पक्षनेता करण्यात आले, तेथेही मी अपेक्षेपेक्षा जास्त काम केले. 1999 साली काँग्रेस एकत्र असती तर मी मुख्यमंत्री झालो असतो, यासाठी मला सोनिया गांधी यांनी फोन केले होते, काँग्रेस सोडून जावू नका, असे सांगितले होते; परंतु मी शरद पवार यांच्याबरोबर गेलो आणि माझी संधी हुकली.
  • राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आली तेव्हा मला गृहमंत्री करण्यात आले, तेव्हा दाऊद इब्राहीमला सर्वच घाबरायचे, त्याची दहशत मी संपवली. अमिताभ बच्चन, शाहरूख खान सारखे स्टार मुंबई सोडून जाणार होते, त्यांनाही मी थांबविले, असे भुजबळांनी स्पष्ट केले.

आज नाशिकमध्ये समता परिषदेची बैठक

समता परिषदेच्या राज्य कार्यकारिणीची उद्या नाशिक येथे बैठक होणार आहे. या बैठकीत चर्चा करेन, सर्वांना विश्वासात घेईन आणि माझा पुढचा निर्णय घेईन, असे छगन भुजबळ यांनी सांगितले. मतदारसंघातील जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय घेणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

मंत्रीपदावरून डावलल्यानंतर नागपूर अधिवेशन सोडून छगन भुजबळ सोमवारी रात्री नाशिकमध्ये पोहोचले. मंगळवारी सकाळी भुजबळ फार्म निवासस्थानी समता परिषदेचे पदाधिकारी व समर्थकांशी चर्चा केली. येवला येथे मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. लोकसभा निवडणुकीपासून आपला कसा अपमान केला जात आहे, अवहेलना केली जात आहे, मंत्रिपदावरून कसे डावलले गेले, याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशीही संवाद साधला. हा वाद मंत्रिपदाचा नाही, तर जी अवहेलना, अपमान झाला त्याचा आहे. अस्मितेचा हा लढा आहे, असे ते म्हणाले.

कसला दादा अन् कसला वादा

वाह रे वा! दादाचा वादा, कसला दादा अन् कसला वादा, असा संताप त्यांनी व्यक्त केला. हा लढा मंत्रिपदाचा नाही, तर अस्मितेचा आहे, अपमानाचा आहे. मी लढणारा मनुष्य आहे, शून्यातून विश्व निर्माण करणारा आहे, असे त्यांनी ठणकावले.

अजितदादा नॉट रिचेबल

छगन भुजबळ यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्याने अजित पवार हादरले आहेत. हिवाळी अधिवेशनाकडे ते काल आणि आजही फिरकले नाहीत. ते नॉट रिचेबल आहेत. भुजबळांचे बंड थंड करण्यासाठी त्यांनी दिल्ली गाठून महाशक्तीला साकडे घातल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र या बातम्या चुकीच्या असल्याचे सांगितले. अजितदादांचा घसा दुखत असल्याने ते कामकाजात सहभागी झाले नाहीत. ते उद्या विधिमंडळात येतील, असे त्यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईत प्लॅस्टिकबंदीचा बट्ट्याबोळ; पालिका, एमपीसीबीमध्ये समन्वयाचा अभाव मुंबईत प्लॅस्टिकबंदीचा बट्ट्याबोळ; पालिका, एमपीसीबीमध्ये समन्वयाचा अभाव
पर्यावरण रक्षणासाठी मुंबईत प्रतिबंधित प्लॅस्टिक वापरावर कठोर कारवाई करण्याची गरज असताना महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यात समन्वयाचा अभाव...
नवी मुंबईत पोलिसाची हत्या; मृतदेह रेल्वे रुळावर फेकला, मोटरमनच्या सतर्कतेमुळे अपघाताचा बनाव फसला
परदेशात जाणाऱ्या नागरिकांवर मोदी सरकारची नजर, 19 प्रकारची खासगी माहिती द्यावी लागणार
दक्षिण कोरियाचे पदच्युत राष्ट्राध्यक्ष अटकेपासून बचावले, 200 सुरक्षा रक्षकांनी पोलिसांना घरात घुसू दिले नाही
मुलांना सोशल मीडियासाठी पालकांची परवानगी सक्तीची, नियम मोडल्यास कंपनीला 250 कोटींचा दंड
संतोष देशमुख हत्या प्रकरण, आज परभणीत सर्वपक्षीय मूक मोर्चा
पुणे – मुंबई अंतर अर्ध्या तासाने कमी होणार!