मला कोणाच्या सांगण्यावरुन मंत्रीपद नाकारण्यात आले, हे शोधावे लागेल; छगन भुजबळ यांचा अजित पवार, प्रफुल्ल पटेलांवर निशाणा
राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्याने अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ प्रचंड नाराज आहेत. त्यांनी मनातील नाराजी उघडपणे व्यक्तही केली आहे. नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मनातील खदखद व्यक्त करत अप्रत्यपणे अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर निशाणा साधला आहे. आपल्याला मंत्रीपद मिळाले नाही, याची नाराजी नाही. मात्र, पक्षात माझा ज्याप्रमाणे अपमान आणि अवहेलना करण्यात आली, त्यामुळे उद्विन असल्याचे सांगत त्यांनी मनातील खदखद व्यक्त केली आहे.
पक्षश्रेष्ठींना मी त्यांच्या हातामधील लहान खेळणं वाटतो का? ते सांगतील तेव्हा बसायचं, त्यांनी सांगितल्यावर उठायचं, ते म्हणाले की निवडणूक लढवायची, त्यांनी सांगितले की माघार घ्यायची, अशाप्रकारे आपली पक्षात अवहेलना आणि अपमान करण्यात आला आहे. आपल्या पक्षात कोणाला मंत्रिपद द्यायचे, याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात. कोणी कितीही सांगितलं तरी मंत्रिपदाचा निर्णय पक्षप्रमुखांनी घ्यायचा असतो. आता मला कोणाच्या सांगण्यावरुन मंत्रीपद नाकारण्यात आले, हे शोधावे लागेल, असे सांगत छगन भुजबळ यांनी अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावरही निशाणा साधला.
मंत्रिपदापेक्षा पक्षातील नेत्यांकडून देण्यात आलेल्या वागणुकीविषयी नाराजी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीला मला नाशिकमधून उभं राहायला सांगण्यात आले होते. नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे तु्म्ही लढावे, यासाठी आग्रही असल्याचे मला सांगण्यात आले. मी त्यासाठी पूर्ण तयारीही केली होती, तेव्हा चांगले वातावरणही तयार झाले होते. मात्र, ऐनवेळी आमच्या नेत्यांनी कच खाल्ली आणि माझे नाव घोषित केले नाही. त्यामुळे मी स्वत:च लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली. त्यानंतर मी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा सुनेत्रा पवार आणि नितीन पाटील यांना राज्यसभेवर संधी द्यायची आहे, असे सांगण्यात आले. तेव्हादेखील मी शांत बसतो. मी तेव्हा सांगितलं होतं की, राज्यसभेत माझ्या अनुभवाचा फायदा होईल. पण तेव्हा मला सांगण्यात आलं, तुम्ही महाराष्ट्रात असणं गरजेचे आहे, आपण तेही मान्य केले.
आता विधानसभा निवडणूक लढवल्यानंतर आणि जिंकल्यानंतर मला राज्यसभेवर जायला सांगितले जात आहे. त्यासाठी आता नितीन पाटील यांना राजीनामा द्यायला लावला जाईल. पण मी मागत होतो तेव्हा मला संधी देण्यात आली नाही, अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी आपली नाराजी व्यक्त केली. आता मी निवडणूक जिंकलो आहे. आता कुठे निवडणूक संपली आहे. मला माझ्या मतदारसंघातील प्रश्न सोडवायचे आहेत. निवडणुकीत माझ्यासाठी माझ्या लोकांनी मेहनत घेतली. मी त्यांना काय सांगू? मी आता लगेच राजीनामा देऊ शकत नाही. राज्यसभेवर जायचे असल्यास मला आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे मी एक-दोन वर्षे थांबा, मी मतदारसंघात सगळं स्थिरस्थावर करुन राज्यसभेवर जातो, असे सांगितले होते. त्यानंतर आमचे नेते म्हणाले, यावर चर्चा करु, पण ते कधी चर्चेला बसले नाहीत, अशा थेट आरोप छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्यावर केला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List