मराठी माणसाला मुंबई, महाराष्ट्रातून नष्ट करण्याची भाजपची भूमिका! संजय राऊत यांचा घणाघात
धूप लावण्याच्या किरकोळ वादातून परप्रांतीय अधिकाऱ्याने मराठी कुटुंबाला बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना कल्याणमध्ये घडली. या घटनेवरून महाराष्ट्रभर संताप व्यक्त होत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी या घटनेवरून भाजप व महायुती सरकावर निशाणा साधला आहे. ”मराठी माणसाला मुंबई, महाराष्ट्रातून नष्ट करण्याची भाजपची भूमिका असल्याचा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे.
”कल्याण सारखेच प्रकार मुंबईत सुद्धा घडले आहेत. मराठी माणसांना घाणेरडं म्हटलं गेलं, त्यांना शिव्या घातल्या गेल्या. त्यांना जागा नाकारण्यात येतायत. ही हिंमत या महाराष्ट्रामध्ये होतेच कशी? हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी जी शिवसेना उभी केली. त्या महाराष्ट्र व मराठी माणसाला कमजोर करण्यासाठी भाजपने मोदी, शहा, फडणवीस यांनी मराठी माणसासाठी लढणारी ही संघटना फोडली. मराठी माणसाची लढण्याची ताकद कमजोर व्हावी. मराठी माणसाला दुय्यम वागणूक मिळावी. ही मुंबई अदानी लोढा, गुंडेचा सारख्या व्यापाऱ्यांच्या घशात घालाव्या यासाठी मराठी माणसाला कमजोर केलं जातंय. कालच्या विधानसभा निकालानंतर मराठी माणसावरचे हल्ले वाढायला लागले आहेत. हे मराठी माणसाचे खून पडायला लागले आहेत. मुंबईतून ठाणे कल्याण डोंबिवलीतही मराठी माणसाने राहू नये अशा प्रकारचे वातावरण निर्माण केलं जातंय. आणि स्वत:ला शिवसेना समजणारे ते नामर्द लोकं सरकारमध्ये बसलेले आहेत. त्यांना कल्याणमधल्या घटनेची वेदना टोचतेय का? ते नामर्द सत्तेसाठी लाचार आहेत. त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची, मराठी माणसाची संघटना फोडायला मदत केली, हे लाचार आहेत. मला ईडीने अटक केली तेव्हा माझं वाक्य होतं की महाराष्ट्र कमजोर होतंय पेढे वाटा. प्रत्येक मराठी माणसाविषयी बोलणाऱ्या व्यक्तीवर, संस्थेवर हल्ले सुरू आहेत. हे फार मोठं राष्ट्रीय कारस्थान आहे. मुंबईचे गुजरातीकरण, उत्तर भारतीयकरण करायचं आणि मराठी माणसाला कायमचं तडीपार हद्दपार करायचं आहे. भाजपची भूमिका मराठी माणसाला मुंबई महाराष्ट्रातून नष्ट् करण्याची आहे. मराठी माणासवरच्या हल्ल्यासंदर्भात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागली पाहिजे. दोन उपमुख्यमंत्री आहेत. स्वत:ला मराठी समजतायत. लाज वाटली पाहिजे या सगळ्यांना, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजप महायुती सरकारला फटकारले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List