पैशांसाठी सवा महिन्याच्या चिमुकलीला जन्मदात्रीने विकले, मातेसह खरेदी-विक्री करणारे रॅकेट उद्ध्वस्त, 9 आरोपींना अटक
पोटच्या सवा महिन्याच्या मुलीला मातेने अवघ्या एक लाखात विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लहान मुलांची खरेदी-विक्री करणाऱ्या रॅकेटच्या मदतीने त्या निर्दयी मातेने बंगळुरू येथे मुलीची विक्री केली होती. याबाबत माहिती मिळताच माटुंगा पोलिसांनी तत्काळ तपास करून त्या आरोपी मातेसह मुलांची खरेदी-विक्री करणाऱ्या रॅकेटमधील आठ जणांना बेड्या ठोकल्या.
कचरा वेचण्याचे काम करणारी मनीषा यादव (32) हिने तिच्या सवा महिन्याच्या मुलीची बंगळुरू येथे विक्री केल्याची तक्रार तिची सासू प्रमिला पवार (51) हिने माटुंगा पोलिसांत केली होती. याची गंभीर दखल घेत उपायुक्त रागसुधा आर यांनी याप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांच्या चार पथकांनी वेगवेगळ्या पद्धतीने उल्हासनगर, सुरत, वडोदरा, सिरसी या ठिकाणी जाऊन तपास केला आणि मनीषा यादव हिला तिची सवा महिन्याची मुलगी विकण्यासाठी मदत करणारे सुलोचना कांबळे (घरकाम), मीरा यादव (आजारी लोकांची मदत करणे), योगेश भोईर (दलाल), रोषनी घोष (लग्न जमविणे), संध्या रजपूत (लग्न जमविणे), मदिना ऊर्फ मुन्नी चव्हाण (लग्न जमविणे), तैनाज चौहान (घरकाम), बेबी तांबोळी (लग्न जमविणे) अशा आठ जणांना अटक केली. या रॅकेटने कर्नाटकात विकलेल्या मुलीला ताब्यात घेतले.
पैशांची गरज असलेल्या जोडप्यांना टार्गेट
मुलगी नको तसेच पतीला जामीन मिळवून देण्यासाठी पैशांची गरज असल्याने मनीषा हिने पोटच्या मुलीला विकण्याचे कृत्य केले. यासाठी दादर येथे राहणारी सुलोचना हिने मनीषाचे ब्रेनवॉश केल्याचे समजते. मनीषाला पैशांचे लालच दाखवत मुलीला विकण्यास तयार केल्यानंतर बाकीच्या आरोपींनी लगेच हालचाल करून बंगळुरू येथे त्या चिमुकलीला विकले. अटक केलेले आरोपी हे अशाच गरीब लोकांचा शोध घेतात ज्यांना पैशांची गरज आहे व ज्यांना जास्त अपत्ये आहेत अशा पालकांना टार्गेट करून त्यांचे ब्रेनवॉश करतात आणि त्यांना त्यांच्या लहानग्या अपत्याला विकण्यास तयार करून मानवी तस्करी करतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List