म्हणे मुंबई केंद्रशासित करा! महाराष्ट्रात संताप!! कर्नाटकातील काँगेस आमदार लक्ष्मण सवदी याने गरळ ओकली
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून बेळगावात सीमावाद सुरू असतानाच मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी कर्नाटकमधील कॉँग्रेस आमदार लक्ष्मण सवदी यांनी केली आहे. कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात उत्तर कर्नाटकातील विकासाच्या मुद्दय़ावर बोलताना सवदी यांनी ही मागणी केली. यावरून महाराष्ट्रात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
महाराष्ट्रातील नेते बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित करावा अशी मागणी करत असतील तर आपणदेखील मुंबईला केंद्रशासित करण्याची मागणी केली पाहिजे. महाराष्ट्राला बेळगाव हवे असेल तर त्यांना ते द्यावे आणि त्या बदल्यात आमच्या पूर्वजांनी राज्य केलेले मुंबई कर्नाटकात घ्यावे, असे लक्ष्मण सवदी म्हणाले.
म्हणे मुंबईवर आमचाही हक्क
आमचे पूर्वज मुंबईत वास्तव्यास होते. त्यामुळे आमचाही मुंबईवर अधिकार आहे, असे आम्ही म्हणू शकतो. कारण पूर्वी बेळगावसह अन्य सहा जिल्हे मुंबई प्रांताचा भाग असताना आमचे कर्नाटकातील लोक मुंबईला जात होते. त्याठिकाणी वास्तव्य करत होते, असे लक्ष्मण सवदी म्हणाले.
महाराष्ट्र कॉँग्रेस या भूमिकेशी सहमत नाही – वडेट्टीवार
मुंबईसाठी आम्ही रक्त सांडले आहे, बलिदान दिले आहे. त्यामुळे मुंबई केंद्रशासित कधीच होऊ शकत नाही. मराठी माणसाचा बेळगावमध्ये प्रश्न आहे आणि त्यामुळे बेळगाव केंद्रशासित व्हावा अशी आमची मागणी आहे. कर्नाटकातील कॉँग्रेस आमदाराच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही. महाराष्ट्रातील काँग्रेस आमदाराची ही भूमिका नाही. मुंबई केंद्रशासित कधीच होणार नाही, असे कॉँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
मुंबई आमचीच… बेळगाव केंद्रशासित करा, आदित्य ठाकरे कडाडले
काँग्रेस असो की भाजप कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी बेळगाव किंवा महाराष्ट्राचा अपमान केला तर शिवसेना अजिबात सहन करणार नाही. शेकडो हुतात्म्यांच्या बलिदानातून मुंबई महाराष्ट्राला मिळाली आहे. मुंबई आमचीच आहे, बेळगाव केंद्रशासित करा, अशा शब्दांत शिवसेना नेते व विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे विधान भवनात कडाडले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List