Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या बळावर महायुती सत्तारूढ; सत्तेत किती महिलांना संधी?
लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केल्याने महायुतीचा झंझावत उभ्या महाराष्ट्रात दिसून आला. 288 पैकी 232 जागांवर महायुतीने मुसंडी मारली. भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला. 5 डिसेंबर रोजी मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आज नागपूरमध्ये अगदीच थोड्याच वेळात 4 वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. मंत्रिमंडळात अनेक शिलेदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार आहे. तीनही पक्षातून एका मागून एक आमदारांना मंत्री पदाची शपथ घेण्यासाठी फोनवर निरोप धाडण्यात आला आहे. पण या मंत्रिमंडळात किती लाडक्या बहिणींना स्थान मिळालं, तुम्हाला माहिती आहे का? किती महिला आमदारांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे?
भाजपाकडून कुणा कुणाला संधी?
देवाभाऊच्या नवीन मंत्रिमंडळात चार लाडक्या बहिणींना संधी देण्यात आली आहे. यामध्ये भाजपाच्या तीन महिला आमदारांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका महिला आमदाराचा समावेश आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेने एका ही महिलेला संधी दिलेली नाही. भाजपाकडून पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर आणि माधुरी मिसाळ यांना मंत्रिमंडळामध्ये संधी देण्यात आली आहे. यामध्ये मुंडे आणि बोर्डीकर या मराठवाड्यातील आहेत. तर मिसाळ या पुण्यामधील भाजपाच्या आमदार आहेत.
राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे
राष्ट्रवादी काँग्रेसने अदिती तटकरे यांना मंत्री मंडळात संधी दिली आहे. मागील मंत्री मंडळात सुद्धा त्यांची वर्णी लागली होती. त्यांच्याकडे महत्त्वाचं खातं होतं. तर या मंत्रिमंडळात त्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. राज्यात लाडक्या बहिणीमुळे आम्ही सत्तेत आलो, असे विधान अजित पवारांनी आज केले होते. त्यांच्या पक्षाने एका लाडक्या बहिणीला मंत्री पद दिले आहे.
शिवसेनेकडून महिलेला नाही मंत्रीपद
तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आतापर्यंत 12 जणांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. त्यात एका ही लाडक्या बहिणीला संधी देण्यात आली नसल्याचे दिसून येते. अजून पुढील एक तासात अजून काही घडामोड घडल्यास हे चित्र पालटू शकते. एकनाथ शिंदे यांनी अनेकदा आपल्या भाषणात लाडक्या बहिणीमुळे विजयी झाल्याचे सांगीतले आहे. तर ही योजना त्यांच्यामुळे आल्याचा दावा करण्यात येत होता.
या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या 20 महिला या विजयी झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक संख्या भाजपाकडे आहे. भाजपाच्या 14, शिवसेनेच्या 2 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या 4 महिला आमदार आहेत. यामध्ये भाजपाकडून पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर आणि माधुरी मिसाळ यांचे नाव तर राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे यांचे नाव मंत्रिमंडळात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List