‘काय तर म्हणे दादाचा वादा, मी काय लल्लूपंजू आहे काय?’; छगन भुजबळ यांचा अजित पवारांना सवाल
रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, या मंत्रिमंडळाचं वैशिष्ट म्हणजे या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली, तर काही अनुभवी नेत्यांचा पत्ता कट करण्यात आला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाहीये, यावरून त्यांनी नाराजी व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट सवाल केला आहे.
नेमकं काय म्हणाले भुजबळ ?
काही लोकांनी अजित दादांना धन्यवाद दिले. कारण मला मंत्री केलं नाही म्हणून. मंत्रिपद अनेकदा मिळाली त्यामुळे आता नाही भेटलं त्यात काही वाद नाही. पहिल्यांदा मी महसूल मंत्री झालो आता त्यावरून पक्षांमध्ये भांडणं सुरू आहेत. विरोधी पक्षनेता झालो त्यावेळी पवारांच्या अपेक्षेपेक्षा जास्त काम केलं. 1999 साली जर काँग्रेस एकत्र असती तर मी 100 टक्के मुख्यमंत्री झालो असतो, मला सोनिया गांधींपासून अनेकांचे फोन होते की तुम्ही काँग्रेस सोडू नका तुम्हाला मुख्यमंत्री करणार आहोत. पण मी शरद पवारांसोबत गेलो. राष्ट्रवादी स्थापन झाली तेव्हा कोणाचा पत्ता नव्हता फक्त मी आणि शरद पवार साहेब होतो. जेव्हा मुंबईत दहशत होती तेव्हा मी गृहमंत्री झालो. बच्चन, शाहरुख मुंबई सोडून जाणार होते, मी त्यांना थांबवलं आणि मुंबईतली दहशत संपवली असं यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, होळीच्या दिवशी मला रस्त्यातून अजितदादांनी बोलावून घेतलं आणि मला लोकसभा लढवायला सांगितलं. जेव्हा मी म्हंटल लोकसभा लढणार नाही, मग त्यावेळी अजितदादांनी पुढे येऊन लगेच सांगायला पाहिजे होत ना, मी काय दूध पितो का? मी काही लहान बाळ आहे का? मला समजत नाही का?
साताऱ्याची जागा आम्ही भाजपला सोडली म्हणून एक राज्यसभा आम्हाला मिळाली होती
अजित दादांनी शब्द दिला म्हणजे काय? काही चर्चा आहे की नाही. शरद पवार साहेब सुद्धा चर्चा करून निर्णय घ्यायचे, आठ दिवसांपूर्वीच समीर भाऊंना पटेल यांनी बोलावून घेतलं आणि सांगितलं की भुजबळांना राज्यसभेवर पाठवू. मकरंद पाटील यांना मंत्री करण्यासाठी मला राज्यसभेवर पाठवायचं? मी काय मूर्ख आहे का? इतरांना दिलेला शब्द पाळण्यासाठी भुजबळांचा बळी घेणार का? मी काही लल्लू-पंजू आहे का? चर्चा सुद्धा नाही केली की कोण मंत्री होणार? माझी जर किंमत नाही तर मी काय करायला पाहिजे, तुम्ही शब्द दिला म्हणजे काहीही करायचं का? काय तर म्हणे दादाचा वादा, असं यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List