बजरंगबली की जय ! आदित्य ठाकरे यांची दादरच्या हनुमान मंदिरात महाआरती; ठाकरे गटाची कडवट हिंदुत्वाकडे कूच?
दादरच्या रेल्वे स्थानक परिसरात असलेलं 80 वर्ष जुनं हनुमानाचं मंदिर पाडण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नोटीस बजावण्यात आली होती. दादर रेल्वे स्थानकाच्या प्लॅट फॉर्म क्रमांक बाराच्या बाहेर हे मंदिर आहे. हे मंदिर सात दिवसांच्या आत विश्वस्तांनी स्वत: पाडावं अन्यथा रेल्वेकडून हे मंदिर पाडलं जाईल आणि त्याचा खर्चही वसूल केला जाईल असं या नोटीसमध्ये म्हटलं होतं. मात्र त्यानंतर राजकारण चांगलंच तापलं होतं. उद्धव ठाकरे यांनी याच मुद्द्यावरून भाजपवर टीका देखील केली.
त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रेल्वे प्रशासनाला या संदर्भात एक पत्र देखील पाठवलं होतं. मंदिराबाहेर आंदोलन देखील झालं, अखेर या मंदिराच्या पाडकामाला आता रेल्वे प्रशासनाकडून स्थगिती देण्यात आली. मात्र आता यावरून श्रेयवादाची लढाई रंगताना दिसत आहे.
आमच्यामुळे मंदिराच्या पाडकामाला स्थगिती मिळाल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे, तर दुसरीकडे आज शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी या मंदिरात जाऊन महाआरती देखील केली, यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत देखील होते. त्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये याच मुद्द्यावरून आदित्य ठाकरे यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला होता.
भाजपाचं हिंदुत्व हे फक्त निवडणुकीपुरत आहे, उद्धव ठाकरे यांनी अनेकवेळा भाजपाचं निवडणुकीपुरत असलेलं हिंदुत्व उघड केलं आहे. भाजप शासीत राज्यातच हिंदुत्व धोक्यात आहे. मंदिर पाडण्याची नोटीस सुद्धा यांच्याच सरकारची आणि मंदिराच्या पाडकामाला स्थगिती देण्याचा निर्णय देखील यांच्याच सरकारचा असा हल्लाबोल यावेळी आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
दरम्यान आता अशी चर्चा सुरू आहे की, शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची चाचपणी सुरू आहे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गट कडवट हिंदुत्त्वाची भूमिका घेत आहे का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. आज आदित्य ठाकरे यांनी या हनुमान मंदिरात जाऊन महाआरती केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List