मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी घडामोडीला वेग, उदय सामंतांचा बंगला मिळणार या नेत्याला, सामान बाहेर काढलं
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आली. त्यानंतर पाच डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी देखील झाला. मात्र मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला होता. नव्या मंत्रिमंडळात महायुतीमधील कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती मंत्रिपद येणार आणि कोणाला कोणती खाती मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान उद्या रविवारी नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. नव्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरात होणार आहे.
दरम्यान मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी मुंबईत देखील घडामोडींना वेग आला आहे. वर्षा निवासस्थानाच्या बाजूला असलेल्या मुक्तगिरी या बंगल्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वास्तव्य करणार आहेत. उदय सामंत यांचं या बंगल्यात वास्तव होतं. आता हा बंगला एकनाथ शिंदे यांना देण्यात आला आहे. त्यामुळे उदय सामंत यांनी बंगल्यातील आपलं सगळं सामान बाहेर काढल्याची माहिती समोर येत आहे. आता या बंगल्याचा ताबा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात येणार आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार तीन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सामान हे मुक्तागिरी बंगल्यामध्ये दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नंदनवन बंगल्याची डागदुजी सुरू असल्याने, एकनाथ शिंदे मुक्तागिरी बंगल्यामध्ये वास्तव्य करणार आहेत, काम पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा नंदनवन या त्यांच्या निवासस्थानी जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे बंगले आजुबाजूलाच असल्याने भविष्यात वर्षा निवासस्थान आणि मुक्तागिरी बंगला राजकारणाचा हॉटस्पॉट होऊ शकतात अशी देखील चर्चा सुरू आहे.
उद्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता
दरम्यान उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो अशी माहिती समोर येत आहे, नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता. आता उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, नवे मंत्री नागपुरात शपथ घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात 34 ते 35 मंत्री शपथ घेण्याची शक्यात आहे. ज्यामध्ये भाजपचे 17, शिवसेना शिंदे गटाचे 10 तर अजित पवार गटाच्या 7 जणांचा समावेश आहे, अशी माहिती समोर येत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List