राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार उद्याच होणार, नागपुरातही घडामोडींना वेग, मंत्र्यांसाठी बंगले सज्ज ठेवण्याच्या सूचना
विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. महायुतीचे तब्बल 231 उमेदवार निवडून आले. 132 उमेदवारांसह भाजप हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला. शिवसेना शिंदे गटाला 57 जागा मिळाल्या तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. तर दुसरीकडे महाविकास आघाडील तीनही घटक पक्ष मिळून केवळ 50 जागाच जिंकता आल्या.
दरम्यान त्यानंतर पाच डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाच्या शपथविधिनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? कोणाच्या वाट्याला कोणतं खात जाणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आता मोठी बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे समोर आलेल्या माहितीप्रमाणे उद्याच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे, यासाठी नागपुरात घडामोडींना वेग आला आहे. मंत्रिमंडळ विस्तार लक्षात घेता नागपुरात मंत्र्यांसाठी 40 बंगले सज्ज करून ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
नागपुरात घडामोडींना वेग
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता संजय उपाध्याय यांनी याबाबत माहिती दिली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या तयारीबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की, “मंत्रिमंडळ विस्तार लक्षात घेता नागपुरात मंत्र्यांसाठी ४० बंगले सज्ज करुन ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उद्यापर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे, हिवाळी अधिवेशनात मंत्र्यांसाठी निवासाची व्यवस्था झाली आहे, मंत्र्यांच्या नावाच्या पाट्यांचे ढाचे तयार आहेत, उद्या मंत्र्यांच्या नावांची यादी आली की बंगल्यांवर नेमप्लेट लावण्यात येईल. निवास समितीची आजंच बैठक झाली, या बैठकीमध्ये मंत्र्यांसाठी बंगले तयार ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. रवि भवन परिसरात कॅबीनेट मंत्र्यांसाठी २४ बंगले सज्ज आहेत, तर नाग भवन परिसरात राज्य मंत्र्यांसाठी १६ बंगले सज्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असं संजय उपाध्याय यांनी म्हटलं आहे.
दरम्यान राज्यमंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्याच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, मात्र कोणाला कोणतं मंत्रिपद मिळणार याबाबत आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List