‘…तर मविआमध्ये अस्वस्थता होऊ शकते’, त्या भेटीनंतर शिवसेना ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा थेट इशारा
गुरुवारी शरद पवार यांचा वाढदिवस होता, वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या भेटीची राजकीय वर्तुळात आता चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यातच या भेटीवर बोलताना सुनंदा पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पवारसाहेब यांचा काल वाढदिवस होता, कौटुंबीक आहे. सगळे त्यांना भेटण्यासाठी गेले होते. यात गैर नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित याव्यात अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. तेच मलाही वाटतं. राजकारणात कार्यकर्ता महत्वाचा असतो, त्यामुळे विखुरलेले राहण्यापेक्षा एकत्रित यावं असं मला वाटतं. अजितदादा जेव्हा भेटतील तेव्हा मी त्यांना शुभेच्छा नक्की देईल असं सुनंदा पवार यांनी म्हटलं आहे. सुनंदा पवार यांच्या या वक्तव्यावर आता सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाल्या अंधारे?
काल शरद पवार यांचा वाढदिवस होता, त्यामुळे सर्वजण कुटुंब म्हणून एकत्र येणं स्वाभाविक आहे. सुनंदा पवार नेमक्या कोणत्या संदर्भानं म्हटल्या? कुटुंब म्हणून एकत्र यायला हवं की राजकारणात एकत्र यायला हवं? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, राजकारण म्हणून एकत्रित यायला हव असेल तर अजितदादांच्या संगतीत जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लोक आहेत ते मारकडवाडी जाऊन पवार साहेबांबद्दल कमालीचे अपशब्द वापरतात त्याबद्दल अजित पवार यांची काय भूमिका आहे? लोकसभा निवडणुकीच्या वेळी महिला आयोगावर असणाऱ्या बाई टीका करत असताना अत्यंत बिकट हास्य करत होत्या, हे सगळं चीड आणणारं आहे. या लोकांबद्दल भूमिका काय आहे? त्या जर राजकारणात एकत्र आलं पाहिजे असं म्हणत असतील तर त्याचा महाविकास आघाडीवर परिणाम होतो, त्यामुळे महाविकास आघाडीत अस्वस्थता होणं फार स्वाभाविक आहे, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान दुसरीकडे अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी देखील सूचक वक्तव्य केलं आहे. भविष्यात काय होईल काही सांगता येत नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List