जगभरातील महत्वाच्या घडामोडी
माझा आत्मा अमेझॉनमध्ये … निवृत्तीनंतर 3 वर्षांनी जेफ बेजोस कंपनीत परतले
जगातील अब्जाधीशांच्या यादीत असलेले नाव म्हणजे अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस. त्यांनी तीन वर्षांपूर्वी निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र आता त्यांनी पुन्हा कंपनीत परतायचा निर्णय घेतला. नुकतेच एका डीलबुक समिटमध्ये जेफ बेजोस यांनी त्यांचे कंपनीप्रति असलेले समर्पण आणि कामातले सातत्य यावर भाष्य केले. 30 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या कंपनीला पूर्णपणे सोडलेले नाही, असे त्यांनी सांगितले. ‘माझा आत्मा अमेझॉनमध्ये आहे. माझी जिज्ञासा अमेझॉनमध्ये आहे. माझं भय आणि माझं प्रेमही हेच आहे. मी कंपनीला कधीच विसरू शकणार नाही. मी नेहमी मदतीसाठी तयार असेन. मी आजही कंपनीला वेळ देत आहे,’ असे जेफ बेजोस म्हणाले.
आता मोबाईल हॅण्डसेटवर धोक्याची सूचना
सतत फोन वापरल्यामुळे मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य आणि वैयक्तिक नातेसंबंधांवर वाईट परिणाम होत आहे. खासकरून तरुणाईला या समस्येने ग्रासले आहे. यातून सुटका व्हावी म्हणून स्पेनने एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. सर्व फोनवर सिगारेट पाकिटांवर असलेल्या आरोग्य सूचनांप्रमाणे सूचना लागू करण्याचा प्रस्ताव स्पेनमध्ये दिला आहे. जास्त वेळ फोन वापरल्यास हृदयविकाराचा झटका, ब्रेन स्ट्रोक, रक्तदाब, वजन वाढणे, स्त्रियांमध्ये हार्मोनल बदल होणे अशा अनेक समस्या उद्भवू शकतात.
कॅनडात हिंदुस्थानी विद्यार्थ्याची हत्या
कॅनडात सुरक्षा रक्षकाचे काम करत असलेल्या 20 वर्षीय हिंदुस्थानी तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. येथील एडमंटन शहरात पंजाबमधील हर्षदीप सिंगवर गोळ्या झाडण्यात आल्या. तो शुक्रवारी, 6 डिसेंबर रोजी सकाळी मृतावस्थेत आढळला. गस्त घालणाऱ्या अधिकाऱ्यांनी गोळीबाराची माहिती दिली. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
पाकिस्तानातील व्यापाऱ्यांवर कराचा बोजा
पाकिस्तानमध्ये महागाई वाढत असून, आता व्यापाऱ्यांवरील कराचा बोजा आणखी वाढणार आहे. प्रोफेशनल टॅक्सच्या माध्यमातून पाकिस्तान सरकार व्यापाऱ्यांकडून कर वसुली करण्याच्या तयारीत आहे. दुकानदारांना दोन लाख पाकिस्तानी रुपयांपर्यंत व्यावसायिक बिले भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतीय चलनानुसार ही रक्कम 15 ते 61 हजार रुपये एवढी आहे.
बांगलादेशात हिंदुस्थानी उच्चायुक्तालयासमोर लाँग मार्च
बांगलादेशची राजधानी ढाका येथे आज हिंदुस्थानच्या निषेधार्थ हिंदुस्थानी उच्चायुक्तालयासमोर बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या वतीने लाँग मार्च काढण्यात आला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करत हा मार्च मध्येच रोखला. हिंदुस्थान कुणाशीही मैत्री करू शकत नाही. तेथील लोकांना बांगलादेशी नागरिक आवडत नाहीत त्यामुळेच माजी पंतप्रधान शेख हसीना यांना आश्रय दिला, असा आरोप यावेळी करण्यात आला. बीएनपीचे संयुक्त महासचिवरुहुल कबीर रिझवी यांनी हिंदुस्थान प्रत्येक पावलावर बांगलादेशला नुकसान पोहोचवू शकतो असा आरोप केला. हिंदुस्थानने चितगाव मागितल्यास बंगाल, बिहार आणि ओदिशा परत घेऊ असा इशाराही त्यांनी दिला.
युक्रेनने युद्धविराम जाहीर करावा -ट्रम्प
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पॅरीस येथे फ्रान्स आणि युक्रेनमधील नेत्यांची बैठक घेतल्यानंतर लगेचच युक्रेनने युद्धविराम जाहीर करण्याचे आवाहन केले. मॉस्को आणि कीव्ह येथे युद्धात शेकडो सैनिकांना आपण गमावून बसलो, असे युद्ध कधीच सुरूच व्हायला नको होते, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनाही युद्धविरामाचे आवाहन केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List