साहित्य जगत – एकच आयुष्य पुरेसे नाही
>> रविप्रकाश कुलकर्णी
नित्य नियमाने वाचन करताना जाणवत राहते की, वाचलेल्या पुस्तकांपेक्षा न वाचलेल्या पुस्तकांची संख्या वाढतेच आहे. मग लक्षात येते की, यासाठी एकच आयुष्य पुरेसे नाही, असे मला नेहमीच वाटते. अशातच एके दिवशी एका पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे आमंत्रण आले. पुस्तकाचे नाव होते – वन लाईफ इज नॉट इनफ!
के. नटवर सिंग यांचे हे आत्मचरित्र होते. भारतीय परराष्ट्र सेवेत असताना पार जवाहरलाल नेहरू ते चीनच्या माओ त्से तुंग यांच्यासारख्या उच्च पदस्थ लोकांमध्ये वावरण्याची संधी मिळाली होती. त्यामुळेच त्यांच्याकडे आतल्या गोटातल्या अनेक गोष्टींचा भरणा होता. पुढे मोठय़ा पदाची चाकरी सोडून ते राजकारणात शिरले. राजीव गांधींच्या काळात विविध खात्यांत राज्यमंत्रीदेखील झाले. पुढे नरसिंहराव यांच्या कारकीर्दीत त्यांच्याशी तीव्र मतभेद होताच त्यांनी एन. डी. तिवारी, अर्जुन सिंह यांना घेऊन ऑल इंडिया इंदिरा काँग्रेस हा नवा पक्षदेखील स्थापन केला.
पुढे डॉ. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये ते परराष्ट्र मंत्री झाले. पण त्याच काळात अन्न-तेल घोटाळय़ात त्यांचे नाव पुढे येताच त्यांनी पदाचा आणि पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते राजकारणापासून दूर फेकले गेले. तर असे टोकाचे चढउतारांचे आयुष्य लाभलेल्या आणि साहित्यिक अंग असलेल्या माणसाने आत्मचरित्र लिहिले यात काही आश्चर्य नाही. पण त्याला अन्वर्थक नाव सुचणे हे त्यांचे वेगळेपण निश्चितच. म्हणूनच त्याच्या प्रकाशनाला मी गेलो. आता मराठी प्रकाशन सोहळा काय किंवा इंग्रजी. तसा चेहरामोहरा एकच. निघताना त्यांच्याशी शेक हॅण्ड केला. तेदेखील सराईतपणे थँक्यू म्हणाले. मी निघालो. लिफ्टसाठी वाट पाहात थांबलो. तेवढय़ात एक जण घाईघाईने आला आणि म्हणाला, “सर तुम्हाला बोलवत आहेत. जरा येता का?’’ मी गेलो. के. नटवर सिंग वाटच पाहत होते. ते लगेच म्हणाले, “आय होप, यू आर रविप्रकाश… रविप्रकाश कुलकर्णी.’’
कधीकाळी आणि एकदाच आमची गाठभेट पुण्यात झाली होती हे खरं. पण इतक्या वर्षांनी के. नटवर सिंग यांनी ही गाठभेट नावासकट कशी काय लक्षात ठेवली?
तेव्हा ते म्हणाले, ‘भाषणात मी पाहिलेला सिनेमा ‘अछुत कन्या’ हे सांगून मी म्हटलं होतं या चित्रपटाची नायिका देविकाराणीला भेटण्याचा योग नंतर तीस-पस्तीस वर्षांनी आला. तेव्हा तुम्ही प्रश्न केला होता, ‘व्हॉट अबाउट हिरो? तुमच्या मनात नायिकाच कशी काय ठसली?’ युवर क्वेश्चन वॉज क्वाइट इंटेलिजंट. तसंच तुम्ही हेदेखील विचारलं होतं की, “लेखक ई. एम. फोस्टर हा अक्कडबाज लेखक आणि मी यांच्यात बरंचसं वयाचं अंतर असूनसुद्धा त्यांनी तुम्हाला ‘आपलं ‘कसं म्हटलं?’ हा प्रश्न तर आजतागायत मला कोणी विचारलेला नाही. म्हणून तेव्हापासून लक्षात आहात… नावासकट. तुम्ही शेक हॅण्ड करून गेलात आणि एकदम माझ्या लक्षात आलं तुम्ही रविप्रकाशच. म्हणून मुद्दाम माणूस पाठवून तुम्हाला बोलावून घेतलं.’’
काही राजकारण्यांची स्मरणशक्ती अफाट असते असे ऐकून आहे त्याचा मूर्तिभंजक प्रत्यय मला आला होता. उच्चपदस्थ लोकांचे आयुष्य, राजकारणी लोकांचे चेहरे आणि मुखवटे, एकमेकांवर कुरघोडी करण्याचे गलिच्छ राजकारण याचा शेणसडा या पुस्तकाच्या पानापानावर पसरलेला आहे. एके ठिकाणी म्हटले आहे, “परराष्ट्र सेवेत असताना संपूर्ण जगात व्याभिचार करण्याच्या अमर्याद संधी उपलब्ध होत असतात. प्रलोभने खूप असतात आणि संधी तर त्यापेक्षाही अधिक असतात. माझीही काही प्रेम प्रकरणे आंतरराष्ट्रीय पातळीवर झाली. पण ती अल्पकालीन होती.’’
पंडित नेहरू आणि एडविना माऊंटबॅटन यांचे प्रेमसंबंध आता जगजाहीर आहेत. पण ते किती थराला जावेत? के. नटवर सिंग सांगतात, “बारनियोमध्ये एडविना यांचे निधन झाले. तेव्हा नेहरूंनी त्यांना संसदेत श्रद्धांजली अर्पण केली होती. हा तसेही पाहता अयोग्य प्रसंग होता.’’ माझ्या लक्षात राहिलेला प्रसंग म्हणजे देव आनंदने आर. के. नारायणकडे ‘गाईड‘ कादंबरीवर चित्रपट निर्माण करण्याची परवानगी घ्यायला जाताना के. नटवर सिंग यांचे शिफारस पत्र घेतले होते.
पण आताच मी हे का सांगतोय? तर त्यांचे निधन 10 ऑगस्ट 2024 रोजी झाले. ही बातमी आता मला कळली. म्हणूनच ही आठवणीची लड.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List