बेळगावात मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला परवानगी नाकारली, जमावबंदी लागू; महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशबंदी

बेळगावात मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला परवानगी नाकारली, जमावबंदी लागू; महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशबंदी

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नी मराठी भाषिकांच्या लढ्याचे चळवळीचे केंद्र असलेल्या बेळगावमध्ये कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांवर दडपशाही सुरूच ठेवली आहे. यंदाही महामेळाव्यास परवानगी देण्यात आली नाही. शिवाय मराठी भाषिकांचा निर्धार पाहता महामेळावा होऊच नये यासाठी परिसरात जमावबंदी आदेश लागू केला आहे.

महाराष्ट्रातील नेते बेळगावमध्ये येऊ नयेत यासाठी सर्व प्रवेशमार्गावर नाकाबंदी करण्यात आली असून,या प्रत्येक मार्गावर कानडी पोलिसांच्या छावण्या टाकण्यात आल्या आहेत. कर्नाटक प्रशासनाकडून कितीही जोर जबरदस्ती करण्यात आली तरीसुद्धा धर्मवीर संभाजी महाराज चौकासह अन्य एका पर्यायी ठिकाणी महामेळावा घेणारच असल्याचा निर्धार मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीकडून करण्यात आला आहे. तर यापूर्वीचा अनुभव पाहता, पदाधिकाऱ्यांची रातोरात धरपकड होण्याची शक्यता असल्याने, सीमा भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मराठी भाषिक चळवळीच्या लढ्याचे केंद्र असलेल्या बेळगाव जिह्याला उपराजधानीचा दर्जा देऊन, दरवर्षी येथे हिवाळी अधिवेशन भरविण्याचा घाट कर्नाटक सरकारकडून घातला जात आहे. याविरोधात महामेळावा घेऊन लोकशाही मार्गाने न्याय मागणाऱ्या मराठी भाषिकांवर मात्र प्रचंड दडपशाही केली जाते.

यंदा बेळगाव येथे सोमवार, 9 डिसेंबरपासून कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. याला लोकशाही मार्गाने विरोध करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली मराठी भाषिक सीमावासीयांचा महामेळावा बेळगाव येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात सकाळी होत आहे. पण या महामेळाव्यास यंदा सुद्धा कर्नाटक सरकारकडून परवानगी देण्यात आलेली नाही. या महामेळाव्यास महाराष्ट्रातील नेत्यांनी येऊ नये यासाठी महाराष्ट्रातून कोल्हापूर मार्गे बेळगावमध्ये प्रवेश करणाऱ्या कर्नाटक-महाराष्ट्र मार्गावर कडेकोट नाकाबंदी करण्यात आली आहे. वाहनांची मोठ्या प्रमाणात तपासणी सुरू आहे.

अटकेची पर्वा न करता आमच्या भावना व्यक्त करणारच – मरगाळे

मराठी भाषिकांचा आवाज दडपण्यासाठी कर्नाटक सरकारकडून महामेळाव्यास परवानगी देण्यात आलेली नाही. तरीसुद्धा आम्ही लोकशाही मार्गाने आमच्या हक्कासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात महामेळावा घेऊन कर्नाटक सरकारच्या अधिवेशन भरविण्याच्या वृत्तीला विरोध करणार आहोत. महामेळावा उधळण्यासाठी सीमा भागात 144 कलम लागू करण्यात आले आहे. जमावबंदी करण्यात आली आहे. आज रात्री महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांची धरपकड होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तरीसुद्धा आम्ही सकाळी महामेळाव्यात आमच्या हक्कासाठी आमची मते मांडणार आहोत. भलेही आम्हाला अटक केली तरी त्याची पर्वा करणार नसल्याचे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना सांगितले. तसेच माजी आमदार व म.म.ए. समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनीसुद्धा कोणत्याही परिस्थितीत महामेळावा होणार असल्याचे स्पष्ट केले.

जिथे अडवाल तिथे सभा घेणार

बेळगावमध्ये प्रवेश करणार्या चंदगडमधील शिनोळी तसेच गडहिंग्लजमधून जाणाऱ्या संकेश्वर मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. तर बंगळुरू महामार्गावरील कोगनोळी टोलनाका परिसरातही बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने पोलीस छावणीची स्वरूप आले आहे. याच मार्गावरून शिवसैनिकांची रॅली निघणार आहे. या परिसरात जिथे अडवले जाईल तिथेच सभा घेऊन कर्नाटक सरकारचा निषेध करण्यात येणार आहे. तसेच यावेळी कर्नाटक पासिंगच्या वाहनांना महाराष्ट्रात प्रवेश देण्यास मज्जाव करण्यात येणार असल्याचे शिवसेना सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी सांगितले.

शिवसेनेची भगवी रॅली निघणार बेळगावकडे

शिवसेना नेहमीच मराठी भाषिकांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली असून बेळगाव येथे होणाऱ्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला शिवसैनिक भगवी रॅली काढून जाणार आहेत. करवीर गादी संस्थापिका रणरागिणी छत्रपती ताराराणी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी कावळा नाका परिसरातील पुतळ्याला अभिवादन करून, कोल्हापुरातून शिवसैनिक भगवे झेंडे फडकवत मार्गस्थ होतील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“आमच्यासाठी ही वेळ..”; अल्लू अर्जुनच्या घराच्या मोडतोडप्रकरणी अखेर वडिलांनी सोडलं मौन “आमच्यासाठी ही वेळ..”; अल्लू अर्जुनच्या घराच्या मोडतोडप्रकरणी अखेर वडिलांनी सोडलं मौन
‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या प्रीमिअरदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे वादात अडकलेला दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या हैदराबाद इथल्या घराची मोडतोड...
“घराचं नाव रामायण, मात्र लक्ष्मीला..”; सोनाक्षीच्या दुसऱ्या धर्मातील लग्नावरून कुमार विश्वास यांची टीका?
“महिलेच्या मृत्यूबद्दल सांगूनही अल्लू अर्जुनने..”; पोलिसांकडून धक्कादायक माहिती समोर
बिबट्याची दुचाकीला धडक; अपघातात दुचाकीस्वार ठार
कर्जाला कंटाळून शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या
संतोष देशमुख हत्या प्रकरण, विशेष सरकारी वकील म्हणून बाळासाहेब कोल्हे यांची नियुक्ती
कल्याणमध्ये भाजप पदाधिकाऱ्याला चोपले; दोघांविरोधात गुन्हा