साय-फाय – DRDO हिंदुस्थानची शान
>> प्रसाद ताम्हनकर
काही दिवसांपूर्वी हिंदुस्थानच्या डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (DRDO) म्हणजे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने स्वत विकसित केलेल्या पिनाका या हायपरसोनिक मिसाईलची यशस्वी चाचणी पार पाडली. ओडिशाजवळील एका बेटावर ही चाचणी घेण्यात आली. ध्वनीपेक्षा पाचपट वेगाने झेपावणाऱया या शस्त्राला लक्ष्य करणे जवळपास अशक्य आहे. सध्या जगातील फार कमी देशांकडे हे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. आता हिंदुस्थानदेखील या यादीत समाविष्ट झाला आहे. देशाच्या विकासासाठी आणि सुरक्षेसाठी लागणारी यंत्रसामग्री, शस्त्रs यावर संशोधन करणे, ती तयार करणे, इतर राष्ट्रीय संस्थांच्या मदतीने त्यांच्या चाचण्या घेणे अशी अनेक कामे DRDO करत असते.
1974 आणि 1998 साली पोखरण येथे करण्यात आलेल्या यशस्वी अणुचाचणीनंतर ही संस्था खऱया अर्थाने देशवासीयांच्या नजरेत भरली आणि तिचे कार्य लोकांच्या लक्षात येऊ लागले. DRDO ही संरक्षण मंत्रालयाच्या देखरेखीखाली सर्व प्रकारच्या शस्त्रांबरोबर क्षेपणास्त्रs, पाणबुडय़ा, तोफा, लढाऊ विमाने आणि अणुबॉम्बचीदेखील निर्मिती करते. त्याचबरोबर DRDO तर्फे समुद्र, हवा आणि आकाश अशा विविध ठिकाणी सैन्याला उपयोगी पडणारी सामग्री तयार करणे, तिचे डिझाइन्स बनवणे हे कामदेखील केले जाते, आधुनिक काळात अत्यंत गरजेच्या असलेल्या सायबर विभागातदेखील DRDO कार्यरत आहे आणि नवनव्या संशोधनावर भर देत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे DRDOच्या देशभरात कार्यरत असलेल्या 52 प्रयोगशाळांपैकी 5 प्रयोगशाळा या फक्त तरुण संशोधकांसाठी राखीव आहेत. DRDO ही देशाच्या संरक्षणाशी निगडित असलेली संस्था असल्याने तिचे काम अत्यंत गुप्तपणे चालू असते. शस्त्रास्त्रांची निर्मिती आणि संशोधन यासाठी ही संस्था ओळखली जात असली तरी देशाच्या सैन्यासाठी ही इतर अनेक महत्त्वाची कार्ये पार पाडते. वेगवेगळ्या हवामानात आणि परिस्थितीनुसार सैनिकांसाठी आवश्यक असे गणवेश तसेच बुटांची निर्मितीदेखील ही संस्था करत असते.
क्षेपणास्त्र निर्मितीच्या क्षेत्रात स्वतची वेगळी ओळख निर्माण करणाऱया या संस्थेच्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाची सुरुवात 1980 साली डॉ. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वात झाली. पुढे 1998 मध्ये हिंदुस्थानने घेतलेल्या पोखरण अणुचाचणीनंतर अमेरिका आणि इतर पाश्चात्त्य देशांनी हिंदुस्थानला सर्व प्रकारचे तंत्रज्ञान, विशेषत युद्ध तंत्रज्ञान आणि शस्त्रास्त्रs देण्यात हात आखडता घेतला. अशा वेळी यापुढे परदेशी मदतीवर अवलंबून न राहण्याचा निश्चय देशाने केला. त्यानंतर जोमाने कामाला लागलेल्या DRDO ने आज हायपरसोनिक मिसाईलच्या यशस्वी चाचणीपर्यंत मजल मारली आहे. गेल्या 30 वर्षांत तयार झालेल्या अग्नी, पृथ्वी, आकाश, त्रिशूळ आणि ब्राह्मोस या क्षेपणास्त्रांनी संरक्षण दलाच्या फळीला आणखी मजबूत करण्याचे काम केले आहे. नुकतीच यशस्वी चाचणी पार पडलेल्या पिनाका या हायपरसोनिक क्षेपणास्त्राने तर DRDOच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. DRDO ला अजून लढाऊ विमानासाठी शक्तिशाली असे इंजिन बनवण्यात मात्र यश मिळालेले नाही. त्यावर संशोधन जोरात चालू आहे. सध्या DRDO ने बनवलेल्या तेजस या हलक्या लढाऊ विमानासाठी जनरल इलेक्ट्रिक्स या अमेरिकन कंपनीचे इंजिन वापरले जात आहे, पण DRDO ची प्रगती बघता लवकरच पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान हिंदुस्थानी हवाई दलाच्या ताफ्यात सामील झाले तर आश्चर्य वाटायला नको.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List