सिनेविश्व – …अखेर ‘पांच’ प्रदर्शित होत आहे
>> दिलीप ठाकूर
पुणे शहरात 1976 साली घडलेल्या भयावह अशा जोशी -अभ्यंकर हत्याकांडावर आधारित ‘पांच’ हा चित्रपट! 2001 मध्ये पूर्ण झालेल्या ‘पांच’ला सेन्सॉरने अनेक कट्ससह प्रदर्शित करण्याची परवानगी दिली होती, पण तेव्हा तो प्रदर्शित झालाच नाही. आता पुढील वर्षी ‘पांच’ प्रदर्शित होत आहे. त्या निमित्ताने…
एखाद्या हत्याकांड अथवा हत्यासत्रासारख्या भयावह सत्यघटनेवर आधारित कलाकृती जास्त आव्हानात्मक असते. मूळ घटनेतील भीषण वास्तव कायम ठेवत त्यात मनोरंजनाचा मुलामा किती द्यायचा हा पटकथा व संवाद लेखक आणि दिग्दर्शक यांच्या समोर मोठा प्रश्न असतो. वर अशी कलाकृती सेन्सॉर संमत करून घेणं म्हणजे एक आव्हान असतं. त्यापैकीच एक चित्रपट आहे ‘पांच’!
पुणे शहरात 1976 साली घडलेल्या भयावह जोशी-अभ्यंकर हत्याकांडावर आधारित हा चित्रपट आहे. थरकाप उडवणाऱया या हत्याकांडावर मराठीत ‘माफीचा साक्षीदार’(1986) निर्माण झाला होता. हिरालाल शहा निर्मित हा चित्रपट राजदत्त यांनी दिग्दर्शित केला होता. काही कारणास्तव राजदत्त यांनी याचे दिग्दर्शन सोडले. मग व्ही. रवींद्र यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला. दुर्दैवाने या चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाने बरेच कटस् सुचवले होते. म्हणून रिवायझिंग समितीपुढे हा चित्रपट गेला. त्यात दोन वर्षे गेली आणि काही कटस्वर तो संमत करण्यात आला. नंतर हाच चित्रपट हिंदीत डब करण्यात आला ज्याचे नाव ‘फांसी का फंदा’ असे होते. पण या चित्रपटाला रसिकांनी नाकारले. त्या काळात मराठी चित्रपटाला न मानवणारा याच विषय होता. सामाजिक व विनोदी चित्रपटांचे ते दिवस होते.
‘पांच’ हा चित्रपट याच हत्याकांडावर आधारित आहे. टुटू शर्मा निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन अनुराग कश्यप यांचे आहे. 2001 सालीच हा पूर्ण झाला आणि सेन्सॉरकडे पाठवण्यात आला. त्यातील क्रूर हिंसा, ड्रग्ज सेवनाची दृश्ये आणि अवाजवी स्फोटक संवादामुळे सेन्सारने यावर बंदी घातली. अनुराग कश्यपने 2000 सालच्या मुंबईतील युवकांकडून अतिशय नियोजनबद्ध विकृतपणे केलेल्या काही श्रीमंत कुटुंबांच्या हत्या यात अतिशय दाहकपणे दाखवल्या होत्या. अनुराग कश्यपला सेन्सॉरची आडकाठी अजिबात आवडली नव्हती. त्या काळात त्याने अतिशय संताप व्यक्त करीत प्रसारमाध्यमांना मुलाखती दिल्या होत्या. अनेक कटस् स्वीकारत हा चित्रपट सेन्सॉरच्या तावडीतून सुटला खरा पण तो प्रदर्शित केला गेला नाही. निर्माता टुटू शर्माने येत्या 2025 वर्षात हा चित्रपट प्रदर्शित करायचे ठरवताच त्याची पुन्हा चर्चा सुरू झाली. अर्थात मल्टिप्लेक्सनंतर हा चित्रपट ओटीटीवरही येईलच. यात के. के. मेनन, आदित्य श्रीवास्तव, विजय मौर्य, तेजस्विनी कोल्हापुरे, शरद सक्सेना, विजय राज इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल वातावरणात या चित्रपटाला प्रतिसाद मिळेल.
सध्या ओटीटीवर लोकप्रिय असलेली आशीष बेंडे दिग्दर्शित ‘मानवत मर्डर्स’ ही वेब सीरिज 1970 साली महाराष्ट्रातील मानवत या गावात घडलेल्या हत्याकांडावर आधारित आहे. रामदास फुटाणे दिग्दर्शित ‘सर्वसाक्षी’ (1978) आणि अमोल पालेकर दिग्दर्शित ‘आक्रित’ (1981) हे चित्रपट याच मानवत हत्याकांडावर आधारित होते. त्या काळात या चित्रपटांचीही बरीच चर्चा झाली होती. ओटीटीच्या युगात सत्यघटना, हत्याकांड…या विषयावर अनेक चित्रपट, वेब सीरिज पाहायला मिळतील हे नक्कीच. कारण आज नवीन प्रयोग करणारे पटकथा व संवाद लेखक आणि दिग्दर्शक आहेत. तसेच कलाकारही व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून अधिकाधिक आव्हानात्मक व्यक्तिरेखा साकारत आहेत.
z [email protected]
(लेखक सिनेपत्रकार व समीक्षक आहेत)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List