गाडीने धडक दिल्याच्या आधारे बेदरकार ड्रायव्हिंग सिद्ध होत नाही! वांद्रे न्यायालयाचा निर्णय; दुचाकी चालकाची निर्दोष सुटका
केवळ गाडीने धडक दिली व त्यात पादचारी जखमी झाला, याआधारे वाहनचालकाला निष्काळणीपणा वा बेदरकार ड्रायव्हिंग केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवता येणार नाही, असा निर्णय वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने दिला आहे. आरोपी जयेश शिरसाटने रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धेला दुचाकीने धडक दिली. याप्रकरणी पोलिसांनी शिरसाटविरुद्ध बेदरकार ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल केला होता. या गुह्यात शिरसाटची पुराव्याअभावी सुटका झाली.
14 वर्षांपूर्वी धारावीतील संत रोहिदास मार्गावर अपघात घडला होता. 2 ऑगस्ट 2010 रोजी तक्रारदार कलावती जैस्वाल यांच्या आई दौलती जैस्वाल रस्ता ओलांडत होत्या. यावेळी विरोधी दिशेने आलेल्या दुचाकीची दौलती यांना धडक बसली. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. अपघात घडल्याचे पाहून आसपासचे लोक जमा झाले आणि दौलती यांना शीव रुग्णालयात नेले. तेथे दुचाकीचालक शिरसाटने उपचारासाठी एक हजार रुपये दिले आणि तो तेथून निघून गेला. यावेळी तक्रारदार कलावती यांनी दुचाकीचा नंबर नोंद करून घेतला आणि नंतर पोलिसांत तक्रार केली होती. दौलती यांना 12 दिवसांनी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात अपघाताचा खटला चालला. सर्व साक्षी-पुरावे तपासून न्यायदंडाधिकारी कोमलसिंग राजपूत यांनी आरोपी जयेश शिरसाटची पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली.
बेदरकार ड्रायव्हिंगचे ठोस पुरावेच नाहीत
एफआयआरमधील आरोप तसेच तपासादरम्यान नोंदवलेले साक्षीदारांचे जबाब संदिग्ध स्वरूपाचे आहेत. त्याआधारे आरोपीविरोधातील गुन्हा सिद्ध होत नाही. पंचनामा व इतर कागदोपत्री पुराव्यांवरूनदेखील आरोपीने निष्काळजीपणा वा बेदरकार ड्रायव्हिंग केल्याचे स्पष्ट होत नाही. ठोस पुरावेच नसल्यामुळे सरकारी पक्षाची बाजू अत्यंत कमकुवत आहे, असे निरीक्षण दंडाधिकाऱयांनी निकालपत्रात नोंदवले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List