पश्चिमरंग – अ लिटिल नाईट म्युझिक
>> दुष्यंत पाटील
वैयक्तिक आयुष्यात संकटांचा सामना करताना मोत्झार्टने रचलेल्या अजरामर संगीतरचनेतील एक म्हणजे, ‘अ लिटिल नाईट म्युझिक’. हे संगीत सर्वच प्रकारच्या श्रोत्यांच्या पसंतीस उतरलं. शास्त्राrय संगीताची मैफल असो किंवा लोकप्रिय असणारे संगीताचे कार्यक्रम, ‘अ लिटिल नाईट म्युझिक’ला सगळीकडेच स्थान मिळालं.
मोत्झार्टच्या आयुष्यात 1787 साली बरंच काही घडलं. याच वर्षी त्याच्या वडिलांचं निधन झालं. हे त्याच्यासाठी अतिशय क्लेशदायक होतं. वैयक्तिक आयुष्यात अशा संकटांचा सामना करताना मोत्झार्टनं या वर्षी काही अजरामर संगीतरचना केल्या! यातली एक रचना म्हणजे, ‘अ लिटिल नाईट म्युझिक’
कुणाचा कायमस्वरूपी आश्रय न मिळाल्यानं मोत्झार्टला नियमित पगार मिळत नव्हता. मोठय़ा लोकांकडून अधूनमधून जी काही संगीतरचना करायची कामं मिळायची त्यातूनच त्याला पैसे मिळायचे. दुर्दैवानं या कामांमध्ये नियमितपणा नव्हता. मोत्झार्टनं केलेल्या वेगवेगळ्या संगीतरचनांसाठी मिळालेल्या कामांची कागदपत्रं सापडतात. पण त्याच्या ‘अ लिटिल नाईट म्युझिक’ या संगीतरचनेसाठी मिळालेल्या कामाची कागदपत्रं मात्र सापडत नाहीत.
त्या काळी श्रीमंत लोक बऱयाच वेळा बगिच्यामध्ये मेजवान्या द्यायचे. अशा प्रसंगी एका बाजूला संगीताचा लाईव्ह कार्यक्रम चालू असायचा. संगीतरचनेच्या ‘अ लिटिल नाईट म्युझिक’ या नावावरून ही संगीतरचना अशाच एखाद्या प्रसंगानिमित्त केली असावी असं मानलं जातं किंवा एखाद्या राजघराण्यातल्या व्यक्तीनं आयोजित केलेल्या ‘प्रायव्हेट कन्सर्ट’साठीही हे संगीत रचलं असण्याची शक्यता आहे. हे संगीत दोन व्हायोलीन, एक व्हायोला, एक चेलो आणि एक डबल बास या वाद्यांसाठी रचलं गेलं होतं.
‘अ लिटिल नाईट म्युझिक’मधल्या चार मुव्हमेंट्स आज उपलब्ध आहेत. पण यात अजूनही एखादी मुव्हमेंट असावी असं मानलं जातं. ‘अ लिटिल नाईट म्युझिक’मधल्या चार मुव्हमेंट्समध्ये असणाऱया मूड्समध्ये विविधता आहे. मोत्झार्टची असामान्य प्रतिभा या संगीतरचनेत दिसून येते. ‘अ लिटिल नाईट म्युझिक’मधल्या पहिल्या मुव्हमेंटमध्ये आनंदी, उत्साही मूड आहे. त्या काळात 3 किंवा 4 मुव्हमेंट्स असणाऱया रचनांमध्ये येणाऱया पहिल्या मुव्हमेंट्स अशाच प्रकारच्या असायच्या. या मुव्हमेंटमध्ये मोत्झार्टनं सोनाटा म्युझिकल फॉर्म वापरलाय. यात त्यानं एकमेकांपेक्षा अगदी भिन्न असणाऱया दोन थीम्स अप्रतिमरीत्या गुंफल्या आहेत. दुसऱ्या मुव्हमेंटमध्ये संथपणे पुढे सरकणाऱया चालीचं संगीत येतं. एका प्रकारच्या शांतीचा मूड या मुव्हमेंटमध्ये जाणवतो. संध्याकाळच्या शांत वेळी हे संगीत खास वातावरण निर्माण करणारं ठरलं असावं. तिसऱया मुव्हमेंटमध्ये ‘मिन्युएट’ येतं. मिन्युएट हे त्या काळातलं एक लोकप्रिय असणारं नृत्य होतं. या नृत्यासाठीचं संगीत मोत्झार्टच्या तिसऱया मुव्हमेंटमध्ये येत होतं. ‘अ लिटिल नाईट म्युझिक’चा शेवट करणाऱ्या चौथ्या मुव्हमेंटमध्ये ‘रॉन्डो’ संगीत येत होतं. या मुव्हमेंटमध्ये मोत्झार्टनं रॉन्डो म्युझिकल फॉर्म वापरला होता. या मुव्हमेंटमध्ये ऊर्जा होती. त्यामुळे या रचनेनं ‘अ लिटिल नाईट म्युझिक’चा जोरदार शेवट होत होता.
अठराव्या शतकाच्या शेवटापासून ते आजपर्यंत ‘अ लिटिल नाईट म्युझिक’ची लोकप्रियता कधीच कमी झाली नाही. एका बाजूला क्लासिकल संगीत ऐकणाऱ्या लोकांमध्ये हे संगीत लोकप्रिय होतंच. शिवाय मनाची सहज पकड घेणाऱया चालींच्या हलक्याफुलक्या मुव्हमेंट्स असल्यानं हे संगीत सर्वच प्रकारच्या श्रोत्यांच्या पसंतीस उतरलं. चित्रपट, टीव्हीवरच्या मालिका, व्हिडीओ गेम्स, जाहिराती अशा अनेक ठिकाणी यातल्या वेगवेगळ्या मुव्हमेंट्समधलं संगीत वापरण्यात आलंय. आजही पाश्चात्य जगात विवाहानंतरच्या रिसेप्शनच्या कार्यक्रमात हे संगीत आवर्जून वाजवलं जातं.
जवळपास सव्वादोनशे वर्षांनंतरही हे संगीत इतकं लोकप्रिय का असावं हे पाहण्यासाठी आपण ब्दल्लूं वर जाऊन Eine kleine Nachtmusik चं संगीत नक्कीच ऐकायला हवं!
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List