लाडक्या बहिणींना दमदाटी, भाजप खासदारावर गुन्हा
‘लाडकी बहीण’ योजनेतील पंधराशे रुपयांचा लाभ घेणाऱया महिला जर काँग्रेसच्या रॅलीत, सभेत आढळल्या तर त्यांचे फोटो काढून घ्या, नावे लिहून घ्या आणि माझ्याकडे पाठवा… आम्ही व्यवस्था करतो,’ अशी जाहीर धमकी भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी कोल्हापूरच्या सभेत दिली. याची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने खासदार धनंजय महाडिक यांना आचारसंहिता भंगाची नोटीस बजावून तातडीने खुलासा करण्याची तंबी दिली होती. त्यानंतर महाडिक यांनी केलेला खुलासा निवडणूक आयोगाने अमान्य केला असून, त्यांच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
कोल्हापूरमध्ये प्रचारसभेत बोलताना धनंजय महाडिक यांचा तोल गेला. ‘घ्यायचं आपल्या शासनाचं आणि गायचं त्यांचं असं चालणार नाही. आज महाराष्ट्रात अनेक ताई छाती बडवून सांगत आहेत की, आम्हाला पैसे नकोत, सुरक्षा पाहिजे… राजकारण करताय का या पैशांचे?’ अशी धमकी महाडिक यांनी दिली होती.
एवढेच बोलून न थांबता, धनंजय महाडिक यांनी त्यापुढे जाऊनही आणखी धक्कादायक विधान केले. ‘जर मोठय़ाने कोण भाषण करायला लागली, दारात आली तर तिला एक फॉर्म द्यायचा. खाली सही कर म्हणायचं. लगेच उद्या पैसे बंद करतो म्हणायचे. आमच्याकडे काय लय पैसे झालेले नाहीत,’ असे वक्तव्यही त्यांनी केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
महाडिक यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावत खुलासा करण्याची तंबी दिली आहे. या नोटीसीमध्ये म्हटले आहे की, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता 15 ऑक्टोबरपासून लागू झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महात्मा फुले युवक मंडळ फुलेवाडी पाचवा स्टॉप फुलेवाडी (ता. करवीर) येथील राजकीय प्रचाराच्या जाहीर सभेत धनंजय महाडिक यांनी केलेल्या भाषणात भारतीय न्यायसंहिता-2023 चे कलम 179 अन्वये आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे याबाबतचा खुलासा तत्काळ सादर करण्यात यावा, अशी नोटीस निवडणूक निर्णय अधिकारी कोल्हापूर दक्षिण यांनी धनंजय महडिक यांना दिली आहे.
त्यांना सुरक्षित महिला नको आहेत – सतेज पाटील
धनंजय महाडिक हे भाजपचे खासदार आहेत; त्यांनी कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीतही जयश्री जाधव यांचा अपमान केला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी महिलांना धमकी देण्याचे वक्तव्य केले आहे. महाडिक यांची पार्श्वभूमी कोल्हापूर जिह्याला माहीत आहे. गुंडगिरीची भाषा अन् या भाषेतून दहशत पसरवणे हा एकमेव अजेंडा महाडिक पंपनीचा राहिला आहे. पण असल्या धमकीस आमच्या माता-भगिनी घाबरणार नाहीत. घरातले पैसे दिल्यागत ते बोलत आहेत. ‘छाती बडवून घ्या’, असे ते म्हणाले. म्हणजे यांना सुरक्षित महिला नको आहेत. यांच्या मनात महिलांना सुरक्षा द्यायची नाही. त्यांच्या या वक्तव्याचा राज्यातील काँग्रेसजण निषेध करत आहेत. महाडिक परजिह्यातील आहेत. त्यामुळे शाहू, फुले, आंबेडकर व ताराराणीचा वारसा ते सांगू शकत नाहीत. त्यांना या मातीचा नेमका काय गुण आहे हे माहीत नाही. त्यांच्या या वक्तव्याचा आमदार सतेज पाटील यांनी जाहीर निषेध केला आहे.
सर्वत्र संताप
खासदार महाडिक यांनी महिलांविषयी वादग्रस्त व अवमानकारक वक्तव्य केल्याने आज सर्वत्र संताप व्यक्त होत असून, ‘लाडकी बहीण योजना’ ही मिंधे-भाजप सरकारचा निवडणूक जुमला होता, हे सिद्ध झाले आहे. आता तर त्यांचे नेते थेट धमक्याच देत असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List