संजीव खन्ना आजपासून नवे सरन्यायाधीश
सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा कार्यकाळ आज, सोमवारपासून सुरु होईल. ते हिंदुस्थानचे 51 वे सरन्यायाधीश आहेत. 13 मार्च 2025 रोजी ते निवृत्त होतील. सहा महिने एक दिवस ते सरन्यायाधीश पदावर कार्यरत असतील. सकाळी शपथविधी झाल्यानंतर ते पदभार स्विकारतील.
गेल्या आठवडय़ात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड हे निवृत्त झाले. न्या. संजीव खन्ना यांचा दिनक्रम पहिल्या दिवसापासूनच व्यस्त असणार आहे. कारण न्यायाधीश निवडीच्या कॉलेजियमचेही ते प्रमुख आहेत.
20 वर्षांनंतर राजधानीला बहुमान
माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी न्या. संजीव खन्ना यांच्या नावाची शिफारस केली होती. तसा उल्लेख त्यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. गेल्या 20 वर्षांत दिल्ली उच्च न्यायालयातील एकाही न्यायाधीशाला सरन्यायाधीश पदापर्यंत पोहोचता आले नाही. त्यांच्या निवडीचे तेही एक मुख्य कारण आहे, असे माजी सरन्यायाधीश गोगोई यांनी नमूद केले आहे.
1983 पासून वकिली पेशात
सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा जन्म 14 मे 1960 रोजी झाला. कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बार काwन्सिल ऑफ दिल्लीमध्ये 1983 मध्ये वकील म्हणून त्यांनी नोंदणी केली. सुरुवातीला त्यांनी जिल्हा न्यायालयात वकिली केली. नंतर त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात आपला जम बसवण्यास सुरुवात केली.आयकर विभाग तसेच राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र खात्याचे वरीष्ठ वकील म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. 2005 मध्ये खन्ना यांची दिल्ली उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. 2006 मध्ये त्यांची सेवा कायम करण्यात आली. 2019 मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयात बढती मिळाली.
सर्वोच्च न्यायालयातील बढतीसाठी न्या. खन्ना हे 33 व्या क्रमांकावर होते. मात्र त्यावेळेचे सरन्यायाधीश गोगोई यांनी यादीतील 32 क्रमांकावरील दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश पैलाश गंभीर यांना डावलून न्या. खन्ना यांना बढती दिली होती. यावर मुख्य न्यायाधीश गंभीर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. महत्त्वाचे म्हणजे 32 क्रमांकावरील न्यायाधीशाकडे दुर्लक्ष करणे ही ऐतिहासिक चूक ठरेल, असे पत्रही मुख्य न्यायाधीश गंभीर यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिले होते. असे असतानाही न्या. खन्ना यांना बढती देण्यात आली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List