गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला,जनता त्यांना टकमक टोक दाखवेल! उद्धव ठाकरे यांचा झंझावात
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज सांगोला मतदारसंघात भव्य सभा झाली. यावेळी बोलताना त्यांनी मिंधे आणि भाजपची अक्षरशः सालटी सोलून काढली. शिवसेना पळवलीत, धनुष्यबाण चोरलात…गद्दारांनो, गुवाहाटीचा डोंगर बघितलात, आता जनताच तुम्हाला रायगडावरील टकमक टोक दाखवेल, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. 23 नोव्हेंबरला गद्दारांचा कडेलोट झालाच पाहिजे, असे खणखणीत आवाहन त्यांनी सांगोलावासीयांना केले.
सांगोला मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार दीपक आबा साळुंखे आणि सोलापूर दक्षिणचे उमेदवार अमर पाटील यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांच्या झंझावाती सभा झाल्या. यावेळी उद्धव ठाकरे यांनी गद्दारांचा चांगलाच समाचार घेतला. गद्दारांच्या छाताडांवर भगवा गाडण्यासाठी आलोय, अशी सुरुवात त्यांनी केली. सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून मिंध्यांबरोबर गुवाहाटी गाठली होती. त्यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी यावेळी निशाणा साधला. रेल्वेत कुणाची ओळख असेल तर त्यांनी मला 23 तारखेचे गुवाहाटीचे तिकीट काढून द्या, कारण इथल्या गद्दाराला तिकडे पाठवायचे आहे. मग त्याने तिथे डोंगर, झाडे मोजत बसावे, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.
राहुल गांधींच्या तोंडून शिवसेनाप्रमुखांच्या गौरवोद्गाराचे आव्हान कसले देता मोदीजी, शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळावर राहुल नतमस्तक झालेले आहेत. त्यांनी कधी तुमच्यासारखं मला नकली संतान म्हटले नाही.
तर तुमच्या सातबारावर अदानींचे नाव लागेल
सध्याचे सत्ताधारी मुंबई कुणाच्या घशात घालतायेत? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारताच उपस्थितांनी अदानीच्या नावाने घोषणाबाजी केली. इथून चारशे किलोमीटर अंतरावर असलेली मुंबई आज अदानीच्या घशात घालत आहेत. विचार करा, उद्या परत यांचे सरकार आल्यानंतर तुमच्या सातबारावर अदानीचे नाव आले तर काय होईल? असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला. मात्र, आपले महविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर जी मुंबई अदाणीच्या घशात घातली. ती त्याच्या घशातून काढून मी माझ्या महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांना मुंबई आणि परिसरात परवडणाऱया किमतीत घरे देऊन दाखवील, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी दिला.
अमित शहांनी नव्याने सहकार खात घेतलं, उद्या सहकार क्षेत्र कशावरून गिळणार नाहीत?
पश्चिम महाराष्ट्र हा सहकाराचा पट्टा आहे. साखर कारखाने, बँका व इतरही उद्योग इथे आहेत. सहकार हा राज्याचा विषय आहे; पण स्वातंत्र्यानंतर आता केंद्रामध्ये स्वतंत्र सहकार खाते तयार केले गेले. आणि ते खाते अमित शहा यांनी स्वतःकडे ठेवले आहे. आज अजित पवार व इतर राजकीय नेते तिकडे जातायेत. धाडी पडल्यानंतर सगळे पळतायेत. त्यांना निवडून देण्यासाठी प्रचार करत आहेत. मात्र, त्यांना लक्षात येत नाही की भाजपची नीती ही ‘वापरा आणि फेकून द्या’ अशी आहे, निवडणूक झाल्यावर त्यांना हे कळेल. मग तसेच उद्या हे सहकार क्षेत्र अमित शाह गिळणार नाहीत कशावरून? सहकारी बँका अडाणीच्या घशात घालणार नाहीत कशावरून? ही सुरुवात आहे. एकेक पाऊल पुढे टाकत टाकत ते जात आहेत. त्यांचा नारा ‘बटेंगे तो कटेंगे’ असा नसून ‘हम महाराष्ट्र को लुटेंगे आणि दोस्तोंको बाटेंगे’, असा असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
भाजपने पक्षातल्या सगळ्या मुस्लिमांना काढून टाकावे
धर्मा-धर्मामध्ये मारामाऱ्या करून, आगी पेटवून हे निवडून येण्याचे स्वप्न बघत असतील तर यांचे हिंदुत्व मी मानायला तयार नाही. आज मी येताना अनेक मुस्लिम कार्यकर्ते स्वागतासाठी उभे होते. केवळ मुसलमान म्हणून मी त्यांना झिडकारून टाकू? आणि भाजपला मी सांगतोय, तुम्ही तुमच्या पक्षामध्ये, दारात बोर्ड लावा. तुमच्या पक्षात जेवढे मुस्लिम असतील त्यांना सांगा, तुम्हाला भाजपात स्थान नाही जा बाहेर, असा सवाल त्यांनी भाजपला विचारला. शिवसेनाप्रमुखांचे विचार सोडल्याचे म्हणतात. या देशातले सगळे मुसलमान हे देशद्रोही आहेत, असे शिवसेनाप्रमुख बोलल्याचे एक तरी वाक्य दाखवा. जो या देशाला आपला देश मानतो. जो माझा आहे. तो जाती-पाती धर्माने कोणीही असेल. या देशाला आपला मानतो तो माझा आहे, ही शिकवणूक शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला दिली. आणि हाच विचार घेऊन मी पुढे चाललो आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना ठणकावले.
‘शिवसेनेला हिंदुत्व शिकवणाऱया भाजपला नवाब मलिक यांचा पुळका आला. आता मुंबईत नवाब मलिक यांचा प्रचार मोदी करणार का?’ असा सवाल करीत, ‘एकीकडे आम्हाला हिंदुत्व शिकवता आणि दुसरीकडे सरसंघचालक मोहन भागवत, नरेंद्र मोदी जामा मशिदीमध्ये जातात. मेहबूबा मुफ्तीसोबत जातात. हेच का तुमचे हिंदुत्व?’ असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
याप्रसंगी शिवसेना सचिव, आमदार मिलिंद नार्वेकर, उपनेते शरद कोळी, उपनेत्या अस्मिता गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे, साईनाथ अभंगराव, काँग्रेसचे नेते प्रबुद्धचंद्र झपके, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकिळ, सोलापूर व बार्शी संपर्कप्रमुख उद्धव कुमठेकर, लोकसभा समन्वयक-माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, लोकसभा संघटक पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख अजय दासरी, गणेश वानकर, धनंजय डिकोळे, काशिनाथ बासूतकर, शशिकांत आगवणे, दत्ता गणेशकर उपस्थित होते.
‘वापरा आणि फेकून द्या’, ही भाजपची दळभद्री नीती असून, त्यांनी आतापासूनच देवेंद्र फडणवीस हे त्यांचे मुख्यमंत्री असतील हे सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आता मिंधे बसा भांडी घासत, हा डोंगुरवाला माती देईल. झाला तुमचा उपयोग संपला.
‘सर्किटभाई’ अमित शहांनी डोक्याला ब्राम्ही तेल लावावे
कश्मीरमधील 370 कलम रद्द करणाऱयांच्या बरोबर आज शिवसेना आहे, असे पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज म्हणाले. त्याला उद्धव ठाकरे यांनी यावेळी जोरदार प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, लगे रहो मुन्नाभाईमधल्या ‘सर्किट’सारखी अमित शहांची अवस्था झाली आहे. महाराष्ट्रात येऊन शेतकऱयांच्या मुद्दय़ांवर बोलण्याऐवजी ते कश्मीरमधील कलम 370 बद्दल बोलतात. अमित शहा यांना कदाचित स्मृतिभ्रंश झाला असावा. त्यांनी डोक्याला ब्राम्ही तेल लावावे, म्हणजे त्यांना आठवेल की, ज्यावेळी कलम 370 रद्द झाले त्या निर्णयाला शिवसेनेनेसुद्धा लोकसभेत समर्थन दिले होते, याची आठवण उद्धव ठाकरे यांनी आपल्या ठाकरी शैलीत करून दिली.
‘महाराष्ट्राचे अदानीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. सर्व उद्योग गुजरातला जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र विकू पाहणाऱया भाजपला हद्दपार केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही! महाराष्ट्राचे अदानीकरण खपवून घेणार नाही,’ असेही उद्धव ठाकरे यांनी ठणकावले।
भाजपा म्हणजे, ‘भामटा जगला पाहिजे’!
‘भाजपा म्हणजे, ‘भामटा जगला पाहिजे’! ये मोदी की गॅरंटी आहे. 70 हजार कोटींचा घोटाळा करणारे गुलाबी जॅकेट घातलेले अजित पवार व दाऊदशी व्यवहार करणारे नवाब मलिक यांच्यावर टीकेची झोड उठवणारे आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यांच्याबाबतचा ठोस पुरावा कुठे गेला, हे मोदी यांनी प्रचारास आल्यावर सांगावे,’ असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले.
मणिपूरातील हिंसाचार, कश्मीरमधील हल्ले संपवून दाखवा
मोदी, अमित शाह ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये भाषण करत होते. त्याचवेळेला मणिपूरमध्ये एका महिलेवर अत्याचार होत होता. 31 वर्षांची आदिवासी महिला. तीन मुलांची आई. घरामध्ये घुसून अत्याचार केला. एवढेच नाही तर त्यानंतर तिला जिवंत जाळून टाकण्यात आले. अद्याप आरोपींची ओळख पटलेली नाही. अमित शाह तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात. तुम्ही गृहमंत्र्यांसारखे वागले पाहिजे. तुम्ही उद्धव ठाकरेंना संपविण्यापेक्षा मणिपूरमध्ये जाऊन हिंसाचार थांबवून दाखवा. काश्मीरमध्ये सैनिकांवर होणारे हल्ले थांबवून दाखवा. जर हे तुम्हाला जमत नसेल तर मोदींनासुद्धा सांगतोय सोडा पंतप्रधानपद. तुम्हाला देशापेक्षा राज्याच्या निवडणुकीत तुमचा पक्ष जिंकावा हे महत्त्वाच वाटत असेल तर पंतप्रधानपद सोडा, गृहमंत्रिपद सोडा आणि जसं आम्ही फिरतोय, आमच्या पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून. तसंच मोदी आणि शहा यांनी भाजपचे स्टार प्रचारक म्हणून फिरले पाहिजे, अशी टीका त्यांनी मोदी आणि शहा यांच्यावर केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List