महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा! समृद्ध राज्य बनविण्याचा संकल्प
महाराष्ट्राचा विस्कटलेला गाडा सुरळीत करून पुन्हा शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचे सरकार आणायचेच, असा निर्धार महाविकास आघाडीने केला आहे. त्या निर्धाराचे प्रतिबिंब असलेला जाहीरनामा महाविकास आघाडीने आज प्रकाशित केला. त्याला ‘महाराष्ट्रनामा’ असे नाव देण्यात आले आहे. शेतकरी, महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक अशा समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचे वचन त्यात देण्यात आले आहे. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाच्या घोषणा त्यात आहेत.
हॉटेल ट्रायडंटमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत या महाराष्ट्रनामाचे प्रकाशन करण्यात आले. सत्तेत आल्यानंतर पहिल्या 100 दिवसांत महाविकास आघाडी कोणती कामे करणार आणि पाच वर्षांत काय काम करणार हे त्यात सविस्तर मांडण्यात आले आहे. 2030 पर्यंत समृद्ध महाराष्ट्र बनवण्याचा संकल्प या जाहीरनाम्यातून केला आहे. मिंधे सरकारच्या भ्रष्टाचाराने मलिन झालेल्या महाराष्ट्राला पूर्वपदावर आणण्यासाठी, महाराष्ट्राचा स्वाभिमान जोपासण्यासाठी, महाराष्ट्रधर्म पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी महाविकास आघाडीच्या बाजूने जनतेने काwल द्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
महाराष्ट्रात सर्व जातीधर्माचे लोक मुंबईकडे आर्थिकदृष्टय़ा, रोजगारासाठी, उत्पादन, गुंतवणुकीच्या दृष्टीने अपेक्षेने पाहतात. देशभरातून लोक मुंबईत स्वप्नं घेऊन येतात व मुंबई त्यांना सामावून घेते, त्यांच्या स्वप्नांचा बळ देते. मुंबईत आलेला कुणीही उपाशी मरत नाही. सामाजिक बदलातही महाराष्ट्र आघाडीवर असतो, असे खरगे म्हणाले.
खरगे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपच्या जाहीरनाम्याचाही खरपूस समाचार घेतला. कर्नाटक, राजस्थानातील काँग्रेसच्या योजनांची नक्कल भाजपने केली आहे, अशी टीका त्यांनी केली. राहुल गांधी यांनी संविधानाचे लाल रंगाचे पुस्तक दाखवले तर त्याला शहरी नक्षलवाद म्हणून भाजपवाले टीका करत आहेत; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लाल रंगाचे संविधान दिले होते असे सांगत त्याचे पह्टोही यावेळी खरगे यांनी दाखवले.
जाहीर केलेल्या योजनांसाठी बजेटची तरतूद कशी करणार, असा प्रश्न यावेळी खरगे यांना प्रसारमाध्यमांनी विचारला. त्यावेळी ते म्हणाले की, तुम्ही आम्हाला सरकार द्या. मी तुम्हाला बजेट देतो. कर्नाटकात पाच गॅरेंटीसाठी आम्ही 52 हजार कोटी ठेवले होते असे सांगताना, किती तरतूद केली आणि आतापर्यंत किती खर्च केले याची माहिती खरगे यांनी दिली.
याप्रसंगी काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, अविनाश पांडे, काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, खासदार अभिषेक मनु सिंघवी, प्रवीण खेरा, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, रिपब्लिकन पक्षाचे राजेंद्र गवई यांच्यासह शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पार्टी, समाजवादी पार्टीचे नेते उपस्थित होते.
महिला
– महिलांना बस प्रवास मोफत करणार.
– ‘निर्भय महाराष्ट्र’ धोरण आखणार, तसेच ‘शक्ती’ कायद्याची अंमलबजावणी करणार.
– 9 ते 16 वयोगटातील सर्व मुलींना गर्भमुख कर्करोग प्रतिबंधक लस मोफत देणार.
– बचत गट सक्षमीकरणासाठी स्वतंत्र विभाग.
– स्वतंत्र बाल कल्याण मंत्रालय स्थापन.
– सुरक्षित, स्वच्छ आणि हाकेच्या अंतरावर सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारणार.
– महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी सुरक्षित शहरे संकल्पना.
– नवजात मुलीच्या नावे रक्कम ठेवून 18 वर्षे पूर्ण केल्यानंतर एक लाख रुपये.
– एमपीएससीच्या माध्यमातून नोकरभरती.
– सरकारी जागांचा अनुषेश भरून काढणार.
महाराष्ट्राचा स्वाभिमान
– जगभरातील मराठी आणि महाराष्ट्रातील परभाषिकांना मराठी भाषा शिकविण्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन अभ्यासक्रम सुरू करणार.
– महायुतीने रखडविलेल्या चैत्यभूमी, दादर (इंदू मिल) येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकांचे काम निश्चित मुदतीत करण्यासाठी कृती आराखडा करणार.
– महायुती सरकारने पक्षपाती भूमिकेतून काढलेल्या अध्यादेशांचा फेरविचार करणार.
– महायुती सरकारने खासगी संस्था व व्यक्तींना भूखंड देण्याबाबत काढलेल्या आदेशांचा फेरविचार करणार.
– क्रांतिसूर्य महात्मा फुले, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांना ‘भारतरत्न’ प्रदान करण्याची आग्रही मागणी पेंद्र सरकारकडे करणार.
– राज्य सरकारला धोरणात्मक निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी ‘राज्य सल्लागार मंडळा’ची स्थापना करणार. विविध क्षेत्रांतील तज्ञांना यात सामावून घेणार.
स्वाभिमानी महाराष्ट्राने परिवर्तनाचा मानस बनवलाय – नाना पटोले
महायुती सरकारला गेल्या दीड वर्षात शेतकऱयांची आठवण आली नाही. आता निवडणुकीसाठी कर्जमाफीच्या वल्गना करू लागले आहेत, अशी टीका यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. महायुतीला आता पराभव समोर दिसू लागल्याने महागाई, बेरोजगारी, महिला, शेतकरी यांची आठवण झाली आहे. पण महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेने परिवर्तन करण्याचा मानस बनवला आहे, असे पटोले म्हणाले.
युवक व शिक्षण
– सुशिक्षित बेरोजगारांना 4 हजार दरमहा भत्ता
– ‘युवा आयोग’ची स्थापना करणार.
– ‘बार्टी’, ‘महाज्योती’ ‘सारथी’मार्फत आणि देण्यात येणाऱया शिष्यवृत्तीचा निधी वाढविणार.
– ‘एमपीएससी’ निकालदेखील 45 दिवसांत.
– ‘एमपीएससी’च्या सर्व परीक्षांसाठी एकदाच शुल्क आकारून युनिफाईड स्मार्ट कार्ड देणार.
– ‘महाराष्ट्र युवक रोजगार मिशन’ स्थापन करणार.
– ‘महाराष्ट्र ऑलिम्पिक मिशन’ राबविणार
– पेपरफुटीविरोधातील कायदा आणखी कडक करणार.
– प्रमुख विभागांमधील भरती प्रक्रिया ‘एमपीएससी’तर्फे राबविणार. ‘एमपीएससी’ची कार्यक्षमता वेगवान करण्यासाठी सदस्यसंख्या आणि कर्मचारी संख्या वाढविणार.
आरोग्य
– ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’ची व्याप्ती वाढविणार.
– विमा योजनांचा पुनर्विचार करून उपचार सुविधांचा विस्तार करणार.
– सरकारी रुग्णालयात मोफत औषधे उपलब्ध करून देणार.
– सार्वजनिक आरोग्य सेवा देणारी यंत्रणा विकसित करून आरोग्य सेवा हक्काचे धोरण स्वीकारणार.
– आरोग्य सेवा सहज अंतरावर उपलब्ध असतील यासाठी उपजिल्हा रुग्णालये.
शहर विकास
– हवामान बदलाचे संकट रोखणे आणि त्यासाठीच्या प्राधिकरण उपाययोजनांसाठी स्थापणार.
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणार. या निवडणुका एकसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेणार.
– ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि उपसरपंच यांचे थकीत मानधन व भत्ता देणार
महत्त्वाच्या तरतुदी
शेतकरी
– शेतकऱयांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफ करणार. नियमित कर्जफेडीस पन्नास हजारांची सूट.
– आत्महत्या रोखण्यासाठी उच्चस्तरीय समिती.
– आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विधवा, मुलांना सुविधा देण्यासाठी योजनांमध्ये सुधारणा करणार.
– आरोग्य, संरक्षण आणि हवामानबदलाचे संकट पेलण्यासाठी ‘महाराष्ट्र मिलेट मिशन’.
– खर्च लक्षात घेऊन दरवर्षी दूध दर निश्चिती.
– कांदा आणि टोमॅटोला संरक्षण देत राज्यात गुलाबी आणि शेंदरी क्रांती आणणार.
– स्वतंत्र कोरडवाहू शेती संचालनालय.
– पोटखराबा जमिनींच्या दुरुस्तीसाठी निधी देणार, त्याच्या नोंदी अद्ययावत करणार.
– पाणंद-शेतातील-शिव बारमाही रस्ते विकसित करणार. 10 हजार कोटींची तरतूद.
– शेतीवर अवलंबून असलेल्या लोकसंख्येचा भार कमी करण्यासाठी अन्यत्र संधी.
– दुष्काळ निर्मूलनासाठी, अतिवृष्टीमुळे होणाऱया नुकसानभरपाईसाठी ठोस कार्यक्रम देणार.
– शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणार, हवामान बदलाच्या परिणामांविषयी जागरूकता करणार.
– दुष्काळविषयक वार्षिक अहवाल तयार करून कृती आराखडा तयार करणार.
– शेतकऱयांना वारंवार नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागते. त्यासंदर्भात आकस्मिकता योजना तयार करणार.
– दुष्काळ किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे सलग तीन वर्षे पिकांचे नुकसान झाले तर चौथ्या वर्षी त्या शेतकऱयाचे कर्ज आपोआप माफ व्हावे ही ‘गोरेवाला समिती’ची सूचना अमलात आणणार.
– नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱयांचे नुकसान झाले असेल तर पीककर्जाला मुदतवाढ देण्याची रिझर्व्ह बँकेची मार्गदर्शक सूचना आहे. या सूचनेचे काटेकोर पालन करणार.
– राज्यात सर्वाधिक असणाऱया कोरडवाहू शेतीच्या विकासासाठी कोरडवाहू संचालनालय स्थापन करणार.
जनतेच्या हितासाठी
– दरमहा वीजवापर तीनशे युनिटपर्यंत असणाऱया ग्राहकांचे शंभर युनिटपर्यंतचे वीज बिल दरमहा माफ करणार.
– वीजग्राहकांचा विरोध लक्षात घेऊन प्रीपेड मीटर्स योजनेचा आढावा घेणार.
– सरकारी कर्मचाऱयांना जुनी पेन्शन योजना लागू करणार.
– वृद्ध कलावंतांचे मानधन वाढविणार.
– शिवभोजन थाळी योजना पेंद्रांची संख्या वाढविणार .
उद्योग-व्यवसाय
– नवे औद्योगिक धोरण आखणार, महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देणार.
– राज्यात सूक्ष्म व लघु उद्योगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करणार .
सामाजिक न्याय
– अनुसूचित जाती व आदिवासी विभागांचे हक्काचे बजेट निर्धारित कालमर्यादेत खर्च होण्यासाठी कायदा करणार.
– विविध समाजघटकांसाठी जाहीर झालेल्या सर्व नव्या महामंडळांना प्रत्येकी शंभर कोटी रुपयांचा प्रारंभिक निधी तातडीने देणार.
– संघटित व असंघटित सफाई कामगारांसाठी कल्याण महामंडळ स्थापन करणार.
– ‘संजय गांधी निराधार योजने’साठीची उत्पन्न मर्यादा 21 हजारांवरून वाढवून 50 हजार रुपये करणार. योजनेच्या लाभाची रक्कम दीड हजारांवरून वाढवून दोन हजार रुपये करणार.
– विधवा, परित्यक्ता, वृद्ध यांच्यासाठीच्या संजय गांधी निराधार, श्रावण बाळ इत्यादी सर्व योजनांचे सुसूत्रीकरण करणार.
महाराष्ट्राची निवडणूक देशाचे भविष्य बदलणारी ः खरगे
महाराष्ट्रनाम्यातील तरतुदींची यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर ते म्हणाले की, महाराष्ट्राची निवडणूक देशाचे भविष्य बदलणारी निवडणूक आहे. महाराष्ट्राच्या जनतेसाठी शेतकरी, तरुण, महिलांसाठी खोके सरकार सत्तेतून खाली खेचून महाविकास आघाडीचे आणा, असे आवाहन खरगे यांनी केले.
मोदी महाराष्ट्रात येत राहतील तोपर्यंत महाराष्ट्र अनसेफ ः संजय राऊत
महाराष्ट्र कधी कोणाचा गुलाम बनला नाही व बनणार नाही असे सांगतानाच, हा जाहीरनामा महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवणारा आहे, असे याप्रसंगी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्रात चोरांचे सरकार आहे आणि त्यांचे सरदार दिल्लीत बसले आहेत. सर्वात पहिले महाराष्ट्रातल्या चोरांना हटवा आणि नंतर दिल्लीतल्या चोरांना हटवा असे हा महाराष्ट्रनामा सांगतो. मोदी आणि अमित शहा सध्या महाराष्ट्रात ठाण मांडून बसले आहेत. ‘एक रहेंगे तो सेफ रहेंगे’ म्हणणारे नरेंद्र मोदी जोपर्यंत महाराष्ट्रात येत राहतील तोपर्यंत महाराष्ट्र अनसेफ राहील, असेही संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी…
– पाच वर्षांत साडेबारा लाख बेरोजगारांना रोजगार देणार
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेळापत्रक ठरवून निवडणुका घेणार
– सरकारी नोकऱयातील पंत्राटी भरती पद्धत बंद करणार
– शेतकऱयांना हमीभाव मिळवून देण्यासाठी वचनबद्ध राहणार, तसेच पीकविम्याच्या जाचक अटी काढून विमा योजना सुलभ करणार.
– नवीन औद्योगिक धोरणात रोजगार निर्मितीवर भर
जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने पावले उचलणार
‘महालक्ष्मी योजना’अंतर्गत महिलांना प्रतिमाह 3 हजार रुपये
महिलांना मासिक पाळीच्या वेळी स्वेच्छेने दोन दिवसांची रजा
महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करणार
शहरीकरणाचे आव्हान पेलण्यासाठी आणि त्याला योग्य दिशा देण्यासाठी ‘राज्य नागरी आयोग’ स्थापन करणार
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिलमधील स्मारकाचे काम पूर्ण करणार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉरिडॉर बनवण्याचाही महाविकास आघाडीचा संकल्प
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List