Pune News – चोरट्यांनी 30 ते 40 गोणी कांदा चोरला, ऐन दिवाळीत शेतकऱ्याला बसला आर्थिक फटका
गेल्या काही दिवसांपासून कांद्याला चांगला बाजारभाव मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातवरण आहे. मात्र, याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी कांदा चोरीवर आपले लक्ष केंद्रीत केले असून आंबेगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याचा 35 ते 40 गोणी कांदा चोरून नेला आहे. शेतकऱ्यांच्या लाल सोन्याकडे चोरट्यांनी मोर्चा वळविल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
आंबेगाव तालुक्यातील चांडोली बुद्रूक येथील शेतकरी अरुण निवृत्ती थोरात यांनी आपल्या मालकीच्या वेताळमळा परिसरात हवेशीर ठिकाणी आधुनिक पद्धतीने कांदा चाळ उभारून चाळीत एकूण 400 पिशवी कांदा साठवून ठेवला होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी 300 पिशवी कांद्याची विक्री केली होती. दिवाळी सणासाठी पैसे उपलब्ध व्हावेत म्हणून 100 कांदा पिशवी चाळीत साठवून ठेवला होता. मंगळवारी (29 ऑक्टोबर) सकाळी निवृत्ती पाटीलबुवा थोरात हे शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना कांदा चाळीच्या जमिनीच्या बाजूकडील बांबू काढून कांदे चाळीतून बाहेर काढल्याचे दिसून आले. चाळीतील कांदे अस्थाव्यस्थ अवस्थेत दिसले. त्यांनी मुलगा अरुण थोरात यांना विचारणा केली. त्यावेळी चाळीतील कांदे चोरीला गेल्याचे लक्षात आले.
सुमारे दोन टन कांद्यावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला ऐन दिवाळीत 70 ते 80 हजार रुपयांचा फटका बसला आहे. परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली असता सोमवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास चोरटे छोटा हत्ती गाडीतून कांदे चोरुन नेल्याचे दिसत आहे. याप्रकरणी शेतकरी अरुण थोरात यांनी मंचर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List