म्हातारा झालो नाही; सरकार घालवूनच स्वस्थ बसणार! – शरद पवार
अजून मी म्हातारा झालो नाही. महाराष्ट्रातील सत्ता बदलल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा वज्रनिर्धार आज राष्ट्रवादी काँग्रसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला. लोकसभेत 48 पैकी महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून देऊन जनतेने संविधान वाचवण्याचे काम केले. तसेच राज्यातील सत्ता बदलासाठी मला तुमची साथ हवी आहे, अशी भावनिक सादही त्यांनी मतदारांना घातली.
महाविकास आघाडीचे भूम-परंडाचे उमेदवार राहुल मोटे यांच्या प्रचारार्थ परंडा येथील प्रचारसभेत ते बोलत होते. या सभेला खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित पाटील आदी उपस्थित होते. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, संविधान बदलण्यासाठी 400 खासदारांची आवश्यकता असते, म्हणून मोदींनी लोकसभा निवडणुकीत ‘400 पार’चा नारा दिला होता. एक वर्षापूर्वी आम्ही केंद्रातील सरकार बदलण्यासाठी दिल्ली येथे इंडिया आघाडीची स्थापना केली. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने 48 पैकी 31 जागा महाविकास आघाडी म्हणजेच इंडिया आघाडीच्या निवडून दिल्या. मोदींचा विजयरथ रोखण्याचे आणि संविधान वाचविण्याचे काम महाराष्ट्रातील जनतेने केले आहे. आताही विधानसभेची निवडणूक आहे. राज्यात आपल्या विचाराचे, आपल्या माणसासाठी काम करणारे सरकार बसवायचे आहे. अजून मी म्हातारा झालो नाही, महाराष्ट्रातील सत्ता बदलायची आहे, त्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असेही ते म्हणाले.
तुरुंगात जावे लागणार म्हणून मोदींना सलाम
राज्याची सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांना राज्याचे हित नको आहे. काही लोकांनी विकासाचे कारण देत साथ सोडल्याचे सांगितले. मात्र अनेकांनी तुरुंगात जाण्याऐवजी मोदींच्या समोर जाऊन सलाम करणे हाच पर्याय निवडला असे सांगत राज्यातील सत्तांतर व फोडाफोडीच्या राजकारणावर पवारांनी टीका केली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List