विशेष – हिंदुस्थानी नृत्यांचा वैश्विक महाकुंभ

विशेष – हिंदुस्थानी नृत्यांचा वैश्विक महाकुंभ

<<<प्रा. डॉ. प्रकाश खांडगे>>>

हिंदुस्थानातील सर्व प्रमुख शास्त्राीय नृत्य शैली, तसेच लोकनृत्य शैलींचे दर्शन घडविणारा महोत्सव नुकताच 16 ते 21 ऑक्टोबर या कालावधीत नवी दिल्लीत पार पडला. हिंदुस्थानी नृत्यांचा वैश्विक महाकुंभ असेच वर्णन सार्थ ठरविणाऱ्या या महोत्सवात विविध नृत्य शैलींवर अभ्यासकांचे विचारमंथनही झाले. हजारो कलावंतांनी हिंदुस्थानी लोकनृत्य आणि आदिवासी नृत्यांचे दर्शन या महोत्सवात घडविले. एकूणच हिंदुस्थानी नृत्य शैलीतील शास्त्रधाटी आणि लोकधाटी यांचा गंगा-यमुना संगम म्हणजे हा वैश्विक नृत्याचा महाकुंभ अद्वितीय असा ठरला.

हिंदुस्थानी संस्कृती आणि कलेच्या क्षेत्रात संपूर्ण विश्वाचे लक्ष वेधून घेणारा हिंदुस्थानी नृत्यांचा वैश्विक महाकुंभ 16 ते 21 ऑक्टोबर या कालावधीत देशाच्या राजधानीत नवी दिल्लीत आयोजित झाला होता. या नृत्य महाकुंभाचे यशस्वी आयोजन भारत सरकारची सांस्कृतिक क्षेत्रातली सर्वोच्च स्वायत्त संस्था ‘संगीत नाटक अकादमी’ तसेच ‘आयसीसीआर’ आणि ‘ललित कला अकादमी’ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या आयोजनात ‘संगीत नाटक अकादमी’च्या अध्यक्षा, आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या ज्येष्ठ नृत्य विदुषी डॉ. संध्या पुरेचा यांनी पुढाकार घेतला होता. हिंदुस्थानी नृत्यांवर प्रेम करणारे जगभरातील विदुषी, विद्वान, अभ्यासक आणि कलावंत या नृत्याच्या महाकुंभामध्ये सहभागी झाले होते.

1960 च्या दशकानंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदुस्थानी नृत्यांचे हे महासंमेलन आयोजित झालेले होते, ज्यात भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयासोबत पर्यटन मंत्रालयानेदेखील सहभाग दाखविला होता. देशाचे सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते या वैश्विक नृत्य महाकुंभाचे उद्घाटन 16 ऑक्टोबर रोजी झाले. प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या नृत्य विदुषी पद्मविभूषण पद्मा सुब्रमण्यम उपस्थित होत्या. तसेच पद्मविभूषण डॉ. सोनल मानसिंगदेखील प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

‘ओडिसी नृत्यातील भूतकाळ आणि वर्तमान काळ’ या पहिल्या सत्राचे अध्यक्षपद डॉ. सोनल मानसिंग यांनी भूषविले, तर दुसऱ्या सत्रामध्ये ‘नृत्याचा मूलस्रोत आणि वाटा’ या सत्राचे अध्यक्षपद पद्मविभूषण पद्मा सुब्रमण्यम यांनी भूषविले. हिंदुस्थानी नृत्य शैलीतील कथक नृत्याचे तिसरे सत्र ‘कथकचा भूतकाळ आणि वर्तमान काळ’ या विषयावर गुंफलेले होते. उमा शर्मा यांनी या सत्राचे उद्घाटन केले आणि कथक गुरू पुरू दधिच यांनी या सत्राचे अध्यक्षपद भूषविले. ‘हिंदुस्थानी नृत्यातील युवक आणि त्यांचे योगदान’ या विषयावरील चौथ्या सत्राचे उद्घाटन जया रमा राव यांनी केले, तर प्राणिमा पांडे यांनी या सत्राचे अध्यक्षपद भूषविले.

‘हिंदुस्थानी लोकनृत्याचे सातत्य आणि विविधता’ या पाचव्या सत्राचे अध्यक्षपद संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष पद्मश्री जोरावर सिंग जाधव यांनी भूषविले. गोव्यातील लोकसाहित्य, लोककलांचे ज्येष्ठ अभ्यासक पद्मश्री विनायक खेडेकर, डॉ. प्रकाश खांडगे, आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या राजस्थानमधील कालबेलिया नर्तिका गुलाबो, तसेच गुजरातमधील लोकनृत्य विदुषी पारुल शहा, तसेच भगवानदास पटेल यांनी या परिसंवादात भाग घेतला होता. लोकनृत्य हे पारंपरिक मुख्यत मौखिक स्रोतांतून समूहाने सादर केलेले असते. ते सहजस्फूर्त, उत्स्फूर्त असते. त्यात एका बाजूला परंपरा काठिन्य असते, तर दुसऱ्या बाजूला ते परिवर्तनशील आणि नित्यनूतन असते असे विचार या परिसंवादात व्यक्त झाले. या परिसंवादाची उत्स्फूर्तता इतकी उंचीला पोहोचली होती की, पारुल शहा यांनी गरबा नृत्याचे प्रात्यक्षिक दाखविले. गुलाबो यांनी कालबेलिया नृत्याचे प्रात्यक्षिक दाखविले, तर मी स्वत आणि डॉ. सुखदा खांडगे, तसेच डॉ. गणेश चंदनशिवे यांनी पंढरीच्या वारीचे प्रात्यक्षिक दाखविले.

भारत सरकारचे पर्यटन राज्यमंत्री सुरेश गोपी हेदेखील या महोत्सवाला उपस्थित होते. समारोपाच्या समारंभात उपराष्ट्रपती जगदीप धनकड, तसेच सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि संसद सदस्य प्रख्यात नृत्य विदुषी सिनेतारका हेमा मालिनी उपस्थित होत्या. हिंदुस्थानातील जवळ जवळ सर्वच प्रमुख शास्त्रीय नृत्य शैली, तसेच लोकनृत्य शैलींचे दर्शन या महोत्सवात झाले. इतकेच नव्हे तर या नृत्य शैलींवर अभ्यासकांचे विचारमंथनही झाले. भरतनाट्यम, कथक, मोहिनीअट्टम, कथकली, मणिपुरी, ओडिसी अशा विविध शास्त्रीय नृत्य शैली, तसेच हिंदुस्थानच्या विविध राज्यांतील लोकनृत्यांचे उदाहरणार्थ – पंजाबचा भांगडा, राजस्थानचा कालबेलिया, गुजरातचा दांडिया-गरबा रास, महाराष्ट्राचे लावणी नृत्य, बोहाडा असे विविध लोकनृत्य प्रकार या महोत्सवात सादर झाले.

दिवसभर परिसंवाद आणि सायंकाळी हिंदुस्थान तसेच अन्य देशांतील नृत्य प्रकार असे एकूण नृत्य महाकुंभाचे स्वरूप होते. यातील उत्तर अमेरिकेतील न्यू जर्सी येथे वास्तव्यास असलेल्या प्रख्यात कथक नर्तिका आणि दिवंगत गुरू आशा जोगळेकर यांच्या सुकन्या अर्चना जोगळेकर यांनी त्यांच्या अमेरिकास्थित विद्यार्थिनींसह कथक नृत्याचा विलोभनीय आविष्कार या महोत्सवात घडविला. अर्चना जोगळेकर यांनी हिंदुस्थानातील चित्रपट आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांचे ग्लॅमरचे विश्व सोडून अमेरिकेत विविध शास्त्रीय नृत्यांचे प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत. त्याला अमेरिकेतील विद्यापीठांनी परीक्षेचा दर्जा दिला आहे. प्राची भागवत आणि विदेशी नर्तिका यांनी ‘क्रॉस वर्ड’ नावाचे फ्युजन नृत्य सादर केले, त्यालाही रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आंतरविद्याशाखीय नृत्य शैली नेमक्या कशा असतात याचा वस्तुपाठच या महोत्सवातून घडला.

भरतनाट्यम, कुचिपुडी, मणिपुरी, ओडिसी, सत्रिया, कुडीआट्टम, मोहिनीअट्टम अशा विविध नृत्य शैलींचे दर्शन या महोत्सवात घडले. सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, अमेरिका अशा देशांमधून हे दर्शन घडले. याशिवाय सुमारे हजारो कलावंतांनी हिंदुस्थानी लोकनृत्य आणि आदिवासी नृत्यांचे दर्शन या महोत्सवात घडविले. एकूणच हिंदुस्थानी नृत्य शैलीतील शास्त्रधाटी आणि लोकधाटी यांचा गंगा-यमुना संगम म्हणजे हा वैश्विक नृत्याचा महाकुंभ. याची संकल्पना ज्येष्ठ नृत्यगुरू डॉ. संध्या पुरेचा यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने यशस्वीरीत्या राबविली. ‘नोहे एकल्याचा खेळ, अवघा मेळविला मेळ’ असेच जणू या नृत्य महाकुंभाचे वर्णन करता येईल. संगीत नाटक अकादमीचे सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नातून, तसेच संस्कृती मंत्रालयाच्या उमानंदुरी अनिश राजन आणि अमिताजी यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे यशस्वी आयोजन झाले.

यातील काही महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करायला हवेत ते असे, भरतनाट्यम व कुचिपुडी नृत्यातल्या विविध शैली, नृत्यातील आणि नृत्यसंरचनेमधील पारंपरिक पद्धती, आदिवासी व लोकनृत्यातील विविधता, कथकलीवर चर्चा, नृत्याच्या क्षेत्रातील सृजनात्मक अर्थकारण, नीतिमूल्य, आदिवासी नृत्य, लोकनृत्यातील सातत्य आणि विविधता, मणिपुरी व सत्रिया हे नृत्यप्रकार, लोकनृत्य आणि आदिवासी नृत्य, नृत्य परंपरेतील अन्य नृत्य शैली, नृत्य शैलीत युवकांपुढील आव्हाने, हिंदुस्थानी नृत्यात व्यवसाय म्हणून असलेले अडथळे आणि त्यावरील उपाय अशा विविध विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आले होते. परिसंवादात त्या त्या क्षेत्रातील मान्यवरांच्या सहभागासह अतिशय सखोल चर्चा झाली. यात शेवटच्या दिवशी ‘नृत्यातील मीमांसा’ या विषयावर आधारीत परिसंवादात नृत्याच्या आंतरविद्याशाखीय पद्धतीमुळे नृत्याच्या मूळ परंपरेला बाधा येते का, नृत्याच्या स्वामित्व हक्क पद्धती, शालेय पातळीपासून थेट गुरुकुल परंपरेपर्यंत हिंदुस्थानी नृत्याचा विस्तार आदी विषयांवर अतिशय सखोल चर्चा झाली. यातल्या बहुतांश परिसंवादांचे अध्यक्षपद तसेच सूत्रसंचालन संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा, भरतनाट्यमच्या नृत्य विदुषी आणि गुरू पार्वतीकुमार यांच्या शिष्या डॉ. संध्या पुरेचा यांनी भूषविले होते.

हिंदुस्थानला नृत्याची श्रेष्ठ परंपरा आहे. नंदिकेश्वरांचा ग्रंथ, तसेच ‘नृत्य रत्नावली’सारख्या ग्रंथांचे आपल्याला विस्मरण होऊ शकत नाही. आर्थिक महाशक्तीसोबत हिंदुस्थान आता सांस्कृतिक महाशक्ती होऊ लागला आहे. त्याचा तुम्हाला, आम्हाला सार्थ अभिमान आहे, असे संस्कृती मंत्रालयाचे मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले आणि संत मीराबाईंच्या कवनानी रसिकांना मंत्रमुग्ध केले. तर नृत्य म्हणजे भाव आणि अर्थ यांचा सुंदर संगम गीत गोविंदचे योगदान आपण विसरू शकत नाही, असे पद्मविभूषण सोनल मानसिंग यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले. डॉ. शमा भाटे यांनी नृत्य आणि अमूर्त सांस्कृतिक ठेवा यासंदर्भात आपले विचार व्यक्त केले.

हिंदुस्थानी नृत्य शैलींना विशेषत शास्त्रीय नृत्य शैलींना गुरू-शिष्य परंपरेचा शेकडो वर्षांचा आणि पिढ्यान्पिढ्यांचा भक्कम आधार आहे. या आधारशिलेवर नृत्याची परंपरा सुरू असली तरी नव्या पिढीला शास्त्रीय नृत्याला काहीतरी वेगळा आयाम द्यावासा वाटत आहे. शालेय शिक्षणापासून ते थेट विद्यापीठ पातळीपर्यंत शास्त्रीय नृत्याच्या पारंपरिक शिक्षणासोबत नावीन्यपूर्ण नृत्यसंरचना उभारली जावी अशी आग्रही भूमिका युवा पिढीने घेतली आहे. त्याचे दर्शन या नृत्य महाकुंभात झाले. 1958 साली पहिला आंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सव आयोजित झाला होता. त्यानंतर फार मोठ्या कालखंडानंतर देशाच्या राजधानीत हा महोत्सव आयोजित झाला. दिल्लीतील इंद्रपुरी येथील ए. पी. शिंदे सभागृहात परिसंवादांचे आयोजन आणि कमानी सभागृहात नृत्य महोत्सवाचे आयोजन असे या नृत्य महाकुंभाचे नियोजन करण्यात आले होते. देशाच्या राजधानीत आयोजित करण्यात आलेला हा भव्य नृत्य महाकुंभ केवळ देशातील कलावंतांनाच नव्हे तर, संपूर्ण जगतातील नृत्यसाधकांना नवी दिशा देणारा ठरला.

या नृत्य महाकुंभाचे मंथन झाल्यानंतर मान्यवरांनी व्यक्त केलेल्या काही मतैक्यांचे लोणी निघाले ते असे, वयाच्या साठाव्या वर्षांनंतर नृत्य परंपरेत गुरू ही उपाधी लावली जावी. पैसे देऊन नृत्य करणे ही पद्धत गैर आहे. नृत्य क्षेत्रातील युवा पिढीला योग्य त्या मार्गदर्शनाची गरज आहे. गुरू-शिष्य परंपरेच्या मानसिकतेसोबतच आंतरविद्याशाखीय नृत्य क्षेत्रातील नवनवे प्रयोग गरजेचे आहेत. नृत्यक्षेत्राची समृद्धी या क्षेत्राच्या विस्तारात आणि प्रयोगाशीलतेत आहे. शालेय प्राथमिक वर्गांपासून थेट विद्यापीठ पातळीपर्यंत नृत्य प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. नृत्य गुरूंना आणि युवकांना शासकीय पाठ्यवृत्त्या-अभ्यासवृत्त्या प्राप्त झाल्या पाहिजेत. राष्ट्रीय पातळीवर खेळाडूंना जशा विविध सवलती मिळतात, तशा सवलती नृत्य क्षेत्रातील पुरस्कारप्राप्त कलावंतांना मिळाल्या पाहिजेत. तसेच नोकऱ्यांसह अनेक आस्थापनांमध्ये संधी प्राप्त झाल्या पाहिजेत. एकूणच संपूर्ण जागतिक पातळीवर नृत्याची सनद तयार करण्यात आली पाहिजे आणि तिची अंमलबजावणी झाली पाहिजे. देशाच्या राजधानीत आयोजित झालेल्या या वैश्विक नृत्य महाकुंभामुळे सांस्कृतिक क्षेत्रात महासत्ता होण्याच्या हिंदुस्थानच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

[email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Sanjay Raut : महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात गौतम अदानींचा हात? शाह-फडणवीस-पवार बैठकीवर संजय राऊत यांचा थेट घणाघात Sanjay Raut : महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात गौतम अदानींचा हात? शाह-फडणवीस-पवार बैठकीवर संजय राऊत यांचा थेट घणाघात
राज्य विधानसभा निवडणुकीत मतदानाची तारीख जवळ येत आहे. तसंतसे नवनवीन ट्विस्ट समोर येत आहे. अजितदादा यांच्या कालच्या स्फोटक मुलाखतीनंतर आता...
दुश्मन एकत्र येतात तर आम्ही का नाही? राज ठाकरे यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ, उद्धव ठाकरे यांना केले मोठे आवाहन
पैशांसाठी म्हाताऱ्याशी लग्न केलं; जुही चावलाची उडवली होती खिल्ली, सत्य जाणून तुम्हीही व्हाल भावूक!
Train Accident – तेलंगणातील पेड्डापल्लीमध्ये रेल्वे अपघात, 11 डबे रुळावरुन घसरले
Sunita Williams Health – माझी तब्येत ठिक…सुनीता विल्यम्सने तब्येतीबाबत दिली माहिती
गुजरातमधील रुग्णालयाचा प्रताप, आयुष्यमान योजनेच्या लाभासाठी 19 जणांची अँजिओप्लास्टी; दोघांचा मृत्यू
Video – उद्धव ठाकरे यांची तोफ धाराशिवमध्ये धडाडली