हा महाराष्ट्र मोदी आणि शहांना दिल्लीतून हाकता येणार नाही, लातूरमध्ये उद्धव ठाकरे कडाडले
गद्दारी करून सरकार पाडलं, त्याच गद्दारीचा सूड उगवायचा आहे, लातूरमध्ये उद्धव ठाकरे असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला तसेच हा महाराष्ट्र मोदी आणि शहांना दिल्लीतून हाकता येणार नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
लातूरमधल्या औसा तालुक्यात उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी मिंधे आणि भाजपचा समाचार घेतला. उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण गद्दारांसोबत लढतोय, माझ्यासोबत मुठभर का होईना पण निष्ठावंतच पाहिजेत. तुम्ही माझं नाव चोरलं, पक्ष चोरला, चिन्ह चोरला पण माणसं कशी चोरणार? गद्दार चोरले पण माणसं नाही फोडू शकले. आता येताना परत माझी बॅग तपासली. निवडणूक आयुक्तांना मी सांगतोय की जर तुमच्याकडे जास्त माणसं असतील तर एक गाडी द्या त्यात माझी कपड्यांची बॅग त्यात ठेवा आणि माझे कपडेही धुवा माझं काही म्हणणं नाही, माझ्याकडचं ओझं कमी होईल. सकाळी आंघोळ केल्यानंतर ते कपडे परत द्या नाही तर तेसुद्धा ढापाल. हा दरीद्रीपणा आहे. बॅग तपासण्यावर माझा काही आक्षेप नाही. काल माझी बॅग तपासली आजही बॅग तपासली. माझी फोटोग्राफी बंद झाली होती ती परत सुरू झाली यापेक्षा आनंद काय दुसरा? असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
आज मुलाखत घेताना मुलाखतकार म्हणाला की साहेब तुमचा कॅमेरा स्थिर आहे. मी म्हणालो हो आमचं सगळचं स्थिर आहे, माझं सरकारही स्थिर होतं, यांनी नालायकापणा केला नसता तर ते पाच वर्ष टिकलंही असतं. जो कायदा आम्हाला लागू होतो तोच कायदा मोदी आणि शहांना का लागू होत नाही ? नरेंद्र मोदी स्वतःला पंतप्रधान मानतच नाही. कारण पंतप्रधान कोणत्याही पक्षाचा नसतो देशाचा असतो. गृहमंत्रीसुद्धा देशाचा असतो पक्षाचा नाही. शपथ जी आपण घेतो त्यात म्हटलं असतं की पक्षपाती करणार नाही, उजवं डावं करणार नाही. मोदी पंतप्रधानपदाच्या आणि शहा गृहमंत्र्यांच्या खुर्चीवर बसायला लायक नाही आहात. कारण हे दोघे देशाचे का सोडून पक्षाचे काम करण्यासाठी महाराष्ट्राच्या गल्लीबोळात फिरत आहेत.
2014 ला त्यांनी किती थापा मारल्या. 15 लाख देऊ असे म्हणाले होते. मला एकही माणूस असा भेटला नाही की त्याला 15 लाख रुपये मिळाले आहेत. औसा इथे एकतरी माणूस आहे का ज्याच्या खात्यात 15 लाख रुपये टाकलेत अभिमन्यू पवार सोडून. बोलले होते 15 लाख आणि माता भगिनींना देत आहेत 1500 रुपये. आणि तरुणांना ते सुद्धा नाही. दरवर्षी दोन कोटी रोजगार देणार होते, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होणार होतं, पिकाला भाव मिळणार होता. पण फक्त घोषणांचा पाऊस आणि प्रत्यक्ष दुष्काळ.
सोलापुरात आज पंतप्रधान मोदींची सभा आहे. माझे आव्हान आहे की त्यांना की महाराष्ट्राच्या हिताबद्दल बोला. दरवेळी उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरेंना तुम्ही संपवलत ना मग अजून का घाबरता उद्धव ठाकरेंना?
आज सोलापुरात जायचं होतं हेलिकॉप्टरने. पंतप्रधा मोदी येणार होते म्हणून जाऊ नाही दिलं. मोदी येणार म्हणून सर्व विमानतळ बंद करतात. ज्या रस्त्याने जाणार तो रस्ता नागरिकांसाठी बंद करणार. मग हे टिकोजीराव येणार आणि म्हणणार भाईयो और बेहनो. ही लोकशाही मी मानायला तयार नाही. ही लोकशाही असूच शकत नाही. जर माझी बॅग तपासली जात असेल तर त्यांचीही बॅग तपासली गेलीच पाहिजे. जशी येताना माझी बॅग तपासता तशी मोदी शहा यांची महाराष्ट्रातून जाताना बॅग तपासून घ्या. कारण हे लोक महाराष्ट्र लुटून कुठे घेऊन जातात हे माहित आहे तुम्हाला.
मग पुन्हा यांन निवडून देणार आहात? भाजप असो वा मिंधे. महायुतीला मत म्हणजे गुजरातला मत असं म्हटलं तर काय चुकीचं म्हटलं मी. शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी दिली होती. आता कर्जमाफी सुद्धा मिळत नाही आणि पीकविमाही मिळत नाही. कुठलीही भरपाई नाही पण जीएसटी मात्र तुमच्याकडून कचकून घेतात. नैसर्गिक आपत्ती आली तर पिकाचे हमीभाव खाली वर होतात, तुमचं पीक सडून जातं. पण तुमच्या पीकाचे उत्पन्न खर्च कितीही असला तरी पीकविम्याच्या नावाने 28 रुपयांचा चेक देतात.
आता लाडक्या बहीणीली 1500 रुपये देत आहेत. हे तीन भाऊ एक दाढीवाला भाऊ, एक देवा भाऊ आणि एक जॅकेटवाला भाऊ. तिघेही मिळून महाराष्ट्र खाऊ. दिनकररावांनी इथल्या आमदाराच्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचला, अडीच वर्षात एक अभिमन्यू, चाळीस गद्दार, अजित पवारांचे आमदार आणि भाजपच्या आमदारांनी महाराष्ट्र किती लुटला असेल त्याचा हिशोब करून बघा. मिंधेंनी ताळतंत्र सोडूनच दिला आहे, जाऊ तिथे खाऊ हेच त्यांच घोषवाक्य आहे. मुंबईतसुद्धा रस्त्याची कंत्राट ही चढ्या दरानं काढली होती. कारण कंत्राटदारांकडून टक्केवारी हवी होती. त्यांचं भांड आपण फोडलं. दीड वर्षांपूर्वी पंतप्रधान मुंबईत आले होते, त्यांनी अनेक रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ केला. काही काही कामं जी आपण केली होती त्यावरच नारळ फोडून त्यांनी पुन्हा शुभारंभ केला. हे मूळ काम कितीचं होतं आणि किती कोटींनी वाढलं याचं भांडं आपण फोडलं. हे सगळे पैसे मिंध्यांच्या कंत्राटदाराच्या खिशात जात आहेत.
हा महाराष्ट्र मोदी आणि शहांना दिल्लीतून हाकता येणार नाही. या महाराष्ट्राने जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा क्रांतिकारक दिलेत. स्वातंत्र्यासाठी महाराष्ट्राने जेवढा त्याग केला आहे, तो महाराष्ट्र देश वाचवण्यासाठी अग्रेसर राहिला आहे. मोदी आणि शहा हा महाराष्ट्र खतम करायला निघालेत.
हे लोक आता योजना आणत आहेत. गेल्या दोन अडीच वर्षात काय केलं यांनी, द्यायचं असतं तर तेव्हाच दिलं असतं. आनंदाचा शिधा कुणाला मिळाला आहे का? ज्यांना नाही मिळाला ते नशीबवान आहेत. त्या आनंदाच्या शिधामध्ये अळ्या उंदरांच्या लेंड्या, कुठे झुरळ. या एकनाथाचा आनंद होता ज्यात लोकांना अळ्या खायला घालतो. हा यांचा आनंद आणि यांना पुन्हा डोक्यावर घेऊन नाचायचं? मनोहर जोशी जेव्हा मुख्यमंत्री होते तेच आम्हाल परत करून दाखवायचंय. पाच जीवनावश्यक वस्तू तेल, तांदूळ, गहू, साखर आणि डाळ या पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार आहोत, ते ही शेतकऱ्यांचा एक रुपयांचाही नुकसान न करता.
बदलापूरमध्ये दोन मुलींवर अत्याचार झाला होता. त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी म्हणून लोक रस्त्यावर उतरले होते. त्या आंदोलकांवर गुन्हे टाकले होते, मला नाही वाटत त्यांच्यावरी गुन्हे मागे घेतले असतील. पण या पाचही जणांनी त्या पीडीतेच्या माऊलीच्या घरी जावे आणि योजनेचे 1500 रुपये देऊन दाखवावे. काय उपयोग आहे त्या 1500 रुपयांचा. अब्रू लुटली जात असेल तर त्या 1500 रुपयांचे करायचे काय? महिलांची सुरक्षा जिथे सुरक्षा धोक्यात आहे, तिकडे पैसै काय करणार? म्हणून महाराष्ट्रात आपण महिला पोलिसांची भरती करणार आणि महिला पोलीस स्टेशन्स सुरू करणार.
पहिल्या वर्षी शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतं. आणि निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करायचं ठरवलं होतं. पण महाराष्ट्र लुटायचं होतं म्हणून सरकार पाडलं. त्यांना माहित होतं की महाराष्ट्र लुटण्याच्या आड कोणी येत असेल तर ती हिंदुहृदयसम्राट यांची शिवसेनाच येऊ शकते, उद्धव ठाकरेच येऊ शकते सोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहेतच. मोदी आणि शहांनी हा शिवसेनेच्या मुळावर घाव नव्हे तर हा महाराष्ट्राच्या मुळावर घाव घातला आहे.
हम महाराष्ट्र को लुटेंगे और दोस्तोंको बाटेंगे भाजपची ही घोषणा आहे आणि तेच ते करत आहेत. भारतीय जनता पक्ष म्हणजे हा भाकड आणि भेकड जनता पक्ष आहे. कारण हे काहीही निर्माण करू शकले नाही. चोर, दरोडेखोर, मिंधे, ईडी आणि सीबीआय अशी त्यांची महायुती आहे.
लोहा कंधारमध्ये एकनाथ पवारच आपले अधिकृत उमेदवार आहेत, यात कुठलाही संभ्रम नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. काँग्रेस असो वा शरद पवार यांच्यासोबत उघडपणाने एकत्र आलो. मी हतबद्ध होतो, माझ्या शरीराची हालचाल बंद झाली होती. रात्री अपरात्री मिंधे आणि फडणवीसांनी भेटून आपलं चांगलं चाललेलं सरकार गद्दारी करून पाडलं. आता त्या गद्दारीचा सूड उगवायचा आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर आपल्या मुलाबाळांना खुशाल मुंबईला पाठवा, त्यांच्या सुरक्षेची जबाबादारी माझी. पण हे करायचं असेल तर आधी इथला लोकप्रतिनीधी मुंबईला पाठवा असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List