हरयाणातील पुनरावृत्ती महाराष्ट्रात टाळायची असेल तर, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करा; ‘आप’ नेत्याचं मोठं विधान
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभांना तुफान गर्दी होत असून झंझावात सुरू आहे. उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रात वाढता प्रतिसाद पाहता आता आम आदमी पार्टीच्या एका बड्या नेत्याने मोठे विधान केले आहे. महाराष्ट्रात हरयाणासारखी घटना टाळायची असेल तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करा, असे विधान ‘आप’च्या नेत्याने केले आहे. ‘आप’चे नेते संजय सिंह यांनी ही मागणी केली असून त्यामागची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली आहे.
हरयाणा विधानसभा निवडणुकीत जे गैरप्रकार घडले त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात टाळायची असेल तर महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित करावे, अशी मागणी आम आदमी पार्टीचे नेते, राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांनी केली आहे. संजय सिंह यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. संजय सिंह यांनी ‘एबीपी माझा’ला मुलाखत दिली. तसेच हे आपले वैयक्तिक मत असल्याचेही ते म्हणाले.
मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नंतर जाहीर केला तर एकमेकांचे आमदार महाविकास आघाडीत फूट पाडू शकतात, हरयाणामध्येही असेच झाले. काँग्रेसचे गट एकमेकांना पाडायला निघाले होते. त्यात काँग्रेसचे नुकसान झाले. त्यामुळे महाविकास आघाडीने नंबरच्या खेळात अडकू नये. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये जबरदस्त काम केले आहे. मराठी माणूस, मराठी स्वाभिमान या गोष्टीसुद्धा त्यांच्यासोबत जोडल्या जातात. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवलं तर महाविकास आघाडीचा फायदा होईल, हे माझं वैयक्तिक मत आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा केलं तर मतांची फोडाफोडी कमी होऊ शकते, असे संजय सिंह यांनी म्हणाले.
महाराष्ट्रामध्ये जे तोडफोडीचे राजकारण झाले ते सगळ्यांनी पाहिले आहे. भाजपने महाराष्ट्रातसोबत सावत्र आईसारखा व्यवहार केला. अनेक योजना, प्रकल्प पंतप्रधान आपल्या गृहराज्यात घेऊन गेले. एका राज्याचे नुकसान करून हे करणे योग्य नाही. भाजपने तर पक्ष चोरला, जिथे पक्ष चोरला जिथे इक्बाल मिरची सोबत संबंध असलेल्यांना सोबत घेतलं. अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना सोबत घेतलं. हे सगळं लोकांना माहिती आहे, अशी सडकून टीका संजय सिंह यांनी केली.
दहा वर्षानंतर तुम्ही म्हणता ‘एक है तो सेफ’ आहे. पंतप्रधानांना अशी भाषा शोभा देते का? तुम्ही जर हिंदूंना सुरक्षित ठेवत नसाल तर तुम्ही राजीनामा द्या. पंतप्रधान जर सुरक्षित ठेवू शकत नसेल त्यांनी राजीनामा द्यावा. ‘बटेंगे तो कटेंगे’ हा काय नारा आहे? अगर बटेंगे संविधान खतरे मे आ जायेगा, आरक्षण खतम हो जाएगा… ना बटिये ना कटीये मिलके बीजेपी को रपटिये, असेही संजय सिंह यांनी ठणकावले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List