महायुतीचा कोल्हापुरात फ्लॉप शो! शिंदे, फडणवीस, पवारांच्या सभेकडे जनतेची पाठ
आकर्षक व भव्यदिव्य नियोजन करूनही मंगळवारी (दि. 5) सायंकाळी महायुतीच्या प्रचाराच्या शुभारंभ सभेकडे स्वाभिमानी कोल्हापूरकरांनी अक्षरशः पाठ फिरवली. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पालकमंत्री हसन मुश्रीफ, पेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आदी महायुतीचे दिग्गज मंत्री व खासदार -आमदार असतानासुद्धा व्हीआयपी रांगेतील खुर्च्या रिकाम्याच होत्या. अजित पवार, फडणवीस यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना भरसभेतून नागरिक निघून गेल्यामुळे हा शो फ्लॉप झाला. यामुळे महायुतीच्या नेत्यांच्या चेहऱयावर चांगलेच टेन्शन दिसून येत होते.
कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या मेरी वेदर मैदानात आकर्षक विद्युत रोषणाई, मैदानाच्या सभोवती भव्यदिव्य रोषणाई, ठिकठिकाणी एलईडी स्क्रीन, नेत्यांचे मोठमोठे कटआउट्स अशा झगमगाटात महायुतीच्या पहिल्याच जाहीर सभेला कोल्हापूरकरांचा मोठा प्रतिसाद मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण महायुतीच्या या भूलभुलैया व बडेजावपणाकडे कोल्हापूरकरांनी अक्षरशः पाठ फिरवल्याचे दिसून आले. सामाजिक न्यायक्रांतीचे प्रणेते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या या पुरोगामी नगरीत धार्मिक तसेच जातीय रंग देऊन द्वेष पसरवणाऱयांना कोल्हापूरकरांनी नाकारल्याचे दिसून आले.
उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भाषणात वारंवार ‘लाडकी बहीण’ योजनेवर देण्यात येणारा भर तसेच यामध्ये रक्कम वाढवून देण्याचे आमिष, वादग्रस्त शक्तिपीठ महामार्गासंदर्भात कोल्हापूर वगळून अन्य जिह्यांबाबत अस्पष्ट भूमिका कोल्हापूरकरांना पटल्या नाहीत. अगोदरच व्हीआयपींच्या रांगेतील खुर्च्या मोकळ्या असताना, मैदानातील कडेच्या खुर्च्यांची रांग पहिल्यापासूनच मोकळी होती. त्यात मुख्यमंत्र्यांचे रटाळ भाषण ऐकण्यापेक्षा लोकांनी निघून जाणेच पसंत केले. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच लोक निघून जाऊ लागल्याने महायुतीच्या नेत्यांच्या चेहऱयावरील रंग उडून गेल्याचे दिसून येत होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List