जगातील पहिली विश्वसुंदरी काळाच्या पडद्याआड
‘विश्वसुंदरी’ हा किताब पहिल्यांदा मिळवणाऱ्या किकी हॅकन्सन यांचे 95 व्या वर्षी निधन झाले. पॅलिपहर्निया या त्यांच्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1951 मध्ये किकी हॅकन्सन यांच्या डोक्यावर ‘विश्वसुंदरी’ या बिरुदाचा मुकुट ठेवण्यात आला होता. 4 नोव्हेंबरच्या रात्री झोपेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती त्यांच्या कुटुंबाने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दिली आहे.
किकी हॅकन्सन यांनी जिंकलेल्या ‘मिस वर्ल्ड’ या किताबामुळे या पुरस्काराची परंपरा जगात सुरू झाली. ‘मिस वर्ल्ड’ या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या पोस्टवरून किकी हॅकन्सन यांना आदरांजली वाहण्यात आली आहे. ‘आम्ही सगळे किकी यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. आमचे प्रेम, सद्भावना कायमच किकी हॅकन्सन यांच्या कुटुंबासोबत असतील,’ अशी पोस्ट या पेजवरून करण्यात आली आहे. किकी हॅकन्सन यांनी ‘मिस वर्ल्ड’ हा किताब जिंकण्याआधी ‘मिस स्वीडन’ हा किताबही जिंकला आहे. ‘आई आज जगात नाही, ती खूप दयाळू, प्रेमळ आणि मैत्रिणीसारखी होती. तिची विनोदबुद्धी खूप चांगली होती. तिने जे संस्कार आमच्यावर केले आहेत त्यामुळे आम्हाला तिची कायम आठवण येत राहील,’ असे किकी यांचा मुलगा ख्रिस अॅण्डरसन यांनी म्हटले आहे. दरम्यान, 1951 मध्ये पहिल्या ‘मिस वर्ल्ड’ सौंदर्य स्पर्धेतील स्पर्धकांनी बिकिनी परिधान केली होती. त्याचीही चर्चा त्या काळात रंगली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List