महाविकास आघाडीची गॅरंटी… महाराष्ट्राच्या विकासाची पंचसूत्री

महाविकास आघाडीची गॅरंटी… महाराष्ट्राच्या विकासाची पंचसूत्री

हाविकास आघाडीने मुंबईत आज विराट जनसागराच्या साक्षीने महाराष्ट्रातील जनतेच्या भल्यासाठी पाच गॅरंटी जाहीर केल्या. महिला, बेरोजगार, शेतकरी यासह सर्वच घटकांना केंद्रस्थानी ठेवत योजना राबवण्याचा संकल्प महाविकास आघाडीने सोडला आहे. मिंधे-भाजपची भ्रष्ट आणि महाराष्ट्रद्रोही राजवट महाराष्ट्रातून तडीपार करण्याचा पण करत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ही पंचसूत्री जाहीर केली आहे.

 वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर महाविकास आघाडीची दणदणीत महाराष्ट्र स्वाभिमान सभा झाली. या संयुक्त सभेतून महाराष्ट्रातील सत्तापरिवर्तनाच्या दिशेने पहिले पाऊल पडले आहे. या सभेला महाराष्ट्रप्रेमी जनतेची मोठी गर्दी उसळली होती. या गर्दीला साक्ष ठेवून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्राला प्रगती आणि विकासाकडे नेणाऱया पंचसूत्रीची घोषणा केली तेव्हा उदंड प्रतिसाद मिळाला.

राहुल गांधी यांनी महाविकास आघाडीच्या पंचसूत्रीमधील राज्यातील महिलांसाठी महालक्ष्मी योजना आणि जातीनिहाय जनगणनेची घोषणा करताना मोदी आणि मिंधे सरकारवर सडकून टीका केली. महायुतीचे सरकार लवकरच जाणार असून महविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. हे सरकार आल्यानंतर राज्यातील महिलांच्या खात्यावर दरमहा 3000 रुपये खटा खट खटा खट खटा खट जमा होतील. मोदी सरकारने वाढवलेल्या महागाईच्या जखमांच्या सर्वाधिक वेदना महिलांना झाल्या आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी ही योजना जाहीर करतोय असे राहुल गांधी म्हणाले.

देशातील संस्था, प्रशासन, शिक्षण, आरोग्य क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी घुसवली जात आहे. देशातील विद्यापीठांच्या कुलगुरूंची यादी पाहिली तर जे संघाशी संबंधित आहेत त्यांचीच नियुक्ती केली गेली आहे, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. निवडणूक आयोगावरही मोदी सरकारचा दबाव आहे, तसेच सीबीआय आणि ईडीचा गैरवापर करून सरकारे पाडली जात आहेत, असे ते म्हणाले.

केंद्रात आमचे सरकार बनल्यास जातिनिहाय जनगणना केली जाईल. कर्नाटक आणि तेलंगणा राज्यात सरकार आल्यानंतर जातनिहाय जनगणनेचे काम सुरू केले आहे. जनगणनेसाठी प्रश्न बंद दाराआड तयार केले जातात मात्र तेलंगणातील सर्व्हेतील प्रश्न जनतेने ठरवलेले आहेत. त्यानुसार महाराष्ट्रात सरकार आल्यास जातनिहाय जनगणनेचे काम सुरू करणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले. त्याचप्रमाणे ज्या दिवशी केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येईल त्यादिवशी आरक्षणाला लावण्यात आलेली 50 टक्क्यांची मर्यादा काढून टाकू असेही ते म्हणाले. संविधान संपल्यास भारतातील गरीब लोकांजवळ, आदिवासी लोकांजवळ काही राहणार नाही. शिक्षण, आरोग्य, जमिनीचे संरक्षण संविधान करते.

संविधानामुळेच अदानींना काही प्रमाणात रोखण्यात यश आले आहे, असे सांगत, सर्व महापुरुषांचा, गरिबांचा, शेतकऱयांचा आवाज संविधानात आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

हे सरकार अदानी, अंबानी या अब्जाधीशांच्या बाजूने आहे. पण हे अब्जाधीश जनतेला रोजगार देऊ शकत नाहीत. गरिबांना रोजगार धारावीसारख्या ठिकाणच्या लघु व मध्यम उद्योगातून मिळतात, पण अब्जाधीशांसाठी नोटबंदी, जीएसटीच्या माध्यमातून लघु व मध्यम उद्योगच मोदी सरकार संपवतेय, अशी भयंकर वस्तुस्थितीही राहुल गांधी यांनी मांडली.

 भाजपच्या कारभाराचा अभ्यास करा. बहिणींना दीड हजार रुपये दिले पण दुसऱया बाजूला पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढवले. हिशेब केला तर हे सरकार प्रत्येक कुटुंबाच्या खिशातून दरवर्षी 90 हजार काढून ते पैसे अदानी, अंबांनींना देत आहे.

 राहुल गांधी

यावेळी काँग्रेसचे कपिल पाटील, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश रेड्डी, मिलिंद रानडे, ‘आप’चे रूबीन मास्केरन्स, राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण, भारतीय रिपब्लिकन पक्षाचे राजेंद्र गवई, समाजवादी पक्षाचे अबू आझमी, अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अलका लांबा, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांची भाषणे झाली.

यावेळी शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते दिवाकर रावते, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे,  जयंत पाटील, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, अजय चौधरी, चंद्रकांत हंडोरे उपस्थित होते.

देशातील संस्था, माध्यमं, न्यायव्यवस्था पाहतो तेव्हा तिथं त्या संस्थांमध्ये दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि खुल्या प्रवर्गातील गरीब लोक दिसत नाहीत. त्यामुळे आम्हाला देशात एक ऐतिहासिक पाऊल उचलावं लागेल. देशात जातनिहाय जनगणना करावी लागेल.

 

खरगेंनी वाचला घोटाळय़चा  पाढा

मोदी सरकारच्या काळात जनतेला फक्त खोटी आश्वासने मिळाली आहेत. मात्र काँग्रेसने जनतेला दिलेली वचने पाळली आहेत. यामध्ये आम्ही कर्नाटक, तेलंगणामध्ये महिलांना दरमहा तीन हजार रुपये देतोय, असेही खरगे यांनी स्पष्ट केले. मात्र मोदी आमच्या गॅरंटीची चेष्टा करीत असतात. खरंतर मोदीच झुठों के सरदार आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. जो माणूस खोटं बोलतो तो लोकांचे हित कसे सांभाळणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मोदींची गॅरंटी मोदी आणि शहा यांनाच असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. राज्यात महायुती सरकारच्या काळात रिंग रोड घोटाळा, समृद्धी महामार्ग घोटाळा, जलयुक्त शिवार घोटाळा, धारावी पुनर्वसनमध्ये घोटाळा, 8 हजार अॅम्ब्युलन्सचा घोटाळा, गरीबांची लूट अशा प्रकारे घोटाळय़ांची जंत्रीच वाचली.

मोदी-शहांनी महाराष्ट्र एटीएम बनवला! -नाना पटोले

मुठभर लोकांना धनाढय़ बनवण्यासाठी मोदी-शहांकडून महाराष्ट्राची लूट सुरू असून महाराष्ट्र अक्षरशः ‘एटीएम’च बनवल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केला. मात्र आता महाविकास आघाडी सरकार पंचसूत्रीच्या माध्यमातून जनतेला वचन देत आहे. यामध्ये मोदींसारखा कोणताही जुमला नाही.शिंदे-भाजप सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे. राज्यात अनेक पात्र आयपीएस अधिकारी पोलीस महासंचालक पदासाठी असताना  एका निवृत्त अधिकाऱयाची मुदतवाढ कशी केली जाते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ही नेमणूकही टेंपररी केली आहे. या विरोधात आपण कोर्टात जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस नेते राहुल गांधींनी लाल कव्हरचे संविधान दाखवल्यानंतर यावर टीका करणाऱया फडणवीसांनी खऱया अर्थाने महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अवमान केल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

खोके सरकार महाराष्ट्राला कलंक -तुषार गांधी

महिलांवरील वाढलेले अत्याचार, वाढलेली बेरोजगारी, खोटी आश्वासने, प्रचंड वाढलेली महागाईमुळे महाराष्ट्रातील पैसे घेऊन स्थापन झालेले ‘खोके’ सरकार महाराष्ट्राला कलंक असल्याचा टोला महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी लगावला. सत्तेच्या लालसेपोटी सर्व कामे घाईने आणि पैसे खाऊन केल्यामुळेच शिवरायांचा पुतळा कोसळल्याचे ते म्हणाले. जनतेच्या आत्मसन्मानासाठी आता जागे होण्याची गरज असून देशाला पुन्हा एकदा स्वतंत्र करण्याची गरज आहे. यासाठी भ्रष्टाचारी, गद्दार सरकारला हटवावेच लागेल असे सांगतानच ‘एक धक्का और दो, खोके सरकार को फेक दो’, असा नाराही त्यांनी दिला.

महायुतीने मुंबई बकाल केली -वर्षा गायकवाड

मुंबईत दररोज रेल्वे अपघातात सात जणांचा बळी जात असताना मोदी सरकार गोरगरीबांना कोणताही फायदा नसलेल्या बुलेट ट्रेनसाठी दोन लाख कोटी रुपये खर्च करीत आहे. मुंबईच्या सौंदर्यीकरणासाठी कोटय़वधी रुपये खर्च केले असताना मुंबई बकाल करून ठेवल्याचा घणाघात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा, खासदार वर्षा गायकवाड यांनी केला. गेली तीन वर्षे पालिकेच्या निवडणुका न घेता मुंबईतील शेकडो एकर जमिनी अदानीच्या घशात घालण्याचे काम सुरू आहे. धारावीची 550 एकर जागा अशाच प्रकारे अदानीच्या घशात घातली जात आहे. याशिवाय कांजूरमार्गची जाग, देवनार डंपिंग ग्राऊंड, जकात नाक्यांची जागाही अदानीला देण्याचे कारस्थान सुरू आहे. राज्यात महिला सुरक्षित नाहीत. शक्ती कायद्याची अंमलबजावणी रखडली आहे. त्यामुळे आपले सरकार आता यावेच लागेल, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.

महाविकास आघाडीच्या एकजुटीचे दर्शन

महाविकास आघाडीच्या ‘स्वाभिमान’ सभेत शिवसेनेच्या भगव्या झेंडय़ांसह काँग्रेसचा हात असलेला झेंडा, राष्ट्रवादीचा तुतारी असलेल्या झेंडय़ांसह घटक पक्षांचे कार्यकर्ते आपापल्या पक्षांचे झेंडे डौलाने फडकवत होते. यामध्ये सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडीच्या एकजुटीचा प्रत्यय येत होता. यामध्ये महिलांसह सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग लक्षणीय होता. महाविकास आघाडीच्या पंचसूत्रीमुळे महाराष्ट्र सुजलाम, सुफलाम होईल, अशीच भावना त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत होती.

संविधान कमकुवत करण्याचा भाजपचा छुपा अजेंडा

ही विचारधारेची लढाई आहे, एकीकडे भाजपा, आरएसएस आहे तर दुसरीकडे इंडिया आघाडी आहे. एकीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान, एकता, समानता, आदर, प्रेम आहे तर दुसरीकडे संविधान संपवण्याचा छुपा अजेंडा भाजपा आणि आरएसएस चालवत आहे. मात्र संविधानात इंडियाचा आवाज आहे आणि काहीही झाले तरी आम्ही ते संपवू देणार नाही, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला.

 निवडणूक आयोग, ईडी, सीबीआयचा वापर करून सरकार पाडले

निवडणूक आयोगावर दबाव आहे. सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्सचा वापर करून सरकारे पाडली जात आहेत. आमचे महाविकास आघाडीचे सरकारही चोरी करून, पैसे देऊन हटवले गेले, असे नमूद करत राहुल यांनी निशाणा साधला. त्यांना दोन-तीन अब्जाधीशांची मदत करायची आहे. त्यासाठी धारावीतील गोरगरिबांची एक लाख कोटीची जमीन डोळ्यादेखत खेचून घेत अब्जाधीशाला देण्यात आली. सर्व प्रकल्पही खेचून दुसऱया राज्यात नेले जात आहेत. पाच लाख रोजगार महाराष्ट्रातून हिसकावून गुजरातला नेण्यात आले, असे सांगत प्रकल्पांची जंत्रीच राहुल गांधी यांनी वाचून दाखवली. जे तुमचे होते ते हिरावून घेतले हाच भाजप सरकारचा खरा चेहरा आहे, असे राहुल म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महायुतीचा कोल्हापुरात फ्लॉप शो! शिंदे, फडणवीस, पवारांच्या सभेकडे जनतेची पाठ महायुतीचा कोल्हापुरात फ्लॉप शो! शिंदे, फडणवीस, पवारांच्या सभेकडे जनतेची पाठ
आकर्षक व भव्यदिव्य नियोजन करूनही मंगळवारी (दि. 5) सायंकाळी महायुतीच्या प्रचाराच्या शुभारंभ सभेकडे स्वाभिमानी कोल्हापूरकरांनी अक्षरशः पाठ फिरवली. मुख्यमंत्री शिंदे,...
घराच्या नावाखाली मिंधेंच्या लाडक्या बिल्डरची गिरणी कामगारांकडून वसुली
संजय कुमार वर्मा यांची नियुक्ती तात्पुरती, रश्मी शुक्ला सक्तीच्या रजेवर
घरावर बुलडोझर चालवणे हा अधर्म आणि मनमानी, सर्वोच्च न्यायालयाने योगी सरकारला फटकारले
महाराष्ट्र आर्थिक स्थितीत सहाव्या स्थानावर घसरला… 64 हजार महिला बेपत्ता; पवारांचा महायुतीवर हल्ला
भाजपमध्ये ज्या नावाची चर्चा, तो कधीच मुख्यमंत्री होत नाही! तावडेंनी कापली फडणवीसांची कन्नी
विक्रोळीत धगधगणार विकासकामांचीच मशाल