IPL 2025 – पाकिस्तानला टी-20 वर्ल्डकपमधून बाहेरचा रस्ता दाखवणाऱ्या गोलंदाजाची मेगा लिलावात एन्ट्री
टी-20 वर्ल्डकप 2024 मध्ये पाकिस्तानला पहिल्यांदाच वर्ल्डकप खेळणाऱ्या अमेरिकेने धुळ चारली होती. परिणामी वर्ल्डकपमधून पाकिस्तानचा पत्ता साखळी फेरीतच कट झाला. या सामन्यात हिंदुस्थानी वंशाच्या मुंबईकर सौरभ नेत्रावळकर याने दोन विकेट घेत अमेरिकेच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. हाच सौरभ नेत्रावळकर आता आगामी IPL 2025 मध्ये आपल्या गोलंदाजीचा जलवा दाखवण्यासाठी उत्सुक असून त्याने मेगा लिलाव प्रक्रियेसाठी आपल्या नावाची नोंद केली आहे.
टी20 वर्ल्डकप 2024 मध्ये अमेरिकेच्या संघाने नेत्रदीपक कामगिरी करत सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला होता. पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळणाऱ्या अमेरिकेच्या संघाने थेट सुपर 8 मध्ये धडक मारली होती. या संपूर्ण स्पर्धेत 6 विकेट घेत सौरभ नेत्रावळकर या मराठमोळ्या खेळाडूने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. विराट कोहलीच्या विकेटचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. अमेरिकेला सुपर 8 पर्यंत घेऊन जाण्यात त्याचा खारीचा वाटा होता.
मुळ हिंदुस्थानी वंशाचा 33 वर्षीय सौरभ आयपीएलमध्ये आपल्या गोलंदाजीची जादू दाखवण्यासाठी उत्सुक आहे. सौदी अरबच्या जेद्दाह शहरामध्ये 23 आणि 24 नोव्हेंबर रोजी लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. सौरभ नेत्रावळकरची बेस प्राइज 30 लाख रुपये असून कोणता संघ त्याला आपल्या ताफ्यात घेणार हे जाणून घेण्यासाठी चाहते सुद्धा आतूर झाले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List