महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्ष आघाडी धर्म पाळणार! – संजय राऊत
विधानसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दुपारपर्यंत सगळे चित्र स्पष्ट होणार असून तिन्ही पक्षाचे नेते आपापल्या उमेदवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न करताहेत आणि आम्हाला यश येईल. महायुतीमध्ये शिंदे गट, अजित पवार गटाने अनेक ठिकाणी अर्जवाटप केले, तसे आमच्याकडे झालेले नाही. महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्ष आघाडी धर्म पाळणार आहोत. आम्ही भाजपसोबत युतीमध्ये असताना देखील युती धर्माचे पालन केले होते अशी आठवण बोलून दाखवत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या वचनबद्धतेच्या गोष्टीला अधोरेखित केले.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, काल दिवसभर महाविकास आघाडीचे नेते एकमेकांच्या संपर्कात होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरद पवार, जयंत पाटील आणि काँग्रेसचे सर्व नेते आपापल्या नेत्यांना समजावण्याचा प्रयत्न करताहेत आणि तो यशस्वी होत आहे. काल रात्रीच शेकापच्या नेत्यांशी आमची चर्चा झाली. शेकापचे जयंत पाटील आणि सेक्रेटरी मंडळ माझ्याकडे आले होते. जयंत पाटील आणि उद्धव ठाकर यांची फोनवरूनही चर्चा झाली. त्यानुसार अलिबाक, पनवेल आणि पेन या तीन जागा शेकापला सोडण्याचे ठरले असून तिथून शिवसेनेचे उमेदवार मागे घेतले जातील.
आम्हाला मित्रपक्षांना काही जागा द्यावा लागल्या. मित्रपक्षांना जागा देण्याची जबाबदारी प्रत्येकावरती आहे. आम्हाला असे वाटले की मित्रपक्षाने लोकसभेला साथ दिलेली आहे, तर त्यांच्या वाट्याला आलेल्या जागा द्याव्यात, मग भरेली त्या आमच्या आमच्या कोट्यातील असल्या तरी आम्ही त्या दिलदारीने दिल्या आहेत, असेही राऊत म्हणाले.
23 नोव्हेंबरला अटॉम बॉम्ब फुटेल असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. याचाही राऊत यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, अटॉम बॉम्ब फुटू त्या नाही तर काही फुटू द्या. पादरे पावटे अजून काय फोडणार. पादरे पावटे आजूबाजूला दुर्गंधी निर्माण करतात तसे महाराष्ट्रात अडीच वर्षापासून सुरू आहे. स्वप्न पहायला 50 खोकी लागत नाहीत, ते स्वप्न पहात असतील तर त्यांच्या स्वप्नाला अडथळा आणू इच्छित नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
लोकसभेला साहेबांना खुश केले आता मला करा असे आवाहन अजित पवारांनी केले. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, बारामतीच्या जनतेने अजित पवारांच्या परवानगीने सुप्रिया सुळे किंवा शरद पवारांना खुश केले नव्हते. हा जनतेचा निर्णय होता. तुम्हाला जनतेला आवाहन करावे लागते याचा अर्थ तुम्ही तुमचा पराभव स्वीकारलेला आहे.
दरम्यान, मनोज जरांगे-पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांचा संघर्ष हा त्यांच्या समाजाच्या विकासासाठी, उद्धारासाठी सुरू आहे. त्यासाठी त्यांनी प्राणांची बाजी लावली. समाज त्यांच्या पाठीशी उभा आहे. निवडणुकीसंदर्भात त्यांनी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न असून आम्ही त्यांचा लढा राजकीय मानत नाही. ही सामाजिक चळवळ आहे, असे राऊत म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List