फेशियल करायला आला अन् हातसफाई करून गेला
ऑनलाइनवरून केस कापणे आणि फेशियल करणे एकाला चांगलेच महागात पडले आहे. फेशियल करण्यासाठी आलेल्या एकाने घरातील सव्वापाच लाखांचे सोने घेऊन पळ काढल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मालाड पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
मालाड येथे तक्रारदार राहतो. गेल्या आठवडयात त्याने एका ऑनलाइन केस कापण्याची सुविधा पुरवणाऱ्या कंपनीला संपर्क केला. त्यानंतर त्याला एक नंबर मिळाला. काही वेळाने एकाने तक्रारदाराला फोन करून घरी येतो असे सांगितले. शनिवारी दुपारी एक जण त्याच्या घरी आला. त्याने कंपनीचे नाव सांगून स्वतःचा परिचय दिला. त्यानंतर तक्रारदार याने त्याला केस कापण्यासाठी बेडरूममध्ये नेले. त्याने केस कापण्यास सुरुवात केली. केस कापत असताना त्याने तक्रारदाराला चेहऱ्यावर काळे डाग असल्याचे सांगितले. ते डाग फेशियल केल्यावर निघून जातील असे भासवले. डाग निघून जातील. त्यामुळे तक्रारदार याने त्याला फेशियल करण्यास परवानगी दिली.
फेशियल करत असताना त्याने चेहऱ्यावर विविध क्रीम लावून डोळ्यावर पांढरी पट्टी बांधली. काही वेळ डोळे उघडू नये असे त्याला सांगितले. त्याचदरम्यान त्याला कपाट उघडल्याचा आवाज आला. फेशियल करताना हात लावला असावा असे समजून त्याने त्याकडे दुर्लक्ष केले. काही वेळाने तक्रारदार याने तोंडावर पाणी मारले. त्याने फेशियलचे काम पूर्ण झाल्याचे सांगून पैसे घेऊन तो निघून गेला. त्यानंतर तक्रारदार याने मागे वळून पाहिले असता कपाटातील दागिने मिळून आले नाहीत. दागिन्यांबाबत त्याने त्याच्या आईला विचारणा केली. त्यानंतर त्याने मालाड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List