योगींनी राजीनामा दिला नाही तर 10 दिवसांत बाबा सिद्दिकींसारखी हत्या, धमकी देणाऱ्या महिलेला उल्हासनगरमधून अटक
योगी आदित्यनाथ यांनी 10 दिवसांत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही तर त्यांचीही बाबा सिद्दिकीप्रमाणे हत्या केली जाईल, अशी धमकी देणाऱ्या महिलेला उल्हासनगर येथून अटक करण्यात आली आहे. फातिमा खान (24) असे या महिलेचे नाव असून या महिलेने मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सअॅप हेल्पलाइनवर योगींना जिवे मारण्याची धमकी देण्याबाबत मेसेज दिला होता.
विशेष म्हणजे ही महिला श्रीमंत कुटुंबातील असून ती उच्चशिक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या महिलेने असे का केले? याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. शनिवारी धमकीचा मेसेज आल्यानंतर मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेश पोलिसांना माहिती देऊन पुढील तपास सुरू केला. त्यानुसार ही महिला मानसिक आजारी असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. असे असले तरीही हे प्रकरण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी निगडित असल्याने मुंबई पोलीस सर्व बाबी लक्षात घेऊन अतिशय गांभीर्याने या प्रकरणाचा तपास करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या महिलेने आयटीमधून बीएस्सी केले असून ती कुटुंबासह ठाण्यात राहते अशी माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात 25 एनएसजी कमांडो
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षा ताफ्यात तब्बल 25 राष्ट्रीय सुरक्षा दलाचे कमांडो असतात. त्यांची शिफ्ट 8 तासांची असेल तर एकूण 75 कमांडो तैनात केले जातात. हे सर्व कमांडो काळ्या गणवेशात असतात. या गणवेशावर एक बिल्ला दिलेला आहे. योगींना देण्यात आलेल्या झेड प्लस सुरक्षेत 5 बुलेटप्रूफ वाहनांचाही समावेश आहे. अशी सुरक्षा देशातील निवडक व्यक्तींनाच दिली जाते.
योगींच्या सुरक्षेवर महिन्याला 1 कोटी 39 लाखांचा खर्च
योगींच्या सुरक्षेवर दर महिन्याला तब्बल 1 कोटी 39 लाख रुपये खर्च होत असल्याचे उत्तर प्रदेश सरकारकडून सांगण्यात आले होते. 2017 मध्ये समाजवादी पार्टीचे शत्रुद्र प्रकाश यांनी सुरक्षेवरील या भरमसाट खर्चाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. दरम्यान, त्यांच्या सुरक्षेसाठी एक अतिरिक्त पोलीस अधीक्षक, सात पोलीस उपअधीक्षक, 52 निरीक्षक, 21 उपनिरीक्षक, 23 मुख्य हवालदार आणि 127 हवालदार तैनात करण्यात आले आहेत.
योगींना या वर्षी दोन वेळा देण्यात आल्या होत्या धमक्या
मार्च 2024 मध्ये योगींना बॉम्बची धमकी देण्यात आली होती. त्यापूर्वी जानेवारी 2024 मध्ये खलिस्तानी दहशतवादी पन्नूने अयोध्येत अटक केलेल्या 3 दहशतवाद्यांना सोडले नाही तर योगींना ठार मारण्याची धमकी देणारा व्हॉईस मेसेज पाठवला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List