प्लेलिस्ट – ऋषितुल्य चित्रतपस्वी हृषिकेश मुखर्जी
> हर्षवर्धन दातार
’आनंद’ चित्रपटातल्या ’जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नाही बाबूमोशाय’ या अजरामर संवादाप्रमाणे कलासक्त समृद्ध आयुष्य जगलेले, अनेक पुरस्कार मिळालेल्या चित्रकर्मी हृषिकेश मुखर्जी यांचे योगदान चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षक कधीच विसरू शकणार नाहीत.
राजेश खन्नाच्या ‘आनंद’ चित्रपटात जया भादुरीची ‘मिली’मध्ये, रेखाची ‘खूबसूरत’मध्ये आणि धर्मेंद्रची ‘चुपके चुपके’मध्ये, या सगळ्या हृषिकेश मुखर्जी यांच्या चित्रपटातील भूमिका. प्रश्न असा की, या सगळ्या भूमिकांत काय साम्य आहे? तर ही सगळी घरात काम करणारी किंवा घराशी संबंधित मंडळी आहेत ती त्या घरात आदराचे स्थान असलेली, कुटुंबाचा भाग असलेली ज्येष्ठ वडीलधारी सदस्य आहेत. घरात महत्त्वाचे निर्णय घेताना त्यांच्या मतांनाही किंमत आहे. ऋषितुल्य चित्रकर्मी हृषीकेश मुखर्जी यांच्या चित्रपटांचा हा एक ठळक भाग होता. माणसांना जोडून राहणाऱ्या आपल्या संस्कृतीचं योग्य चित्रण त्यांच्या चित्रपटातून दिसे. घरगुती कथानक, तसे वातावरण आणि त्याला साजेशा सहज सुंदर आणि नैसर्गिक भूमिका. यामुळे हृषीदांचे कौतुकपात्र ठरलेले चित्रपट आजही पाहिले जातात.
चार दशक, दिग्दर्शक आणि संकलक म्हणून 46 चित्रपट अशी दीर्घ आणि यशस्वी कारकीर्द लाभलेल्या आणि निर्माता, दिग्दर्शक, लेखक, कॅमेरामन, संकलक अशा अष्टपैलू भूमिका निभावणाऱया हृषीदांनी मध्यमवर्गीय वास्तववादी वस्तुस्थिती निदर्शक कथानकांमध्ये परिणामकारक मध्यबिंदू साधला. चित्रपटाशी निगडित केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाचे अध्यक्ष आणि केंद्रीय चित्रपट विकास महामंडळाचे सदस्य अशा शासकीय संस्थांमध्ये काम केले. चित्रपटासंबंधी त्यांच्या भरीव योगदानाला मान्यता म्हणून 1999मध्ये दादासाहेब फाळके पारितोषिकाने आणि 2001 साली पद्मविभूषणाने सन्मानित केले गेले. या शिवाय आठ फिल्मफेअर पारितोषिकंही त्यांच्या पदरात पडली. मूळचे रसायन शास्त्राचे पदवीधर आणि गणिताचे प्राध्यापक. या विषयांशी संबंधित तर्कशुद्ध विचारांचा त्यांना चित्रपटनिर्मितीत भरपूर उपयोग झाला. शिवाय चित्रीकरण आणि संकलन (कुठे कात्री लावायची आणि कुठे जोडायचे याचे तंत्र) या मुख्य बाबींचे ज्ञान असल्यामुळे त्यांचे चित्रपट कधीच कंटाळवाणे झाले नाहीत.
त्यांनी प्रख्यात चित्रकर्मी बिमल रॉय याना ‘दो बिघा जमीन’ (1953), परिणीता (1953), बिराज बहू (1955) आणि देवदास (1955) मध्ये दिग्दर्शन आणि संकलक म्हणून सहाय्य केलं. जास्त न चाललेल्या ‘मुसाफिर’ (1957) नंतर राज कपूर-नूतनचा, पाच फिल्मफेअर पुरस्कृत ‘अनाडी’ (1959) लोकप्रिय झाला. तेव्हापासून हृषीदा आणि राज कपूर घनिष्ठ मित्र बनले. बलराज सहानी आणि लीला नायडू यांच्या ‘अनुराधा’ (1960) शास्त्राrय संगीतप्रधान चित्रपट रविशंकर यांच्या संगीतामुळे नावाजला.
1961 पासून 1968 या कालावधीत छाया (सुनील दत्त -अशा पारेख), असली-नकली (देव आनंद-साधना), सांझ और सवेरा (गुरुदत्त-मीनाकुमारी) या त्यांच्या काही अप्रतिम कलाकृती. अनेक मधुर गाणी असलेला आणि सुंदर शर्मिलाच्या भावविभोर निरागस अभिनयाने नटलेला ‘अनुपमा’ (1966). यात ‘कुछ दिलने कहा’ या लताजींच्या स्वर्गीय गायकीने आणि हेमंतकुमार यांच्या कमीतकमी वाद्यवृंद असलेल्या गाण्याचं चित्रीकरण अगदी पहाटे धुक्याच्या आवरणाखाली झाले.
हृषीदांनी अशोक कुमार यांना नायक साकारण्याचं वचन दिलं होतं, ‘आशीर्वाद’ हे त्याचं फलित आणि त्याला फिल्मफेअर तसंच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. लताजींचं भावूक करणारं ‘एक था बचपन’ आणि अशोक कुमारनी स्वत गायलेले ‘रेलगाडी’ हे बालगीत या चित्रपटाचं वैशिष्टय़. सत्याची कास धरणारा आणि हे तत्त्व पुरस्कृत करणारा ‘सत्यकाम’ (1969) ही हृषीदांची अजोड कलाकृती. जीवन आणि माणसाला भोवरा, माकड अशा अनेक उपमा देणारे ‘जिंदगी है क्या’ हे कैफी आझमी-लक्ष्मीकांत प्यारेलाल या विरळद्वयीच गाणं चर्चिलं गेलं. कथा, अभिनय, संवाद, गाणी, संगीत या चित्रपटाच्या सर्व निकषावर श्रेष्ठ आणि कालातीत ठरलेला चित्रपट म्हणजे ‘आनंद’ (1970). राज कपूरला यात मुख्य भूमिका करायची होती, पण हृषीदांनी ‘मैं इस फिल्ममें तुम्हे मरते हुए नही देख सकता’ असे सांगून सपशेल नकार दिला. हृषीदांच्या सर्व अटी मान्य करून राजेश खन्नांने ही भूमिका मिळवली आणि त्याचं सोनं केलं. तत्कालीन नवोदित अमिताभ बच्चननेही सहायक भूमिका तोडीस तोड निभावली. यातलं ‘ना जिया जायेना’ हे लताजींचं आवडतं गाणं. संगीतकार अर्थात त्यांचे आवडते सलील चौधरी. हृषीदांनी याच विषयाशी थोडीफार जवळीक असलेला अमिताभ-जया यांचा ‘मिली’ (1975) आणला. यात ‘बडी सुनी सुनी है’ ये सचिन देव बर्मन यांचे किशोर कुमारांनी गायलेलं शेवटचं गाणं आहे. वास्तव आणि चित्रपट यातील फरक दाखवणारा ‘गुड्डी’ (1971). यातील ‘बोल रे पपी’ या गाण्यातून दक्षिणेची वाणी जयराम पुढे आली.
राजेश खन्नाला अभिनयाचा कस लावणारी अजून एक भूमिका हृषीदांनी ‘बावर्ची’मध्ये (1972) दिली. रुसवे फुगवे, गैरसमज यातून नातेसंबंधांची वीण उसविणाऱया, विखुरणाऱया एका कुटुंबाला आपल्या अष्टपैलू कलागुणातून आणि क्लृप्तीने एकत्र आणलं रघु या बावर्चीने! नर्म विनोदी हलकेफुलके आणि संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून बघण्यासारखे चित्रपट बनविण्यात हृषीदांचा हातखंडा होता. बुद्धिबळ शौकीन आणि प्राणीप्रेमी, विनयशील व्यक्तिमत्व असलेले हृषीदा एरवी मृदुभाषी नरम स्वभावाचे, पण कडक चित्रकर्मी होते. ’आनंद’ चित्रपटातल्या ’जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नाही बाबूमोशाय’ या अजरामर संवादाप्रमाणे कलासक्त समृद्ध आयुष्य जगलेले, अनेक पुरस्कार मिळालेल्या चित्रकर्मी हृषिकेश मुखर्जी यांचे योगदान चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षक कधीच विसरू शकणार नाहीत. अशा या बहुआयामी, जिनियस ऋषितुल्य चित्रतपस्वीला सादर नमन.
[email protected]
(लेखक संगीत अभ्यासक आहेत.)
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List