Ranji Trophy 2024-25 – महाराष्ट्राचा ‘दस’ का दम! मेघालयवर 10 गडी राखून विजय
यजमान महाराष्ट्राने ‘रणजी करंडक’ क्रिकेट स्पर्धेतील एलिट ‘अ’ गटात पाहुण्या मेघालय संघावर 10 गडी राखून विजय मिळविला. दुसऱ्या डावात केलेली अचूक गोलंदाजी आणि मुर्तझा ट्रंकवालाच्या दुसऱ्या डावातील आक्रमक फलंदाजीमुळे ही लढत अखेरच्या टप्प्यात अगदीच एकतर्फी झाली. पहिल्या डावात मोक्याच्या वेळी शतकी खेळी करणारा हर्षल काटे या सामन्याचा मानकरी ठरला. या विजयामुळे महाराष्ट्राचा संघ एलिट ‘अ’ गटात पाचव्या स्थानावर आला, तर पराभवाच्या हॅट्ट्रिकसह मेघालय गटात अखेरच्या आठव्या स्थानावर आहे.
छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या या लढतीत मेघालयाने 276 धावसंख्या उभारल्यानंतर महाराष्ट्राने 361 धावसंख्या उभारून पहिल्या डावात 85 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर महाराष्ट्राने मेघालयाचा दुसरा डाव 55.5 षटकांत 185 धावसंख्येवर गुंडाळला. विजयासाठी मिळालेले 101 धावांचे लक्ष्य महाराष्ट्राने एकही फलंदाज न गमविता केवळ 21.1 षटकांत 104 धावा करून सहज पूर्ण केले व मेघालयाला ‘दस’ का दम दाखविला. या विजयात मुर्तझा ट्रंकवालाने 73 चेंडूंत 13 चौकारांसह नाबाद 78 धावांची खेळी सजविली. सिद्धेश वीरने 54 चेंडूंत दोन चौकारांसह नाबाद 24 धावा करीत मुर्तझाला साथ दिली.
त्याआधी, मेघालयने दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवसाच्या 8बाद 157 धावसंख्ये वरून मंगळवारी सकाळी पुढे खेळायला सुरुवात केली. मात्र, आणखी 28 धावांची भर घालून मेघालयाचा दुसरा डाव 55.5 षटकांत 185 धावांवर संपुष्टात आला. महाराष्ट्राकडून मुकेश चौधरीने सर्वाधिक चार बळी मेघालयाची आघाडीची फळी टिपताना कापून काढली. प्रदीप दाढे व रजनीश गुरबानी यांनी 2-2 फलंदाज टिपत पाहुण्यांच्या मधल्या फळीला भगदाड पाडले. याचबरोबर हितेश वाळुंजलाही एक बळी मिळाला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List