माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आत्मचरित्र होणार प्रकाशित, देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आत्मचरित्र डायरी ऑफ अ होम मिनिस्टर प्रकाशनाच्या वाटेवर आहे. या पुस्तकात देशमुख यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपण गृहमंत्री असताना फडणवीसांनी एक माणूस पाठवून आपल्याला खोटे प्रतिज्ञापत्र बनवून द्यायला सांगितले होते आणि त्या बदल्यात ईडी सीबीआयच्या केसेस मागे घेतले जातील अशी ऑफर दिली होती असे देशमुखांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे.
देशमुख यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे की मी गृहमंत्री असताना 2021 साली त्यांना एक माणूस भेटला. आपण देवेंद्र फडणवीस यांच्यांशी संबंधित असल्याचे या व्यक्तीने म्हटले होते. त्याचे नाव समित कदम असून तो सांगलीचा होता. देशमुख यांच्याविरोधात जे काही सुरू आहे त्याबद्दल फडणवीस मदत करायला तयार आहेत असे कदम यांनी देशमुखांना सांगितले. त्यानंतर देशमुख यांनी समित कदमची सोशल मीडीयावर प्रोफाईल शोधली. तेव्हा समित कदमचे देवेंद्र फडणवीससोबत अनेक फोटो सापडले. समित कदम जन सुराज्य शक्ती पक्षाचा कार्यकर्ता होता, हा पक्ष भाजपचा मित्रपक्ष होता.
समित कदमने देशमुख आणि फडणवीस यांच्या संवाद साधून दिला. त्यासाठी व्हॉट्सअॅप आणि फेसटाईम या अॅप्सचा वापर करण्यात आला. फडणवीस देशमुखांना भाऊ म्हणायचे. फडणवीस देशमुखांना म्हणाले की भाऊ तुम्ही काळजी करू नका. तुमच्याविरोधात ज्या केस सुरू आहेत त्यात काही तथ्य नाही आम्ही तुमची मदत करू. त्यानंतर एका आठवड्यानंतर समित देशमुखांना पुन्हा भेटला. यावेळी समितने आपली गाडी देशमुख यांच्या शासकीय बंगल्याच्या दूर हँगिग गार्डनजवळ पार्क केली. जेणेकरून सिक्युरीटी कॅमेऱ्यात गाडीचा नंबर दिसू नये. समितने देशमुखांना एक पत्र दिलं होतं. त्यात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार गुटखा व्यापाऱ्यांकडून पैसे गोळा करत आहेत हे प्रतिज्ञापत्रात लिहून द्या. तसेच तुम्हाला ईडीचे काही अधिकारी भेटतील आणि काही प्रश्न विचारतील. त्यानंतर तुमच्याविरोधातला सगळा तपास बंद होईल असे समित कदम यांनी देशमुखांना सांगितले. हा संदेश देवेंद्र फडणवीसांना दिला असेही देशमुखांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List