कमळ चिखलात टाकून घड्याळ हातावर बांधण्याचा ‘प्रताप’! प्रताप चिखलीकरांच्या पक्षांतराचा विक्रम; आमदारकीसाठी अजित पवारांच्या तंबूत
पंधरा वर्षांच्या राजकीय प्रवासात तब्बल पाच वेळा पक्षांतर करण्याचा विक्रम प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला आहे. आता कमळ चिखलात टाकून हातावर घड्याळ बांधण्याचा ‘प्रताप’ त्यांनी केला आहे. खासदारकी हातून गेल्यानंतर आता आमदारकी तरी मिळेल, या आशेवर चिखलीकरांनी अजित पवारांच्या तंबूत घुसखोरी केली आहे. नांदेड लोकसभेच्या निवडणुकीत स्वकियांनीच दगाबाजी केल्यामुळे प्रताप पाटील चिखलीकरांचा केविलवाणा पराभव झाला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस सोडून अशोक चव्हाण भाजपच्या कळपात सामील झाले. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी प्रचारापासून दूर गेले. मराठा आंदोलकांच्या नाराजीचा फटकाही बसला. पराभवानंतर प्रतापरावांनी ठिकठिकाणी धन्यवाद सभा घेऊन विरोधात प्रचार करणारांवर आगपाखड केली. अखेर दिल्लीश्वरांनी कान उपटल्यानंतर अशोक चव्हाण हेच आपले नेते असल्याची जाहीर कबुली देण्याची नामुष्की प्रतापरावांवर ओढवली. खासदारकी गमावल्यानंतर त्यांनी विधानसभा लढवण्यासाठी अंदाज बांधायला सुरुवात केली. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळे उमेदवारी मिळण्यात मांजर आडवे जाणार हे लक्षात येताच प्रताप चिखलीकरांनी अजित पवारांच्या तंबूत शिरण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांच्या गोटात जाताच चिखलीकरांना उमेदवारीची बक्षिसी जाहीर झाली.
राजकीय कोलांटउड्यांचा इतिहास…
2004 मध्ये काँग्रेसने तिकीट नाकारल्यानंतर प्रताप पाटील चिखलीकरांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. या निवडणुकीत मतदारांनी त्यांना विजयी केले. 2009 च्या निवडणुकीत त्यांना लोकभारती या पक्षाने उमेदवारी दिली. मात्र मतदारांनी त्यांना झिडकारले. 2011 मध्ये प्रतापराव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोडून ते शिवसेनेत आले. या निवडणुकीत मतदारांनी त्यांना भरघोस मते दिली. 2018 मध्ये शिवसेना सोडून प्रतापराव भाजपवासी झाले. 2019 मध्ये भाजपने त्यांना लोकसभेचे तिकीट दिले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या अशोक चव्हाणांचा त्यांनी पराभव केला. आता 2024 मध्ये आमदारकीच्या अपेक्षेने त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत
जाण्याचा निर्णय घेतला. प्रवेश करताच त्यांना तिकीटही देण्यात आले. प्रतापरावांचा राजकीय इतिहास पाहता ते अजित पवारांच्या तंबूत किती काळ मुक्काम करतील… याचीच चर्चा सध्या मतदारसंघात होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List