लेख – इस्रायली गुप्तचर संस्थांची उत्कृष्ट कामगिरी
>> ब्रिगेडियर हेमंत महाजन
इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेकडून भारताला शिकण्यासारखे बरेच काही आहे. आपल्यासाठी बांगलादेशी घुसखोर, माओवादी, उग्रवादी, अफू–गांजा–चरस दहशतवाद करणारे आणि त्यांचे समर्थक यांची माहिती मिळवणे, त्याचे योग्य विश्लेषण करणे हे काम इतके अशक्यप्राय का होते? गुप्तचर यंत्रणेमध्ये भारतीय नागरिकांना सामील करून घेण्यासाठी अजूनही बरोबर पद्धती वापरत आहोत का? गुप्तचर यंत्रणेला मदत म्हणून विविध क्षेत्रांतल्या व्यक्तींचा उपयोग कितपत केला जातो?
50वर्षांनंतर हमासने अचानक इस्रायमधील गाझा पट्टीजवळ असलेल्या शहरांवर 7 ऑक्टोबर 2023 ला हल्ला केला. या हल्ल्याची पूर्वमाहिती नसणे, हे मोसादचे मोठे अपयश होते. परंतु या एका अपयशानंतर गेल्या वर्षभरात चाललेल्या युद्धामध्ये इस्रायली गुप्तहेर संस्थांची कामगिरी ही जागतिक दर्जाची आणि अतिशय उत्कृष्ट अशी झाली आहे. त्यांनी पुरवलेल्या गुप्तहेर माहितीमुळे हमास, हिजबुल्लाह, इराणचे सर्वोच्च नेतृत्व नष्ट करण्यात आले आहे, ज्यामुळे त्यांची युद्धक्षमता अत्यंत कमी झाली आहे.
त्रयस्थ देशातदेखील मोसाद यशस्वीपणे हल्ला करून शत्रूला अक्षरशः वेचून वेचून मारण्यासाठी ओळखली जाते. परक्या मुलखात अशा मोहिमा तडीस नेणे धोकादायक असते. प्रसंगी युद्धदेखील होऊ शकते, परंतु कोणतीही जोखीम ही संघटना घेते. मोसाद ह्युमन इंटेलिजन्स आणि सिग्नल इंटेलिजन्सचा अशा अनेक पद्धतींचा वापर करून शत्रूचा नायनाट करते. मोसाद ही इस्रायलच्या तीन प्रमुख गुप्तचर संस्थांपैकी एक आहे. अमन, शिन बेट आणि मोसाद अशी त्यांची नावे आहेत. अमन (लष्करी गुप्तचर शाखा) आणि शिन बेट (अंतर्गत सुरक्षा शाखा) आणि मोसाद परदेशात गुप्त माहिती गोळा करते, गुप्त माहितीचे विश्लेषण व गुप्त ऑपरेशन्सशी संबंधित कामे करीत असते. मोसादची दोन स्वतंत्र काऊंटर टेररिझम युनिट्स आहेत. पहिल्या युनिटचे नाव मेटसाडा असून ती शत्रूवर हल्ला करते. दुसरी किडोन युनिट असून हिचे काम गुप्तपणे चालते. मुख्यतः अतिरेक्यांचा खातमा करते. मेटसाडाचीदेखील स्वतंत्र युनिट्स आहेत.
मोसादजवळ टॉप क्लास सिक्रेट एजंट आहेत. हायटेक इंटेलिजन्स टीम, शार्पशुटर आणि विषकन्या सौदर्यवतींसह अनेक गुप्तहेर व समर्पित गुप्त योद्धय़ांची फौज आहे. मोसादचे हेर इतक्या सफाईने एखाद्या मोहिमेला तडीस नेतात की, कोणताही पुरावा मागे शिल्लक ठेवत नाहीत. मोसाद इस्रायल आणि ज्यूंच्या रक्षणासाठी सक्रिय असून अन्य देशांच्या गुप्तहेर संघटनांशी गुप्त पद्धतीने संबंध विकसित करीत आहे. इस्रायलशी उघडपणे समर्थन न देणाऱ्या देशांशीदेखील मोसादने गुप्त संबंध प्रस्थापित केलेले आहेत. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. हा अपघात इस्रायलने ड्रोनद्वारे घडविला होता. त्याआधी इराणचे अणुशास्त्र्ाज्ञ मोहसेन फखरीजादेह यांची 27 नोव्हेंबर 2020 मध्ये तेहराणच्या बाहेर रस्त्याच्या कडेला ते कारमधून जात असताना सॅटॅलाईट कंट्रोल मशिनगनद्वारे हत्या झाली होती. त्यांच्या सोबत 11 बॉडीगार्डचा ताफा होता तरीही त्यांचे प्राण वाचविणे शक्य झाले नव्हते. हिजबुल्लाहच्या सदस्यांकडे असलेल्या पेजर आणि संवादाच्या इतर साधनांचा स्फोट झाल्याने प्रचंड खळबळ उडाली. इस्रायलच्या गुप्तहेर संघटनांना ठावठिकाणा कळू नये या उद्देशाने या उपकरणांचा वापर केला जात होता. मात्र ते वापरणाऱ्या सदस्यांच्या हातातच त्याचा स्फोट झाला. त्यामुळे अनेक सदस्यांचा मृत्यू झाला आणि हजारो जखमी झाले.
इस्रायलच्या सगळ्या संस्थांची म्हणजे सैन्य, सरकार, राजकीय नेतृत्व, गुप्तहेर खाते यांची इच्छाशक्ती अतिशय प्रबळ आहे. इस्रायलने योग्य पद्धतीने योजना आखल्या आणि त्यांची काटेकोर पद्धतीने अंमलबजावणी केली. देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्यांविरोधात एकत्रितपणे लढा देणाऱ्या विभागांमध्ये गुप्तहेर विभागाचा सहभाग महत्त्वाचा आहे.
मोसादच्या अधिकाऱ्यांची निवड इस्रायलच्या लष्करामधून करण्यात येते. काही वेळा जनसामान्यांमधूनही खास माणसे शोधून काढली जातात. पडद्यामागे असलेले जे गुप्तचर यंत्रणेसाठी काम करतात त्यांचा या सगळ्यामध्ये महत्त्वाचा वाटा असतो. देशाला असलेला एकंदर धोका लक्षात घेऊन गुप्तचर यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची निवड आणि प्रशिक्षण पार पाडले जाते.
आज स्वतःच्या जबाबदाऱ्या जाहीरपणे जगाला सांगणारी मोसाद ही गुप्तचर यंत्रणा आहे. त्यांची स्वतःची वेबसाइटही आहे. गुप्त पद्धतीने माहिती मिळवणे, तिचे विश्लेषण करणे आणि स्वतःच्या देशाच्या सीमांपलीकडे जाऊन गुप्त पद्धतीने ऑपरेशन्स करणे, याबद्दल या वेबसाइटवर माहिती उपलब्ध आहे. आज या गुप्तचर यंत्रणेचे काम व्यापक झाले आहे. विघातक देशांमध्ये हिंसा घडवणारी शस्त्रास्त्रs निर्माण होण्यापासून आणि त्यांच्या हाती लागण्यापासून थांबवण्याचे काम या यंत्रणेकडून होत आहे. परदेशात असलेल्या इस्रायली उच्चपदस्थांवर विघातक हल्ले होण्यापासून थांबवणे व ज्या ज्यूंना मायदेशी परतायचे आहे, त्यांना गुप्तपणे मायदेशी परतायला मदत करणे, राजकीय क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडींविषयी माहिती मिळवणे, इस्रायलबाहेर स्पेशल ऑपरेशन्स करणे अशी मोसादच्या कामांची यादी देता येईल.
इस्रायलमध्ये लष्करी प्रशिक्षण अनिवार्य असल्याने त्यांच्यामध्ये राष्ट्रप्रेमाची अनोखी भावना पाहायला मिळते. अशा व्यक्तींशी कोणताही गाजावाजा न करता संपर्क साधला जातो. ज्या नागरिकांची आपल्या देशासाठी स्वतःचे आयुष्य वेचण्याची तयारी असते, त्यांना या क्षेत्रामध्ये प्राधान्य दिले जाते. त्यांचा बुद्धय़ांक सामान्यांपेक्षा जास्त असतो. त्यांना अनेक शारीरिक, वैद्यकीय आणि मानसिक चाचण्यांना तोंड द्यावे लागते. त्यांची मुलाखत मोसादचे सगळ्यात वरिष्ठ अधिकारी घेतात. त्यांना प्रत्येक पातळीवर पारखून घेतले जाते.
या प्रशिक्षणासाठी दोन वर्षांहून अधिक कालावधी लागतो. या कालावधीमध्ये त्यांना गोपनीय संपर्क साधण्याचे तंत्र, तंत्रज्ञानाचा वापर, संवाद साधण्याची कला, इस्रायलसह विविध देशांच्या लष्कराविषयी सखोल माहिती, शस्त्रास्त्रांविषयी माहिती आदी विषयांबद्दल दोन वर्षांमध्ये प्रशिक्षण दिले जाते. गुप्तचर यंत्रणेचे कार्य गुप्तपणे चालणे अत्यावश्यक असते. त्यामुळे हे कार्य, त्यांच्या हालचाली संरक्षित असतात. प्रत्येक मोसाद अधिकाऱ्याला अरबी भाषा उत्कृष्टरींत्या बोलता येणे आवश्यक असते. त्याशिवाय आणखी एक विदेशी भाषाही त्याला बोलता यायला हवी. या भाषाही त्यांना या काळामध्ये शिकवल्या जातात. त्यांना विविध माध्यमांचा वापर करून एखाद्यावर नजर ठेवणे, पाठलाग करणे याचे प्रशिक्षण दिले जाते. हे सगळे प्रशिक्षण त्यांना विविध पातळ्यांवर, विविध ऑपरेशन्समध्ये मदत करते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List