पावभाजी केंद्र रात्री 10 नंतर बंद करण्याची नोटीस पुणे पोलिसांना भोवणार; हायकोर्टाने पोलिसांना धाडली नोटीस, प्रतिज्ञापत्रावर मागितला खुलासा
रात्री 10 नंतर पावभाजी केंद्र बंद करा. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास जबाबदारी तुमची असेल, ही नोटीस पुणे पोलिसांच्या चांगलीच अंगलट आली आहे. उच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेतली आहे. पुणे पोलिसांना नोटीस जारी करत न्यायालयाने याचा प्रतिज्ञापत्रावर खुलासा मागितला आहे.
रमेश अगवाने यांनी या नोटीसला याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर या यचिकेवर सुनावणी झाली. पुणे पोलीस आयुक्तांनी हॉटेल्स व अन्न विक्रेत्यांची दुकाने मध्यरात्री दीड वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी दिली आहे. तरीही वानवडी पोलिसांनी अगवाने यांना रात्री 10 नंतर पावभाजी केंद्र बंद करण्याची नोटीस दिली. याचे प्रतिज्ञापत्र पुणे पोलीस आयुक्त, वानवडी पोलीस यांच्यासह संबंधित प्रतिवादींनी सादर करायला हवे, असे आदेश देत खंडपीठाने ही सुनावणी 23 जून 2025 पर्यंत तहकूब केली.
काय आहे प्रकरण
अगवाने यांचे पावभाजी केंद्र आहे. हे केंद्र रात्री 10 नंतर बंद करण्याचे आदेश वानवडी पोलिसांनी अगवाने यांना दिले. 5 डिसेंबर 2024 रोजी येथील पोलीस उपनिरीक्षक यांनी ही नोटीस दिली. पोलीस उपनिरीक्षकांना अशा प्रकारे रात्री 10 नंतर दुकान बंद करण्याचे आदेश देण्याचे अधिकारच नाहीत. कारण पुणे पोलीस आयुक्तांनी हॉटेल्स व अन्न विक्रेत्यांची दुकाने मध्यरात्री 1.30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List