Pahalgam Terror Attack – पर्यटकांनी कोणती दहशत पसरवली होती? जोशी, लेले, मोने कुटुंबांचा सवाल
मिनी स्वित्झर्लंड असलेल्या कश्मीरातील बैसरनमध्ये सगळे एन्जॉय करत होते. इतक्यात गर्दी झाली. आम्हाला वाटले खेळ सुरू आहेत. पण गोळीबाराचे आवाज आले आणि सगळे सैरावैरा पळू लागले. दोन दहशतवादी आले. त्यांनी विचारले हिंदू कोण? संजय काकाने थोडा हात वर केला इतक्यात गोळी त्याच्या डोक्यातून आरपार गेली. बाजूला उभ्या असलेल्या हेमंत काका त्यांना हे काय करताय म्हणून विचारायला गेला म्हणून त्यालाही एकाने शूट केले. माझे बाबा म्हणाले, आम्ही काही करत नाही. आमच्यावर गोळय़ा झाडू नका. त्यांच्याशेजारीच असलेली आई बाबांना कव्हर करायला गेली, पण त्यांनी बाबांच्या पोटात गोळय़ा झाडल्या. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. आम्ही जीव वाचवायला जमिनीवर झोपलो तर शेजारीच बाबा आणि काकांचे रक्ताचे पाट वाहत होते… जे घडलं ते केवळ आमच्या कुटुंबाला नाही, देशाला जखमा देणारं आहे. या भीषण दुर्घटनेत वडील आणि दोन काका एकाच वेळी गमावलेल्या अतुल मोनेंची मुलगी ऋचा हिने ही हादरवणारी कर्मकहाणी सांगितली तेव्हा सभागृहात सन्नाटा पसरला होता. उपस्थितांच्या डोळय़ांतही अश्रू दाटले होते.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले डोंबिवलीकर अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी या तीन मावस भावंडांचा एकाच वेळी बळी गेला. त्यांच्या पार्थिवावर हजारो डोंबिवलीकरांच्या उपस्थितीत बुधवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. आज या तिन्ही कुटुंबांतील महिला आणि मुलांनी पत्रकार परिषद घेऊन भोगलेल्या यातनांची कहाणी प्रसारमाध्यमांसमोर सांगितली. संजय लेले यांचा मुलगा हर्षल म्हणाला, दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला तेव्हा माझा हात माझ्या वडिलांच्या डोक्यावर होता. बाबा त्यांना सांगत होते तुम्ही गोळीबार करू नका. त्यावेळी माझ्या हाताला काहीतरी जाणवले. मला वाटले माझ्या हाताला गोळी लागली. मी पटकन झुकलो, पण पाहतो तर माझ्या बाबांचे डोके रक्ताने माखले होते.
सगळीकडे आकांत माजला होता. इतक्यात काही स्थानिक घोडेवाले मदतीला धावले आणि म्हणाले, आधी तुमचा जीव वाचवा. काहीजण घोडय़ावर बसले तर काहीजण चालत घाटी उतरत होते. माझ्या आईला अर्धांगवायू आहे. तिला मी आणि माझा भाऊ ध्रुव याने खांद्यावर उचलून आणले. चार तास चालत होतो. बेस कॅम्पला पोहोचलो. त्यानंतर सगळय़ांना रुग्णालयात नेण्यात आले. संध्याकाळी साडेसात वाजता आम्हाला कळले की माझे बाबा आणि दोन काका यांचा मृत्यू झाला आहे. आता आम्ही सर्वस्व गमावले. दहशतवादी मग तो कोणत्याही देशाचा असो त्याला दिसताक्षणी गोळय़ा घाला, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
प्रसारमाध्यमांना विनंती
अजूनही आम्ही दु:खातून सावरलेलो नाही आहोत. मात्र या कठीण काळातही सकाळी सहा वाजल्यापासून विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आमच्या घरी पोहोचून थेट वैयक्तिक मुलाखती घेण्याचा अट्टाहास करत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब मानसिकदृष्टय़ा अधिकच व्यथित झाले आहे. आम्ही अजूनही या आघातातून सावरलेलो नाही. त्यामुळे कृपया भल्यापहाटे मुलाखतीसाठी आमच्याकडे येऊ नका, अशी विनंती मोने, लेले, जोशी कुटुंबीयांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List