‘महालक्ष्मी’चे सरपंच नितेश भोईर यांचा अपघात की घातपात? सोनाळे-खाणे मार्गावर बेशुद्ध अवस्थेत आढळले
डहाणूतील महालक्ष्मी ग्रामपंचायतीचे सरपंच नितेश भोईर हे सोनाळे-खाणे मार्गावर बेशुद्ध अवस्थेत आढळून आले आहेत. ते अपघातात जखमी झाले नसून त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप भोईर यांच्या नातेवाईकांनी केला आहे. गंभीर जखमी झालेल्या भोईर कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नितीन भोईर हे सोनाळे-खाणे असा आपल्या मोटारसायकलवरून प्रवास करीत होते. बुधवारी पहाटेच्या सुमारास ते याच मार्गावर जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. मात्र हा अपघात नसून घातपात असल्याची चर्चा गावात सुरू झाली आहे. महालक्ष्मी गावात सध्या देवीची यात्रा सुरू आहे. या यात्रेला भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. यात्रा भरवण्यासंदर्भात उत्सव कमिटीने ग्रामपंचायतीकडून ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेतलेले नाही. या प्रकाराला सरपंच नितेश भोईर यांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळे गावात वाद निर्माण झालेला असतानाच नितेश भोईर हे जखमी अवस्थेत आढळून आले आहेत. यात्रेला झालेल्या विरोधातूनच भोईर यांच्यावर हल्ला झाला, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
लाकडी बाकावर रक्ताचे डाग
नितेश भोईर हे ज्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत आढळून आले तिथेच जवळ असलेल्या लाकडी बाकांवर रक्ताचे डाग आढळून आले आहेत. तसेच त्यावर डोक्यावरील केसही चिकटलेले आहेत. त्यामुळे हा घातपात असल्याचा संशय बळावला आहे. याप्रकरणी कासा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांनी आरोपींचा कसून शोध सुरू केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List