पूरन सिंह निघाला मनीर हुसैन, वैष्णो देवी मार्गावर खोट्या कागदपत्रांसह खेचर सेवा देणाऱ्या दोघांना अटक
जम्मू-कश्मीरमधील रियासी जिल्ह्यात श्री माता वैष्णो देवी मार्गावर खोट्या कागदपत्रांचा वापर करून खेचर सेवा (पोनी सेवा) देणाऱ्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. मनीर हुसैन आणि साहिल खान अशी दोघांची नावे आहेत.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर श्री वैष्णो देवी मंदिर मार्गावर गस्त वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी नियमित गस्तीवेळी श्री गीता माता मंदिराजवळ एका व्यक्तीची चौकशी केली. त्यावेळी त्याने आपले नाव पूरन सिंह असल्याचे सांगितले. मात्र अधिक चौकशी केली असता त्याचे खरे नाव मनीर हुसैन असल्याचे समोर आले. खोट्या कागदपत्रांचा वापर करून मनीर हुसैन श्री वैष्णो देवी मार्गावर खेचर सेवा देत होता. या प्रकरणी कटरा पोलीस स्थानकात भादवि कलमांतर्गत गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, असाच एक प्रकार बनगंगा पूलजवळही समोर आल आहे. येथे जम्मू जिल्ह्यातील कोटला येथील रहिवासी साहिल खान हा कोणत्याही वैध लायसन्सशिवाय खेचर सेवा देत होता. पोलीस चौकशी दरम्यान त्याने आपल्याकडे खेचर सेवा देण्याचा कोणताही अधिकृत परवाना नसल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ‘आज तक‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
श्री वैष्णो देवी मंदिर मार्गावर काटेकोर सुरक्षा व्यवस्था
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर श्री वैष्णो देवी मंदिर मार्गावरील सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. श्री वैष्णो देवी मंदिर मार्गावर गस्त वाढवण्यात आली असून येथे खेचर सेवा देणाऱ्या तसेच अन्य व्यवसाय करणाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे. अधिकृत कागदपत्र आणि परवाना आपल्यासोबत ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच कोणतीही संशयित हालचाल जाणवल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List