ना हिंदूंचा, ना मुसलमानांचा… भाजप कुणाचाही नाही! उद्धव ठाकरे यांचा आसुड कडाडला
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आसूड आज भारतीय जनता पक्षावर कडाडला. नाशिकमधील शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात त्यांनी भाजपच्या बेगडी हिंदुत्वाचा बुरखा टराटरा फाडून टाकला. हिंदू-मुस्लिमांमध्ये भांडणे लावून भाजप सत्ता भोगत आहे. राम नवमी आणि हनुमान जयंतीच्या दिवशी भाजपवाल्यांनी किती हिंदूंच्या घरी भेटी दिल्या, पण 32 लाख मुस्लिमांच्या घरी मात्र सौगात-ए-मोदी पोहोचली. मुस्लिमांना सौगात आणि हिंदूंच्या हाती घंटा… महाराष्ट्रात बटेंगे तो कटेंगे आणि बिहारच्या निवडणुकीत बाटेंगे और जितेंगे. भाजपवाले कुणाचेच नाहीत, ना हिंदूंचे ना मुसलमानांचे. केवळ वापरा आणि फेका करणारे आहेत, सर्वकाही मतांसाठी सुरू आहे, असा जबरदस्त घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
नाशिक येथील गोविंदनगर परिसरातील मनोहर गार्डन सभागृहात शिवसेनाचा निर्धार मेळावा आज पार पडला. या मेळाव्यासाठी नाशिकच्या कानाकोपऱयातून आलेल्या शिवसैनिकांना मार्गदर्शन करत उद्धव ठाकरे यांनी यावेळी चैतन्याच्या लाटाच निर्माण केल्या. जमलेल्या तमाम लढवय्या शिवसैनिक बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो… अशी सुरुवात त्यांनी करताच सभागृहात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. आपले मार्गदर्शन ऐकण्यासाठी सकाळपासून शिबिराला उपस्थित राहिलेल्या शिवसैनिकांचे त्यांनी आभार मानले. शिवसैनिकांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्यात नवी ऊर्मी निर्माण करतानाच उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्दय़ावरून भाजपचा बुरखा टराटरा फाडून फेकला.
वक्फ बोर्डच्या विधेयकाला तामीळनाडूच्या अण्णा द्रमुकने विरोध केला. पण दोनच दिवसात अमित शाहा तामीळनाडूत गेले आणि त्यांनी त्यांच्याशी युती केली. कारण तिकडे स्टॅलिन त्यांच्या बोकांडी बसला आहे. भाजपवाले चंद्राबाबू, नितीश कुमार, मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबत बसले होते. यांचे हिंदुत्व बुरसटलेले आहे. शेतात बैल लघुशंका करायला जातो तसे वाकडे नका जाऊ, सरळ जा. आम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन नवाज शरीफच्या वाढदिवसाचा केक कापून आलो नाही.
बोगस जनता पार्टी
आणीबाणी नको, म्हणून ज्यांनी आणीबाणी लादली त्या इंदिराजींना संपूर्ण देशाने शिक्षा दिली. पण नंतर जनता पक्षाने देशाचे धिंडवडे, वाट लावली, मग त्याच देशाने त्याच जनतेने पुन्हा इंदिराजींना पंतप्रधानपदी बसवलं. याचं कारण संधी दिली होती, पण संधीचा सगळा चिखल करून टाकला, माती केली. आणि त्या सगळ्या घडामोडीतनं आज जे आपल्याला हिंदुत्व शिकवताहेत ते बाहेर पडले. तीच बोगस जनता पार्टी… भारतीय जनता पार्टी, असा इतिहास सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर लत्ताप्रहार केला.
मोदी म्हणाले, काँग्रेसने मुसलमान अध्यक्ष बनवून दाखवावा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, संघाने दलित सरसंघचालक करून दाखवावा, लावा शर्यत. या वर्षात संघाला शंभर वर्षे होताहेत, काँग्रेसला किती वर्षे झाली सव्वाशे-दीडशे. मग संघाचे आतापर्यंतच्या सरसंघचालकांमध्ये कोण दलित होतं, कोण मुसलमान होतं? आणि काँग्रेसचे काढा आणि ठेवा लोकांसमोर, असे आव्हानही यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले. लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण, अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली.
सोबतीने महाराष्ट्र जपायचा तरच शिवसेनेत या
शिवसेनेत प्रवेश करणाऱया कार्यकर्त्यांना आणि शिवसैनिकांना यावेळी उद्धव ठाकरे यांनी एक संदेश दिला. ते म्हणाले की, शिवसेनेकडे सध्या देण्यासारखे काहीच नाही. मंत्रिपद देता येत नाही. आमदार, खासदारकीचे तिकीट देता येऊ शकते. पण खचून जाणारा कधी लढू शकत नाही. लढायचं असेल, पाण्यात उडी मारायची असेल, पैलतीर गाठायचं असेल तर नाकातोंडात पाणी जाईल. पण हिंमत असेल तर परिणामांची पर्वा न करता उडी मारा नाहीतर तसेच परत जा. सोबतीने महाराष्ट्र जपायचा तरच शिवसेनेत या, असे ते म्हणाले. शिवसेनेचं तुम्ही या काळात सुद्धा काम करता. हार जीत हा एक विषय झाला. आपण मुळामध्ये काम कशासाठी करतोय, हे सगळ्यांनी ठरवलं पाहिजे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले. अनेक संकटे येऊनही शिवसेनेसोबत कायम राहिलेल्या चंद्रकांत खैरे आणि बबनराव घोलप यांची उदाहरणेही यावेळी त्यांनी दिली. हे सगळे माझ्यासोबत आहेत आणि माझ्या सोबतच राहणार आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपाकडून बूथ समितीचे गठन कोणत्या पध्दतीने केले जाते याबाबत त्यांना मोबाईल पह्नवर आलेल्या एका गोपनीय माहितीबाबत सांगितले. ते म्हणाले की, भारतीय जनता पार्टी बूथ समिती गठन तपशील हे मुंबईचं आहे. त्यांच्यात पण काय चाललं हे मला रोज कळतं असे ते म्हणाले. यात जबाबदारी त्यात नंबर एक आहे बूथ अध्यक्ष… त्याच्या पुढे माणसाचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर. मग बूथ सरचिटणीस नाव पूर्ण नाव मोबाईल नंबर. मग सदस्य, लाभार्थी प्रमुख. त्यांचही नाव आणि मोबाई नंबर. मग सदस्य दोन.. सदस्य तीन….. असं करत दहा सदस्यांची नावं आणि मोबाईल नंबर दिला आहे. ही तयारी आपणही केली पाहिजे, असे त्यांनी शिवसैनिकांना सांगितले. त्यात 12 सदस्यांमध्ये किमान तीन महिला प्रतिनिधी असाव्यात. किमान 1 एससी आणि एसटी प्रतिनिधी असावा अशी भाजपची मांडणी आहे. ईव्हीएमचा घोटाळा आहे, योजनांचं गारूड आहे. पण त्याच बरोबरीने बूथ मेनेजमेंट हे सुद्धा महत्त्वाचे आहे असे सांगत आपण प्रशिक्षण दिले तर आपलेही तयार होतील, अशी कल्पना उद्धव ठाकरे यांनी मांडली. बूथ प्रमुख एवढय़ासाठी पाहिजे की तो मतदार यादीतल्या प्रत्येकाला नावानिशी चेहऱयासकट ओळखणारा पाहिजे. आणि त्या टीममधला जर का आपला पोलिंग एजंट असेल तर मतदानाला आलेला माणूस हा त्या मतदार यादीतला त्याचं नाव आणि चेहरा जुळतोय हे ओळखणारा पाहिजे. कार्ड बोगस मिळू शकतं, चेहरा अजून बोगस मिळत नाहीये. एवढय़ा पातळीपर्यंत भाजपची लोकं गेलेली आहेत. आपल्याला सुद्धा त्याच पातळीपर्यंत जावं लागेल. आणि पुढे काय करायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी यावेळी शिवसैनिकांना केली. निवडणुकीच्या काळात महाविकास आघाडीतील तीन पक्षांमध्ये झालेल्या खेचाखेचीत आपण आपल्या सरकारचे कामच लोकांपर्यंत पोहोचू शकलेलो नाही
कर्जमुक्ती, शिवभोजन, मालमत्ता करमाफी, गुंठेवारी रद्द करणे अशी कामे आपल्या सरकारने केली होती. पण आपण चढाओढीत राहिलो, आणि भाजपने जनतेला भ्रमिष्ट केलं होतं तो भ्रम आपण पुसून टाकू शकलो नाही, अशी खंतही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.
महाराष्ट्राची दिशा शिवसेना ठरवणार, गद्दार नाही
महाराष्ट्र रेकॉर्ड ब्रेक तापलाय. शिवसेनेच्या सभा उन्हात व्हायच्या तेव्हा शिवसेनाप्रमुख म्हणायचे की, उन्हात सभा व्हायच्या. उन्हातील मोर्चात किंवा सभेत शिवसेनाप्रमुख म्हणायचे की, जमीन तापलीय… वरनं सूर्य आग ओकतोय… पण मधली तुमची डोकी नुसती उन्हाने नाहीत तर अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तापलीत की नाही? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. विचारांनी किती तुम्ही तापलाहेत हे महत्त्वाचे आहे. त्यावरच उद्या आपलं भविष्य आणि आपल्या महाराष्ट्राची नेमकी दिशा हे ठरवणार आहे. ही दिशा आपण ठरवणार, गद्दार नाही ठरवू शकत, असा भीमटोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
देशभरात शिवजयंतीला सुट्टी जाहीर करा
छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या अमित शहा यांचाही उद्धव ठाकरे यांनी चपखल शब्दात समाचार घेतला. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवू नका, असे अमित शहा म्हणाले. पण शहा यांनी सांगून कोणी शिवरायांना महाराष्ट्रापुरतं सीमित ठेवणार नाही. महाराज तर जगाच्या कानाकोपऱयात पोहोचलेले आहेत. पण खरोखर तुम्हाला जर त्यांच्याबद्दल आदर असेल तर शिवजयंतीला देशभर सुट्टी जाहीर करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी करताच यावेळी शिवरायांच्या जयघोषाने सभागृह दुमदुमले. महाराष्ट्रात येऊन नुसतं मतांसाठी छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलू नका, अशा शब्दांत त्यांनी शहा यांना फटकारताच पुन्हा उपस्थितांनी दाद दिली.
– विधानसभेतील पराभव मी मानायला तयार नाही. तो पराभव खोटा दाखवला गेला आहे. आज बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली तर महाविकास आघाडीचे सरकार महायुतीपेक्षा जास्त मते आणि जागा जिंकेल. माझा मायबाप जनतेवर विश्वास आहे
– शिवसेनेने रक्तदानाचा विश्वविक्रम केलेला आहे, भारतीय जनता पक्षाने सांगावं त्यांनी काय विक्रम केला आहे? भाजपचा विश्वविक्रम गोमूत्र वाटपाचा. हे असलं थोतांड शिवसेनेला करायची काही गरज नाही.
– भाजपा शिवसेनेला म्हणते की हिंदुत्व सोडलं? भाजपचे हिंदुत्व आहे तरी काय? शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला जे हिंदुत्व शिकवलेलं आहे ते हिंदू-मुस्लिम म्हणून नाही. शिवसेनेचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. जो देशासाठी मरायला तयार आहे, जो या देशाला मातृभूमी मानतो, माझा देश मानतो. तो जातीपाती धर्माने कोणीही असला तरी आमचा आहे ही शिकवण शिवसेनाप्रमुखांनी आम्हाला दिली आहे.
निष्ठावंत शिवसैनिकांचा मला अभिमान आहे
मी भाग्यवान आहे मला माँ आणि बाळासाहेबांसारखे आई-वडील लाभले. आणि त्यांनी माझ्या पाठीशी तुमच्यासारखी जी पुण्याई उभी करून ठेवली आहे याच्यासारखं भाग्य हे सत्तेपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. कारण सत्ता असली की सगळे तिकडे जातात. पण सत्ता नसताना जे राहतात ते खरे निष्ठावान आणि ते खरे आपले सोबती असतात, अशी कृतज्ञता उद्धव ठाकरे यांनी निष्ठावंत शिवसैनिकांबद्दल व्यक्त केली. सत्यनारायणाची पूजा असली की तिर्थप्रसादाला सगळे जातात तसे सगळे जाताहेत जाऊ द्या. मात्र, तुमच्यासारखे खरोखर ज्यांना आपण वाघाचे बछडे म्हणून असे मर्द शिवरायांच्या मावळ्याचे वारसदार शिवसेनेसोबत आहेत त्याचा मला अभिमान आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
भाजपने नाशिकला कसे फसवले त्याचे होर्डिंग लावा
देशातल्या 100 स्मार्ट सिटीमध्ये नाशिकचाही समावेश होता. नाशिकला हजारो कोटी रुपये देण्यात आले होते, ते कोणाच्या खिशात गेले ते शोधून काढा असे उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपा सरकारने नाशिककरांना आतापर्यंत कोणती आश्वासने दिली होती जी पूर्ण केलेली नाहीत त्याचे होर्डींग्ज लावा असेही ते म्हणाले. शिवसेनेने जे-जे काही केलं आहे ते फक्त नाशिक शहर नाही तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यासाठी केले. ते आपण लोकांना सांगितलं नाही तर मग काम करतोय कशासाठी? त्यामुळे हेही महत्त्वाचं आहे की प्रत्येक ठिकाणी जिथे जाऊ तिथे शिवसेनेनं काय-काय केलेलं आहे ते लोकांना सांगा अशा सूचनाही उद्धव ठाकरे यांनी दिल्या.
भाजपने एकदा तरी सांगावे त्यांचे हिंदुत्व काय
वक्फ विधेयकाला शिवसेनेने केलेल्या विरोधाबाबतही उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाष्य केले. ते म्हणाले की, वक्फ विधेयकाचा हिंदूंशी काही संबंध नव्हता म्हणून शिवसेनेने विरोध केला. त्या विधेयकाच्या वेळी अमित शहा, किरण रिजीजू, पियुष गोयल यांच्यापासून ज्यांनी ज्यांनी भाषणे केली ती सर्वांनी ऐकावी. शिवसेनेचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे, भाजपने एकदा तरी सांगावे की त्यांचे हिंदुत्व काय आहे. शिवसेनेचा निर्धार शिबिराचा कार्यक्रम होऊ नये म्हणूनच काल रात्री मुहूर्त मिळाला, असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे-राज ठाकरे भेटीवरही टोला लगावला.
छत्रपती शिवरायांचे स्मारक राजभवनावर होऊ द्या!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरसमुद्रात शिवरायांच्या स्मारकासाठी जलपूजन केले होते. त्यालाही अनेक वर्षे उलटली. परंतु एक वीटही रचली नाही. शिवरायांच्या स्मारकासाठी यांच्याकडे मुंबईत कुठंही जागा नाही. त्यामुळे राज्यपालांना शिफ्ट करा. त्यांना एखादा बंगला द्या आणि शिवरायांचे भव्य स्मारक राजभवनावर उभारा.
– शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाशिकला महाशिबिरासाठी निघाले असता वाटेत शहापूरमध्ये शिवसैनिकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. या वेळी सोन्या पाटील यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार मिळाल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी पाटील यांचा गौरव केला. सोबत भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख साईनाथ तारे व शिवसैनिक उपस्थित होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List